Sunday, October 3, 2010

बुध्दीवादी म्हणजे ज्याची बुध्दी कायम वादात पडलेली असते असा नव्हे

बाबर या परकिय आक्रमकाने मीरबांकीकरवी एत्तद्देशीयांपेक्षा आम्ही श्रेष्ठ हे सिध्द करण्यासाठी बहुसंख्य जनतेला जे मंदिर पवित्र वाटते तेच उध्वस्त करून तिथे मशीद बांधली असेच मला वाटते.आमच्यात अगदी टोकाचे मतभेद असतीलही पण परकिय शत्रू येऊन इथे नासधूस करू पाहत असेल तर खबरदार-- आम्ही सगळे एक आहोत.मी भले देवळात कधी जाणार नाही पण परकिय आक्रमकांनी इथले देऊळ पाडले तर ते ही मला आवडणार नाही.याच एका कारणाने ’दगडाच्या मूर्तीत देव नाही’ असे मला वाटत असूनही राममंदिर आंदोलनाचे मात्र मी कायम समर्थनच केले आहे.

१९९० साली अडवाणींच्या रथयात्रेदरम्यान रा.स्व.संघाने राममंदिर आंदोलनावर एक पुस्तिका वाटली होती. त्यात रामजन्मभूमी मुक्त करायचे ७५ प्रयत्न हिंदूंनी केले आणि त्यात ३ लाखांहूनही हिंदूंनी बलिदान केले असा उल्लेख त्यात होता. तसेच खुद्द बाबराने मीरबांकीला ’अयोध्येतील मंदिर उध्वस्त करून ये आणि मशीद बांध’ असे सांगितल्याचा उल्लेख त्या पुस्तिकेत होता हे वाचल्याचे पक्के आठवते. या सगळ्या गोष्टींचा एकही ऐतिहासिक पुरावा सापडणार नाही हे जरा अशक्यच वाटते. तेव्हा पुस्तिकेतले दावे पडताळून नक्कीच बघता येतील. या आणि अशा गोष्टींचा न्यायालयापुढे परामर्श झाला असावा असे वाटते.

दुसरे म्हणजे राम अयोध्येत जन्मला याचे अयोध्या म्युन्सिपाल्टीचे बर्थ सर्टिफिकेट बरेच लोक मागतात.पण हेच लोक येशू ख्रिस्ताचे बेथलेहॅम म्युन्सिपाल्टीचे बर्थ सर्टिफिकेट मागायला जात नाहीत.तसेच प्रेषिताला मक्केजवळच्या गुहेत देवदूताने दृष्टांत दिला याचा पुरावा काय हे मागायला जात नाहीत.या सगळ्या गोष्टी श्रध्देचा भाग म्हणून सोडल्या जातात मग केवळ रामाचेच बर्थ सर्टिफिकेट का मागायला जातात? त्याहूनही महत्वाचे की राम तिथे जन्मला की नव्हता ही गोष्ट गौण झाली.केवळ एतद्देशीयांना ते मंदिर पवित्र वाटते या कारणासाठी हे उध्वस्त केले असेल तर रामाचा जन्म तिथे झाला असला किंवा नसला तरीही त्या मंदिराचीच पुनर्स्थापना तिथे व्हावी असे म्हटले तर त्यात काय चुकले?

तिसरे म्हणजे मंदिरे पाडून मशीदी उभारल्या अशी अनेक ठिकाणे भारतात आहेत. तोगाडिया म्हणतात की अशी ठिकाणे ३००० आहेत. खरे खोटे माहित नाही पण तीनपेक्षा तर नक्कीच जास्त! ही सगळी ठिकाणे परत मागणे आताच्या काळात योग्यही होणार नाही आणि त्याची गरजही नाही. पण आम्हाला सर्वात पवित्र असलेली केवळ तीन ठिकाणे द्या-- अयोध्या, काशी आणि मथुरा अशी मागणी आंदोलनात केली गेली.म्हणजे ३००० वरून (की तीन पेक्षा बऱ्याच मोठ्या आकड्यावरून) हिंदू तीनवर खाली आले ही मोठी तडजोड हिंदूंनी केलीच की नाही? तरीही एकाही स्युडोसेक्युलरवाद्याने मुस्लिमांना तुम्हीपण शुन्यावरून तीनवर जा असे का सांगितले नाही?त्यावेळी कुठे होती शबाना आझमी, शाहिद सिद्दीकी ही मंडळी? म्हणजे शांतता जपण्यासाठी केवळ हिंदूंनीच तडजोड करावी असे का? याउलट मी म्हणतो की अगदी सुरवातीला तीनवर (किंवा अगदी एकवरही-- अयोध्या) तडजोड स्विकारली गेली असती तर आज भारतात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे युग अवतरले असते.आणि मग बाबरी पाडणे, १९९२-९३ च्या दंगली, गुजरात दंगली या दुर्दैवी घटनाही टाळता आल्या असत्या आणि नरेंद्र मोदी आणि तोगाडिया या कट्टरांना आज जे समर्थन मिळते ते मिळायचे काही कारण नव्हते.

चौथे म्हणजे न्यायालयाचा निर्णय अपेक्षेपेक्षा चांगला लागूनही हिंदू आंदोलनातील रा.स्व.संघाचे सरसंघचालक भागवत यांनी ’हा कोणाचाही विजय नाही की पराभव नाही’ अशी संयमित प्रतिक्रिया दिली. तसेच इतर कोणीही आततायीपणाच्या प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. पण बुखारी म्हणतात की Muslims betrayed . मुलायमसिंह थयथयाट करतात. त्याविषयी मिडियावाले काहीच का बोलत नाहीत? उलट मनोज मित्ता (हा कोण मित्ता कोणाला माहित) सारखे लोक अयोध्याप्रश्नी न्यायालयाचा निकाल म्हणजे placing religious sentiment above the rule of law असे कसे म्हणतात आणि मुख्य म्हणजे टाईम्स ऑफ इंडियासारखे वर्तमानपत्र त्या मताला प्रसिध्दी कसे देते? म्हणजे न्यायमूर्तींपेक्षा कायदा या मित्ताला जास्त चांगला कळतो असा अर्थ घ्यायचा का? न्यायालयाच्या निर्णयावर अशाप्रकारची टिप्पणी केल्याबद्दल यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका का ठेऊ नये?

असो. मी स्वत:ला एक बुध्दीवादी माणूसच मानतो पण ’मी नाही त्यातला’. वर दिलेले चार मुद्दे कोणाच्या लक्षात आले नसतील असे नाही पण या इतर बुध्दीवाद्यांची बुध्दीच वादात अडकली असल्यामुळे त्यांना बहुदा या गोष्टी दिसत नसाव्यात.

(गणपतीपुळ्याच्या मंदिरापेक्षा अथांग सागराचे अधिक आकर्षण असलेला तरीही राममंदिराला पाठिंबा देणारा) मी

5 comments:

Pravin said...

अतिशय छान व संतुलित लेख. मी तुमच्याशी अगदी सहमत आहे.मी व्यक्तिश: देव देव करणारा माणूस नाही ,लेख माझा विश्वास नाही परंतु खरा इतिहास उजेडात आणण्याऐवजी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू समाजाला नेहरूंच्या काळापासून त्यागाचे आणि संयमाचे डोस पाजणार्या ढ़ोंग्यांविषयी मला तीव्र चीड आहे.तुम्ही कृपया तुमची ही पोस्ट एक लेख म्हणून इंग्लिश मध्ये टाइम्स ऑफ़ इंडिया,इंडियन एक्सप्रेस, परदेशी वृत्तपत्रांमध्ये (पाकिस्तानचे DON) व शेकडो इंग्लिश/हिंदी ब्लोग्स मध्ये प्रसिध्द करावी अशी माझी नम्र विनंती आहे. पुन्हा एकदा धन्यवाद !

Anonymous said...

घटनेत धर्मस्वातंत्र्याची तरतूद आहे. तिच्या आधारे या निर्णयाचे समर्थन होऊ शकते. अपिलांत ते स्पष्ट होईलच.

Anonymous said...

> याउलट मी म्हणतो की अगदी सुरवातीला तीनवर (किंवा अगदी एकवरही-- अयोध्या) तडजोड स्विकारली गेली असती तर आज भारतात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे युग अवतरले असते.
>-----

भलताच भाबडा आशावाद बाळगू नका. या दोन धर्मांमधले वैर वेगवेगळ्या कारणांनी सुरूच राहील.

विक्रम एक शांत वादळ said...

Atishay sudar lekh sarv mudde patatat :)

zampya said...

वाचून तुम्हाला हसायला येईल पण खूप मोठी प्रतिक्रिया मी लिहिलेली याआधी पण पोस्ट होऊ शकली नाही thanks to f****Blogger

असो पुन्हा एवढी मोठी प्रतिक्रिया टायपायचे त्राण नाहीत..त्यामुळे Next time... एवढेच लिहितो...खूप मनापासून तुमच्या पुढील लेखाची वाट पाहतोय...

धन्यवाद
झम्प्या झपाटलेला