Monday, January 24, 2011

भाजप आणि संघ

या विषयी बोलावे तेवढे थोडेच. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की बहुसंख्य काळ मी भाजपचाच कट्टर समर्थक होतो.काही घडामोडींनंतर (मुख्यत: आग्रा परिषदेनंतर) माझा भाजपविषयी भ्रमनिरास झाला. असा भ्रमनिरास झालेला मी एकटाच आहे असे अजिबात नाही.पण भ्रमनिरास झाल्यानंतरच्या काळात मी एकूण परिस्थितीचा तटस्थपणे विचार केला (जो पूर्वी मी भाजप समर्थनामुळे करू शकत नव्हतो) आणि त्यातून मला पुढील मुद्दे मांडायचे आहेत.

१. रा.स्व.संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ,स्वदेशी जागरण मंच,वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काही प्रमाणात भाजप या सगळ्यांचा एक विशाल संघ परिवार आहे असे म्हटले तरी चालेल.यातील इतर संघटनांच्या स्थापनेत किंवा नंतर रा.स्व.संघाच्या नेत्यांचा पुढाकार होता (उदा. भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंचात दत्तोपंत ठेंगडी, वनवासी कल्याण आश्रमाचे आर.के.देशपांडे वगैरे)

२. स्वत: वाजपेयी आणि अडवाणी रा.स्व.संघाचेच स्वयंसेवक होते.किंबहुना जनता पक्ष आणि रा.स्व.संघ असे दुहेरी सदस्यत्व पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांचे होते हे जनता सरकार पडण्यामागे मोठे कारण होते.दिनांक ५ डिसेंबर १९९२ रोजी वाजपेयींनी केलेल्या या भाषणात "अयोध्यामे जमीन को समतल करना पडेगा" या वक्तव्याचा अर्थ त्यांनी बाबरी पाडायला फूस दिली असा घेतला जाऊन त्यावर वादही झाला होता.तसेच सप्टेंबर २००० मध्ये वाजपेयींनी पंतप्रधान असताना न्यू यॉर्कमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात भाग घेतला होता. १९९८ मध्ये आपल्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर भाषण करताना वाजपेयींनी रा.स्व.संघ ही देशभक्त आणि शिस्तशीर संघटना आहे अशी स्तुतीसुमने उधळली होती. (याचा डायरेक्ट आंतरजालीय पुरावा या क्षणी माझ्याकडे नाही पण सुब्रमण्यम स्वामींनी सरकारवर केलेल्या टिकेत याचा उल्लेख आहे). तसेच अयोध्या आंदोलन म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचा अविष्कार असेही वाजपेयींनी १९९९ मध्ये म्हटले.

पण रा.स्व.संघ-विश्व हिंदू परिषद आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगीही वेळोवेळी झाली.

३. १९९९ मध्ये अभाविपने वाजपेयी सरकारला देशातील "सबसे निकम्मी सरकार" म्हटले.रा.स्व.संघातून भाजपमध्ये आलेले के.एन.गोविंदाचार्य यांनी या विधानाला नंतर पुष्टी दिली.त्यापूर्वीच गोविंदाचार्य भाजप नेतृत्वापासून अलग पडले होते हे सांगायलाच नको.

४. जानेवारी १९९९ मध्ये मदनलाल खुराणांनी वाजपेयी सरकारमध्ये रा.स्व.संघाच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात राजीनामा दिला. त्यावेळी खुराणांनी वाजपेयींनी आपल्याला "तुम्ही माझ्यासाठी हौतात्म्य पत्करत आहात" असे सांगितल्याचा दावा केला.त्याचे खंडन वाजपेयींनी कधी केल्याच ऐकिवात नाही.

५. मार्च २००१ मध्ये तहलकाप्रकरणानंतर वाजपेयींचे सहकारी (विशेषत: त्यांच्या कार्यालयातील) हे incompetent आहेत असे रा.स्व.संघाने म्हटले. या बातमीतील एक वाक्य वाचून अंमळ गंमत वाटली.तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन म्हणाले "Those who were not answerable to the people should not have the power to influence decisions" (ज्यांचे लोकांप्रती (म्हणजेच मतदारांप्रती) कोणतेही उत्तरदायित्व नाही अशांचा धोरणात्मक निर्णय घेताना प्रभाव असू नये). पण त्याच वेळी त्यांनी पंतप्रधान कार्यालयातून ब्रजेश मिश्रा आणि मोन्टेक सिंह अहुलुवालियांना हटवायची मागणी केली.त्यावेळी त्यांना लोकांप्रती कोणते उत्तरदायित्व होते?

६. रा.स्व.संघाचा वाजपेयी सरकारच्या आर्थिक धोरणांना विरोध होता हे तर वेळोवेळी सिध्द झालेले आहे.अनेकदा वाजपेयींनी संघाला डावलले आणि त्यातूनच सुदर्शन यांनी वाजपेयी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

तरीही आज नितीन गडकरी वेळोवेळी नागपुरला संघ मुख्यालयात जातात.आज भाजपचा एकही अध्यक्ष (वाजपेयी,अडवाणी,जोशी,ठाकरे,लक्ष्मण, कृष्णमूर्ती,नायडू,राजनाथ सिंह,गडकरी) रा.स्व.संघाची पार्श्वभूमी नसलेला नाही.अनेक नेते संघातून भाजपमध्ये वेळोवेळी depute झाले आहेत (नरेन्द्र मोदी,वेंकय्या नायडू,ओ.राजगोपाल).

तेव्हा हे नक्की काय गौडबंगाल आहे?भाजपवाले हे नक्की कोण आहेत?वाजपेयी सरकारचे आर्थिक निर्णय बघून त्यांना स्वदेशी समर्थक तर नक्कीच म्हणता येणार नाही पण त्याच वेळी त्यांच्यावर प्रभाव असलेल्या रा.स्व.संघाची आर्थिक निती बघून तर त्यांना नव्या आर्थिक धोरणाचे समर्थक म्हणवणार नाही.की एकाच वेळी अनेक मुखवटे धारण केले की वेळ आल्यावर आपल्याला सर्वात सोयीचा मुखवटा पुढे करता येतो हे साधे गणित आहे?

कॉंग्रेसने भ्रष्टाचार केला असे आरोप अनेक वेळा झाले.पण तरीही त्यांचे कोणी नेते कॅमेऱ्यावर पैसे घेताना पकडले कधीच गेले नाहीत.भाजपचे बंगारू लक्ष्मण आणि दिलीप सिंग जुदेव हे नेते असे पैसे घेताना पकडले गेले.दिलीप सिंग जुदेव तर छत्तिसगड राज्याचे २००३ च्या निवडणुकीनंतर पुढचे मुख्यमंत्री होणार अशीही भाजप वर्तुळात हवा होती.याच दिलीप सिंग जुदेवने "पैसा खुदा तो नही लेकिन खुदा की कसम खुदा से कम भी नही" असे म्हणतानाही कॅमेऱ्याने टिपले . जॉर्ज फर्नांडिसचा तहलकाप्रकरणी राजीनामा घेतला पण सात महिन्यातच परत मंत्रीमंडळातही घेतले.आज येडियुरप्पांविषयी मुग गिळून बसले आहेत.

राजांच्या भ्रष्टाचार प्रकरणापुढे इतर कोणतेही प्रकरण पिल्लूच वाटेल.आदर्श सोसायटीचे प्रकरण आणि येडियुरप्पांचे प्रकरण यांची कदाचित पैशाच्या बाबतीत तुलना होऊ शकेल.पण मग त्याच न्यायाने अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतला तसाच येडियुरप्पांचाही राजीनामा घ्यायला हवा. की जॉर्ज ऑरेवेलच्या Animal Farm मधील वाक्य "All animals are equal but some are more equal than others" इथेही लागू पडते?

1 comment:

Anonymous said...

संघ ही या मातीतच पाळेमुळे असलेली संघटना आहे हे आपण लक्षात घेऊ इच्छित नाही असे आपल्या विचारांवरून दिसते.