Saturday, February 12, 2011

फायनान्सची तोंडओळख (भाग ०): जादूगार राम कुमार आणि जादुच्या छड्या

रामपूर हे एक छानसे छोटेखानी गाव होते. त्या नगरात राम कुमार नावाचा जादूगार राहत होता.राम कुमारला भाऊ तीन-- लक्ष्मण कुमार,भरत कुमार आणि शत्रुघ्न कुमार. तर सीता कुमारी ही त्याची पत्नी.

राम कुमारकडे एक विलक्षण कौशल्य होते.त्याला जादुच्या छड्या तयार करता येत असत.आणि या छड्या साध्यासुध्या नव्हत्या.तर ती छडी ज्या मालकाकडे असेल त्या मालकाच्या बॅंक खात्यात ती छडी जगाच्या अंतापर्यंत दर वर्षाच्या १ जानेवारीला १०० रूपये आपोआप जमा करत असे. राम कुमारकडे अशा अनेक छड्या होत्या आणि त्यातून त्याला भरपूर पैसे मिळत असत. छड्या कशा बनवायच्या याचे रामने गुपित पाळले होते आणि ते त्याने आपल्या भावांना किंवा पत्नीलाही शिकविले नव्हते.तसेच एकही छडी रामच्या बंगल्याबाहेर कधीही गेलेली नव्हती की इतर कोणीही त्या छडीला कधीही हातही लावला नव्हता.

राम कुमारला अचानक एक लहर आली आणि त्याने डिसेंबर २०१० मध्ये पेपरमध्ये जाहिरात देऊन केवळ १ जानेवारी २०११ रोजी आपण त्या छड्या लोकांना विकायला तयार आहोत असे जाहिर केले. कोणी आपली छडी रामकडून विकत घेऊन ती इतर कोणालाही विकली तरी ते चालण्यासारखे होते. छडी नव्या मालकाच्या बॅंक खात्यात पैसे जमा करू लागणार होती.

रामकडून विकत घेतलेली छडी १ जानेवारी २०१२ पासून दर वर्षी जगाच्या अंतापर्यंत मालकाच्या बॅंक खात्यात १०० रुपये आपोआप जमा करणार! छडी विकत घेताना एकरकमी पैसे रामला द्यायचे आणि राम त्या बदल्यात तुम्हाला छडी देणार ही बोली होती. छडी विकत घेणाऱ्याला रामने घेतलेली रक्कम राम कधीही परत करणार नाही. केवळ छडी दर वर्षी १०० रुपये मालकाच्या बॅंक खात्यात जमा करणार! सुमारे दोनशे छड्या विकल्या जातील असा रामचा अंदाज होता. आपल्याला या उद्योगातून किती पैसे मिळतील याचा हिशोब करायला राम बसला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जाहिरातीत छडीची किंमत द्यायला तो विसरलाच! मग नफ्याचा हिशोब कसा करावा? इतके दिवस राम छड्या स्वत:साठीच बनवत असल्यामुळे त्याला छडीची किंमत किती हा विचार करायची गरज लागली नव्हती.

राम कुमार विचार करू लागला. काही केल्या त्याला उत्तर सापडेना. तेव्हा त्याने हे वाचत असलेल्या प्रत्येकाला फोन केला आणि प्रश्न सोडवायला मदत करायची विनंती केली. त्या बदल्यात तो उत्तर देणाऱ्याला एक छडी मोफत द्यायला तयार झाला.

तेव्हा प्रश्न: तुम्ही राम कुमारचा प्रश्न सोडवू शकाल का?

हा प्रश्न सोडवायला आपण योग्य ती गृहितके धरू शकता.मात्र ती गृहितके काय हे सांगूनच उत्तर लिहावे ही विनंती नाहीतर ते उत्तर बरोबर आहे की नाही हे सांगता येणार नाही.

डिस्क्लेमर: हा भाग ’फायनान्सची तोंडओळख’ या लेखमालेची सुरवात करणारा असला तरी या भागात फायनान्सचे कोणतेही तत्व सांगितले नसल्यामुळे या भागाला ’भाग शून्य’ म्हणत आहे. हा भाग या लेखमालेची सुरवात करण्यासाठी आहे.तसेच जादूगार राम कुमार आपल्याबरोबर राहणार आहे. तेव्हा त्याचीही ओळख करून देणे हा या भागाचा उद्देश आहे.

2 comments:

Digamber said...

गिरीश सर,

मराठी ब्लॉग वरून तुमच्या ब्लॉग ची लिंक मिळाली आणि मला तुमचा ब्लॉग खूप आवडला, ब्लॉग पेक्षा तुमचे तुमच्या जीवनातील अनुभव जास्त भावले.

राम च्या छडी ची किमत ठरवताना पुढील बाबी लक्षात घ्याव्या लागतील.
ती छडी पुढील किती वर्षे १०० रुपये खात्यामध्ये जमा करेल व प्रत्येक वर्षी चा inflation रेट काय असेल यावर अवलंबून आहे
ऐकून वर्षे x रु १०० / inflation रेट
मी एक अंदाज म्हणून वरील फॉर्मुला सांगितला आहे. कदाचित बरोबर पण असेल.
कृपया तुम्ही मला त्या छडी ची किमत कशी काढायची ते सांगू शकाल का?

regards
Digamber

Girish said...

नमस्कार,

आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मी http://financeinmarathi.blogspot.com/ हा नवीन ब्लॉग सुरू केला आहे त्यावर फायनान्सशी संबंधित लेख लिहायला सुरवात केली आहे.अजूनही हा ब्लॉग बराच बाल्यावस्थेत आहे. तरी त्यावर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल.

धन्यवाद

गिरीश