Monday, December 12, 2011

कॉर्पोरेटमधील उच्चपदस्थ आणि विश्लेषक यामधील संबंध: वल्डकॉमआपण अमुक एक शेअर घ्यावा किंवा विकावा यासंबंधीचे रिसर्च रिपोर्ट पेपरात वाचत असतो आणि हे रिपोर्ट वाचताना ते रिपोर्ट लिहिणारा विश्लेषक पूर्णपणे आलिप्तपणे रिपोर्ट लिहित आहे असे आपण अनेकदा गृहीत धरत असतो. म्हणजेच काय की या रिपोर्टमध्ये एखादा विशिष्ट प्रकारचा सल्ला विश्लेषक स्वत:चा फायदा व्हावा या उद्देशाने नव्हे तर तो शेअर खरोखरच चांगला आहे म्हणून देत आहे असे आपल्याला वाटते. पण दरवेळी वस्तुस्थिती अशी असते का? उदाहरणार्थ एखाद्या विश्लेषकाने एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केलेले आहेत. तेव्हा त्या शेअरची किंमत वाढण्यात त्या विश्लेषकाचा फायदा असतो. एखाद्या नामवंत संस्थेत काम करणाऱ्या (आय.सी.आय.सी.आय डायरेक्ट, शेअरखान) अशा विश्लेषकाने तो शेअर विकत घ्या असा सल्ला दिला तर तो सल्ला गुंतवणुकदार विचारात घेतात. तेव्हा एखाद्या विश्लेषकाने शेअर विकत घ्या असा सल्ला दिला आणि त्या शेअरची मागणी वाढून किंमत वाढली आणि त्यामुळे त्याचा फायदा होणार असेल तर आपले हितसंबंध गुंतले असल्यामुळे असा सल्ला देणारा विश्लेषक पूर्णपणे तटस्थपणे सल्ला देईल याची खात्री नाही.तेव्हा या गोष्टीला पार्श्वभूमी आहे विश्लेषकाचे (आणि तो काम करत असलेल्या संस्थेचे) हितसंबंध यांची.


ही गोष्ट आहे अमेरिकेतील "वल्ड कॉम" या कंपनीची आणि यात मुख्य पात्रे आहेत दोन--कंपनीचा सी.इ.ओ बर्नी एबर्स आणि विश्लेषक जॅक ग्रबमन. विश्लेषक जॅक ग्रबमन काम करत होता "सॉलोमन स्मिथ अ‍ॅन्ड बर्नी" या सिटी ग्रुपमधील इन्व्हेस्टमेन्ट बॅंकमध्ये (ज्याला सध्या सिटी ग्लोबल मार्केट्स म्हटले जाते).


सी.इ.ओ बर्नी एबर्स

जॅक ग्रबमन

अमेरिकेत १९९९ पूर्वी "ग्लास-स्टीगल" कायद्याप्रमाणे एका छत्राखाली अनेक प्रकारच्या वित्तीय संस्था ठेवायला बंदी होती. पण १९९९ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. त्यानंतरच्या काळात सिटीग्रुप मध्ये सिटी बॅंक बरोबरच ही इन्व्हेस्टमेन्ट बॅंकही आली.

१९९० च्या दशकात वल्डकॉम कंपनीने इतर कंपन्या विकत घ्यायचा धडाका लावला होता.यातील एम.सी.आय ही सूरसंचार कंपनी विकत घ्यायला ब्रिटिश टेलिकॉमने १९ बिलियन डॉलर्सची ऑफर दिली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून वल्ड कॉमने ३५ बिलियन डॉलर्सची!! अर्थातच एम.सी.आय च्या शेअरधारकांनी आपली कंपनी कोणाला विकली हे वेगळे सांगायला नकोच.अशा प्रकारच्या (दुसरी कंपनी विकत घ्यायच्या) व्यवहारांसाठी (acquisition) कंपन्यांना advise करायला (गलेलठ्ठ फी घेऊनच) इन्वेस्टमेन्ट बॅंका असतात.एम.सी.आय व्यवहारात सॉलोमन स्मिथ बर्नीने ब्रिटिश टेलिकॉमला advise केले होते. तरीही यापुढच्या काळात वल्ड कॉम ज्या कंपन्या विकत घेईल त्यासाठी advisor म्हणून सॉलोमन स्मिथ बर्नीला (अधिक उत्पन्न मिळवायला) contract हवे होते.

आता इथे ग्लास-स्टीगल कायदा रद्द केल्यामुळे हितसंबंध कसे प्रभावीत झाले याची मजा बघा. सिटी बॅंकेने सी.ई.ओ बर्नी एबर्सची मोठी गुंतवणुक असलेल्या एका कंपनीला बऱ्याच सवलतीने कर्ज दिले ते या अपेक्षेने की नंतरच्या काळात कंपन्या विकत घेताना बर्नी एबर्सची कंपनी वल्ड कॉम सॉलोमन स्मिथ बर्नीला (सिटीग्रुपमधील कंपनी) advisor म्हणून नियुक्त करेल! इतकेच काय तर सिटीबॅंकेने कंपनीचे सी.एफ.ओ स्कॉट सुलिव्हान आणि इतर काही उच्चपदस्थांनाही सवलतीच्या दराने वैयक्तिक कर्जे दिली! यात आक्षेपार्ह काही नाही असे वाटूही शकेल पण ही एका प्रकारची लाच नाही का? सिटीबॅंकेचे उत्पन्न योग्य बाजारदराने कर्ज देऊन वाढू शकले असते पण ते सॉलोमन स्मिथ बर्नीला contract मिळावे या अपेक्षेपोटी वाढले नाही. आणि जरी ते contract मिळाले असते तर त्याचा फायदा सिटीबॅंकेला (म्हणजेच सिटीबॅंकेच्या शेअरधारकांना) होणार होता का? छे भलतेच काहीतरी.अशी contract मिळून सॉलोमन स्मिथ बर्नीच्या Investment Bankers ना भरपूर बोनस हवे होते! ही शेअरधारकांची फसवणूक नाही का?

सी.एफ.ओ स्कॉट सुलिव्हान

खरा धक्कादायक प्रकार यापुढे सुरू होतो.बर्नी एबर्सला वल्डकॉम कंपनीने "स्टॉक ऑप्शन्स" दिले होते. स्टॉक ऑप्शनचा अर्थ भविष्यकाळात कंपनीचे शेअर सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी करायचा पर्याय! म्हणजे समजा आज शेअरची बाजारातील किंमत ४० डॉलर्स आहे तर दोन वर्षांनंतर शेअर (समजा) ३५ डॉलर्सला खरेदी करायचा पर्याय बर्नी एबर्सला दिला गेला.समजा दोन वर्षांनंतर शेअरची किंमत ३५ डॉलर्सपेक्षा कमी असली तर अर्थातच बर्नी एबर्स शेअर्स ३५ डॉलर्समध्ये खरेदी करायचा पर्याय वापरणार नाही. असे ऑप्शन एका शेअरवर नाही तर काही हजार शेअरवर दिले गेले.१९९१ ते १९९९ या काळात वल्डकॉमच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढली. १९९१ मध्ये एका डॉलरच्या आसपास असलेली किंमत १९९९ पर्यंत ६० डॉलर्सला जाऊन पोहोचली.या काळात शेअरची किंमत चढतीच होती.तेव्हा असे ऑप्शन दिल्यानंतर दोन वर्षांनंतर शेअरचे बाजारभाव अर्थातच जास्त होते.तेव्हा या ऑप्शनमधून बर्नी एबर्सचा मोठा फायदा होऊ शकणार होता. (असे ऑप्शन देणे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना-- केवळ उच्चपदस्थानांनाच नव्हे-- अधिक चांगले काम करून शेअरची किंमत वाढवून स्वत:चा फायदा करायला मिळावा यासाठी असे ऑप्शन सर्रास दिले जातात). पण एक शेअर ३५ डॉलर्सला असे एक लाख शेअर्स म्हणजे ३५ लाख डॉलर्स बर्नी एबर्सला त्यासाठी भरायला हवेत! इतकी मोठी रक्कम कॅशमध्ये असतेच असे नाही.तेव्हा ही रक्कम बर्नी कशी उभी करणार होता?

त्यावर एक उपाय म्हणजे बर्नीकडे स्वत:कडे आधीपासून असलेले वल्डकॉम कंपनीचे शेअर्स विकणे. पण कंपनीच्या सी.ई.ओ ने स्वत: कंपनीचे शेअर विकणे म्हणजे स्वत: सी.ई.ओ ला कंपनीच्या भविष्यकाळातील उत्पन्नाविषयी शंका आहे आणि भविष्यात शेअरची किंमत कमी होईल असे त्याला वाटते असा चुकीचा संदेश बाजारात जाईल.स्वत: बर्नी एबर्स या गोष्टीला अनुकूल नव्हता. २००१ मध्ये एनरॉन कंपनी कोसळली त्याच्यामागे उच्चपदस्थांनी असे शेअर विकणे हे पण एक कारण होते.पण बर्नी एबर्सने असे शेअर्स क्वचितच विकले. मग इतकी रोख रक्कम आणावी कुठून?

तर त्यासाठी उपाय होता कर्ज काढणे. सिटीबॅंकेसारख्या बॅंकेनेही वर सांगितलेल्या कारणासाठी बर्नीला सवलतीने कर्ज दिले.आणि त्यासाठी बर्नीने तारण म्हणून काय ठेवले? तर त्याच्याकडे पूर्वीपासून असलेले वल्ड कॉंम कंपनीचेच शेअर्स.जोपर्यंत शेअर्सची किंमत वाढत असेल तोपर्यंत काही प्रश्न नाही.पण समजा शेअर्सची किंमत कमी होऊ लागली तर बॅंकेकडे ठेवलेल्या तारणाची किंमत कमी होऊ लागेल. तेव्हा मुळातले शेअर किंमतीत पडणार नाहीत यात सिटीग्रुपचे हितसंबंध गुंतलेले होते. इथे मदतीला धाऊन आला विश्लेषक जॅक ग्रबमन. बर्नी एबर्स १९८० च्या दशकात मिसिसिपी राज्यात "लॉंग डिस्टन्स डिस्काऊंट सर्व्हिस" या कंपनीचा सी.ई.ओ होता. तीच कंपनी पुढे वल्डकॉम म्हणून म्हणून ओळखली जाऊ लागली.त्या वेळेपासून जॅक ग्रबमन हा बर्नी एबर्सचा मित्र होता.या मैत्रीचा फायदा म्हणून कंपनीतील "आतल्या बातम्या" यथास्थित जॅक पर्यंत पोहोचू लागल्या.इतकेच काय तर कंपनीतील उच्चपदस्थांचे "कॉन्फरन्स कॉल" कशाकरता होते आणि त्यात काय चर्चा झाली हे सुध्दा त्याच्यापर्यंत पोहोचू लागले.इतर विश्लेषकांना अर्थातच ही सवलत नव्हती. जॅक ग्रबमनने वल्ड कॉमला "buy rating" दिले. २०००-०१ मध्ये कंपनीच्या कारभाराविषयीच्या तक्रारी SEC (भारतातील सेबीला समकष) ची चौकशी सुरू झाल्यानंतरही जॅकचे "विकत घ्या" हे रेटिंग कायमच राहिले. इतकेच काय तर मार्च २००२ पर्यंत जॅक आपल्या रेटिंगवर कायम राहिला.

जॅकला आतल्या बातम्या बर्नी एबर्सबरोबरच्या मैत्रीतूनच मिळत होत्या. ही फुकटची मदत होती का?तर तसे नक्कीच नाही. "सॉलोमन स्मिथ बर्नी" ज्या कंपन्यांचे आय.पी.ओ बाजारात आणायला मदत करेल त्यातील अधिक चांगल्या कंपन्यांचे शेअर बर्नी एबर्स आणि सी.फ.ओ स्कॉट सुलिव्हानला सॉलोमन स्मिथ बर्नीकडून दिले जाऊ लागले. जेव्हा एखाद्या कंपनीचा आय.पी.ओ बाजारात येतो तेव्हा बहुतांश वेळा पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते. एखाद्या आय.पी.ओ १५X oversubscribe झाला याचा अर्थ जेवढे शेअर विकायला बाजारात आणले होते त्याच्या १५ पट मागणी होती असा होतो. अशा वेळी शेअरसाठी अर्ज केलेल्यांना त्यांच्या category प्रमाणे त्यांच्या मागणीच्या १/१५ भाग शेअर दिले जातात.तरीही यातही चापलुसी करून जास्तीचे शेअर बर्नी आणि सुलीव्हानला दिले गेले.

तेव्हा एकमेकांचे हितसंबंध एकमेकांमध्ये कसे गुंतले होते ते बघितले की थक्क व्हायला होते. आता या सगळ्या भानगडीत नुकसान कोणाचे होत होते? अर्थातच कंपनीच्या शेअरधारकांचे.तेव्हा शेअरधारकांचे पैसे लुबाडून आपल्या खिशात घालायचा हा डाव होता.

वल्डकॉमच्या दिवाळखोरीसाठी खरे कारण (अधिक महत्वाचे) अकाऊंटिंग मध्ये जाणीवपूर्वक केलेले घोटाळे हे होते.यात अकाऊंटिंग करताना कंपनीचे उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त फुगवून दाखविणे आणि खर्च कमी दाखविणे हे प्रकार अनेक क्लुप्त्या लढवून केले गेले.अर्थातच यामुळे कंपनीचा नफा होता त्यापेक्षा जास्त दाखविला गेला आणि गुंतवणुकदारांचा कंपनीकडे बघायचा दृष्टीकोनच बदलला. हे सगळे प्रकार सिंथिया कुपर या कंपनीच्या अकाऊंटिंग विभागात कामाला असलेल्या महिलेने नेटाने उघडकीला आणले. स्कॉट सुलिव्हानने तिला "या भानगडींमध्ये नाक खुपसू नकोस" अशी तंबी दिली होती हे वेगळे सांगायलाच नको. सिंथिया कुपरच्या कामगिरीबद्द्ल तिचा टाईम मासिकाने २००२ च्या Person of the year मध्ये समावेश केला.

सिंथिया कुपर

पुढे २००२ मध्ये सगळे प्रकार उघडकीला आल्यावर अमेरिकन संसदेने "Sarbanes Oxley" कायदा पास केला आणि कंपन्यांच्या अकाऊंटिंगविषयीचे नियम अधिक कडक केले.तसेच अशा अकाऊंटिंग मधील गैरप्रकारांसाठी कंपनीच्या संचालक मंडळाला जबाबदार ठरविण्यात येईल असा नियम केला.


जून २००२ मध्ये जॅक ग्रबमनने राजीनामा दिला.डिसेंबर २००२ मध्ये SEC ने त्याच्यावर Unprofessional conduct आणि Conflict of interest च्या गुन्ह्यासाठी १५ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आणि कोणत्याही ब्रोकरींग कंपनी किंवा इन्व्हेस्टमेन्ट बॅंकमध्ये त्याला नोकरी करण्यावर आयुष्यभरासाठीची बंदी घातली.२००५ मध्ये बर्नी एबर्सला २५ वर्षांच्या तर स्कॉट सुलिव्हानला ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.आजही बर्नी एबर्स तुरूंगातच आहे.


मी रिस्क मॅनेजमेन्टशी संबंधित दोन संस्थांचा सदस्य आहे.या दोन्ही संस्थांचे अशा Conflict of interest च्या बाबतीतले नियम कडक आहेत.विश्लेषकांना कोणत्याही कंपनीवर रिसर्च रिपोर्ट public domain मध्ये आणण्यापूर्वी जर का असे Conflict of interest असतील (त्या कंपनीचे शेअर/बॉंड धारक असणे इत्यादी) तर ते जाहिर करणे बंधनकारक असते.म्हणजे त्याप्रमाणे गुंतवणुकदार त्या रिपोर्टवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवू शकतील.

2 comments:

Digamber said...

Dear girish ji, ek chaan apratim mahitipurna lekh vachla, thank you for sharing information on your post. Regards digamber

सुदीप मिर्ज़ा said...

excellent post!
keep it up...