Monday, November 29, 2010

गांधीवादाविषयी

मिसळपाव या मराठी संकेतस्थळावरील गांधीवाद या चर्चेवरील माझा प्रतिसाद


डिस्क्लेमर: या प्रतिसादावरून मी कोणाही क्रांतिकारकावर टिका करत आहे किंवा त्यांचे योगदान अमान्य करत आहे असा अर्थ काढू नये ही विनंती.सगळे क्रांतिकारक तळहातावर शीर घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करणारे महामानव होते असेच मला म्हणायचे आहे याची कृपया नोंद घ्यावी.

काही मुद्दे

या लेखात गांधीवादाचा आणि क्रांतिकारकांचा परामर्ष केला गेला आहे.तेव्हा या दोन्हीविषयी मते लिहिणे अस्थानी ठरू नये.

आपणच गाढवा प्रमाणे जातीवादाने अंधः बनून क्षात्रतेज गमावून नपूंसक बनून १५० वर्षे घेतली इग्रजांना हाकलायला
यातील पहिल्या भागावर (गाढवा प्रमाणे जातीवादाने अंधः बनून क्षात्रतेज गमावून नपूंसक बनून) याविषयी आपल्या मताशी १०००% सहमत. माझा मुद्दा आपण इंग्रजांना हाकलायला १५० वर्षे का घेतली याविषयी आहे.

अगदी अलिकडल्या काळापर्यंत माझेही मत होते की स्वातंत्र्य मिळाले ते क्रांतिकारकांमुळे आणि हिटलरने महायुध्द सुरू केल्यामुळे. तसेच गांधींच्या अहिंसक चळवळीचे योगदान मी मान्य करायलाच तयार नव्हतो. पण यावर अजून विचार केल्यावर मला पुढील मुद्दे सुचले.

१. स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता झुंजणे हे महान काम आहेच. आणि त्यासाठी अत्यंत महान दर्जाची देशभक्ती हवी.क्रांतिकारकांचा भर होता जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्यावर आणि त्यातूनच पुढे जाऊन इंग्रज सत्ता सशस्त्र क्रांतीने उलथवून लावण्यावर.हे सगळे वाचायला मजा वाटते आणि ए.सी खोलीत बसून "गांधींनी काय केले" असे म्हणणेही सोपेच आहे. पण जर आज मी घरी आलेले झुरळही मारण्यापूर्वी शंभरवेळा विचार करणार असेन तर सशस्त्र क्रांती वगैरे या सगळ्या माझ्यासारख्यांसाठी बोलायच्या गोष्टी नाहीत का? एका झुरळाला मारायला हातात झाडू घेताना मी शंभर वेळा विचार करत असेन तर एका माणसाला (इंग्रज असले तरी ते माणूसच) मारायला मी बंदूक हातात धरेन ही शक्यता फारच कमी (अगदी शून्यच).तेव्हा समजा आज इंग्रज असते तर एकतर मी स्वातंत्र्यलढ्यात काहीही केले नसते किंवा काही केले असतेच तर ते म्हणजे गांधींच्या अहिंसक चळवळीतच सामील झालो असतो हीच शक्यता जास्त नाही का? असे असेल तर "गांधींनी काय केले" असे म्हणायचा मला काय अधिकार? (इथे "मी" हे मिसळपाववर हे वाचणाऱ्या बहुतेक सगळ्यांना लागू होते)

२. अनेकदा आपण ’क्रांतिकारक’ या एका लेबलाखाली सशस्त्र क्रांती करणाऱ्या सगळ्यांना एकत्र क्लब करतो.पण अशा क्रांतिकारकांच्या विचारधारांमध्ये मूलभूत फरक होता हे विसरतो.उदाहरणार्थ क्रांतिकारकांमध्ये हिंदुत्ववादी आणि कम्युनिस्ट अशा भिन्न विचारधारा होत्याच ना? त्या दोन विचारधारेच्या लोकांचे एकमेकांशी मूलभूत मतभेद आहेतच ना? समजा सशस्त्र क्रांतीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते तरी त्यानंतर या भिन्न विचारधारेच्या नेत्यांमध्ये नंतर खटके (कदाचित हिंसक खटकेही) उडालेच नसते असे आपण कोणत्या आधारावर बोलतो?

अफगाणिस्तानात रशियन होते तोपर्यंत रशियनांना हाकलायचे या एका ध्येयासाठी अहमदशाह मसूद, गुलबुद्दिन हिकमतयार, अब्दुल रशीद दोस्तम यासारखे अनेक एकत्र लढले.पण रशियन गेल्यानंतर पुढे काय याविषयी त्यांची मते भिन्न होती. उदाहरणार्थ कोणी त्यातील कोणी पश्तू होते तर कोणी ताजिक.त्यांच्यातून विस्तव जात नाही हे तर नक्कीच.रशियन असेपर्यंत सगळे एकत्र होते पण नंतर त्यापैकी प्रत्येकाला आपापला वंश नव्या राज्यव्यवस्थेत प्रबळ व्हावा असेच वाटत होते.आणि नंतर ते एकमेकांच्या उरावर बसले नाहीत का? तसेच भारतातही झाले असते का हा जर-तरचा विषय झाला.पण ती एक शक्यता नव्हती का?

एक उदाहरण द्यायचे झाले तर मला स्वत:ला स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट राज्य आलेले अजिबात आवडले नसते पण सावरकरांना अभिप्रेत असलेले हिंदुराज्य आलेले आवडले असते.तेव्हा माझ्यासारख्यांनी भगतसिंगांना स्वातंत्र्यापूर्वी डोक्यावर घेतले असले तरी त्यानंतर त्यांचे कम्युनिस्ट राज्य आणायचे प्रयत्न माझ्यासारख्यांना नक्कीच आवडले नसते.सुभाषबाबू यशस्वी होऊन जर जपानी नामानिराळे राहिले असते तर ठिक पण इंग्रज जाऊन हिटलरचा दुसरा अवतार जपानी आले असते तर ते मलातरी नक्कीच आवडले नसते.

तेव्हा मला वाटते की एकाच ध्येयासाठी विविध विचारसरणीचे लोक लढत असतात तेव्हा त्यात हा धोका inherent असतो.

३. मूळ लेखात आर्थिक कारणांचा मुद्दा आणला आहे.सुरवातीच्या काळात इंग्रज भारतातून कापूस घेऊन जात आणि मॅंचेस्टरच्या कापड गिरण्यांमध्ये इंग्रजी कापड बनवून भारतात विकत आणि त्यातून भारताची त्यांनी मोठी लूट केली.त्यावर विदेशी कपड्यांवर बहिष्कार हे स्वातंत्र्यलढ्यातील एक सूत्र होते.विदेशी कपड्यांची पहिली होळी सावरकरांनी १९०६ मध्ये पुण्यात केली असे वाचले आहे.गांधींनी त्याच्यापुढे जाऊन खादीचा पुरस्कार केला.त्यातूनच भारतीय लोकांचा इंग्रज कपड्यांवरील dependence कमी झाला हा आर्थिक मुद्दा आपण का विसरतो?

४. अगदी अलिकडच्या काळापर्यंत मला वाटायचे की "अमुकअमुक कॉंग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला" हे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे टप्पे कसे असू शकतात? त्यावर अधिक विचार केल्यावर मला जाणवले की स्वातंत्र्यचळवळ किंबहुना स्वातंत्र्याची कल्पनाच सामान्यांपर्यंत न्यायची सुरवात टिळकांनी केली पण गांधींनी ती घरोघरी पोहोचवली.त्यापूर्वी स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्य कशासाठी किंवा स्वातंत्र्याची गरजच काय या गोष्टी आपल्या समाजाला पूर्णपणे उमगलेल्या होत्या असे नक्कीच म्हणता येणार नाही.पण ते काम गांधींच्या अहिंसक चळवळीतून आणि दरवर्षी विविध कॉंग्रेसमधून पास झालेल्या ठरावांमधून झाले. अशाच वातावरणातून लोकांना इंग्रज राजवटीचे दुष्परिणाम समजून क्रांतिकारक जन्माला यायची शक्यता जास्त नव्हती का?जर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीच्या लढ्याला संतांच्या कार्याची पार्श्वभूमी होती हे आपण म्हणतो तर असेच प्रबोधनाचे काम गांधीजी करत होते. मग ते कमी महत्वाचे कसे?

असो.