Wednesday, May 26, 2010

राजीव गांधींवरील माझ्या लेखावरील प्रतिक्रियेस माझे उत्तर -- भाग ४

पूर्वीची चर्चा

मूळ लेख
भाग १
भाग २
भाग ३


>>निव्वळ लालूप्रसादांची पत्नी म्हणून राबडी देवी मुख्यमंत्री झाली, हे तुम्हाला खटकत नाही? बिहारच्या लोकांना काय वाटतं, वगैरे सोडा. तुम्हाला काय वाटतं? मग तोच न्याय राजीवला लागत नाही?

मी लोकशाहीचे समर्थन करतो याचा अर्थ असा नाही की जो जनादेश लोक देतात तो मला आवडतो. माझा मुद्दा हा की तो जनादेश मला आवडत नसला तरी मी वर म्हटल्याप्रमाणे ’आदर’ तर नक्कीच करतो. उत्तर प्रदेशात मायावती, मुलायम सिंह अशी मंडळी मुख्यमंत्री बनतात आणि (माझ्या मते) चांगले काम करत नाहीत तरी परत परत निवडून येतात या गोष्टीचे मलाही वाईट वाटते. मायावती-मुलायम सिंह ही मंडळी घराणेशाहीमधून सत्तेवर आलेली नाहीत. तरीही त्यांचे वारंवार जिंकणे मला आवडत नाही याचे कारण (माझ्या मते) त्यांचे काम चांगले नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही आदर्श व्यवस्था नक्कीच नाही.आणि अनेकदा लोकशाहीत लोकांनी दिलेल्या जनादेशामुळे अधिक योग्य व्यक्तींना संधी मिळत नाही. अमेरिकेत अडलाई स्टिव्हनसन हे ’Able men who could not win presidency’ मधील एक होते. तसेच अल गोर यांना तर बुश यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. तरीही इलेक्टोरल कॉलेज पध्दतीतील त्रुटींमुळे ते अध्यक्ष बनू शकले नाहीत. आपल्या राज्यपध्दतीत लोकसभेत/विधानसभेत बहुमत असलेली व्यक्ती पंतप्रधान/मुख्यमंत्री बनू शकते आणि त्यातूनच राबडी देवींसारखे लोक सत्तेत जातात. लोकशाही पध्दती राबविण्याची ही किंमत मोजावी लागते.

त्यात स्वत:चे वैयक्तिक मत आणि जनादेश या दोन गोष्टी परस्परविरोधी असू शकतात. राबडी देवी लालूंची पत्नी म्हणून मुख्यमंत्री झाली हे मला नक्कीच खटकते. १९८४ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मी लहान होतो आणि राजकारण वाचत नव्हतो. पण उद्या समजा राहुल गांधी त्यांचे कर्तृत्व सिध्द करायच्या आधी पंतप्रधान झाले तर ते अयोग्यच असेल हे माझे मत आहे. पण तरीही मी माझ्या पातळीवरून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करताना तो पूर्वग्रह नक्कीच ठेवणार नाही. आणि त्यांच्या कारभारावर माझे मत बनवेन.आणि माझे मत चांगले असेल तर जरूर राहुल गांधींच्या पक्षाला मत देईन. हाच न्याय राजीव गांधींनाही लागू पडतो. मी १९८९ साली समजा मत दिले असते तर राजीव गांधींचा कारभार (त्यात बोफोर्स पासून पंजाब प्रश्नाची हाताळणी, नवीन बदल घडवून आणणे वगैरे) या सगळ्यांचा विचार केला असता. आज मागे वळून बघताना टेलिफोन आणि संगणक क्षेत्राची पायाभरणी करणे यासारख्या त्यांनी घेतलेल्या पावलांचे महत्व कळते.पण त्यावेळी मत बनवताना बहुसंख्य मतदारांकडे तेवढा परिपक्व दृष्टीकोन होता असे वाटत नाही. तेव्हा राजीव गांधींच्या कारभाराचे मूल्यमापन करताना या गोष्टीकडे पुरेसे गांभीर्याने बघितले गेले असेल असे वाटत नाही.

बहुदा १९८४ मध्ये मी स्वत: मत राजीव गांधींविरोधीच दिले असते (१००% खात्रीने सांगत नाही) पण जर मी मत विरोधी दिले असते तर त्यात घराणेशाहीला विरोध यापेक्षाही राजीव गांधींचे कर्तृत्व सिध्द झालेले नाही असा विचार केला असता. १००% खात्रीने सांगत नाही असे म्हटले याचे कारण असे मत देताना त्यांना असलेला पर्याय कोणता याचाही विचार करायला हवा. उदाहरणार्थ सध्याच्या काळात मला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायला मत द्यायचे जरी नसले तरी त्यांच्या विरोधकांनी सावळा गोंधळ घातला आहे याचा विचार करायलाच हवा. माझे स्वत:चे मत कम्युनिस्ट आणि तिसऱ्या आघाडीविषयी अजिबात चांगले नाही तेव्हा त्यांना मत देणे माझ्यासाठी केवळ अशक्य. विरोधकांमध्ये राहिला भाजप. सध्याच्या भाजप नेतृत्वामध्ये पंतप्रधानच नव्हे तर इतर खाती सांभाळायला योग्य व्यक्ती आहेत का याचाही विचार व्हायला हवा. अडवाणी निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नेत्यांमध्ये राहिले मुरली मनोहर जोशी. तो मनुष्य शरिराने २१ व्या शतकात असला तरी मनाने मात्र अनेक शतके पूर्वीच्या भारतात वावरतो असे माझे मत आहे. (अणुशास्त्रासारख्या विषयाचा प्राध्यापक असे कसे करू शकतो याचे मला नेहमी नवल वाटते). जसवंत सिंह तर पक्षाबाहेर आहेत. त्यांना पक्षात परत घेणार असे म्हटले जात आहे तरी ते विश्वासार्ह राहिले आहेत का हा प्रश्न आहे. कारण २००४ ते २००९ दरम्यान त्यांनी पक्षाला अडचणीत आणणारी एकामागोमाग एक खळबळजनक विधाने केली. कधी म्हणतात की नरसिंह रावांच्या कार्यालयात अमेरिकेचा हेर होता तर कधी म्हणतात की कंदाहारसारखी घटना परत घडली तर मी दहशतवाद्यांना सोडायला मागेपुढे बघणार नाही. एकीकडे अडवाणी त्यांच्या पुस्तकात म्हणतात की त्यांना कंदाहार प्रकरणी दहशतवादी सोडणार याची कल्पना नव्हती तर जसवंत सिंह म्हणतात की त्यांच्या सरकारने या निर्णयाबद्दल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने मनमोहन सिंह यांच्याशी चर्चा केली होती. म्हणजे सरकारला त्यांच्या गृहमंत्र्यापेक्षा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते चर्चा करायला अधिक योग्य वाटत होते असा अर्थ घ्यावा का? नितीन गडकरींनी तर भाजप अध्यक्ष म्हणून स्वत:चा ठसा उमटवलेला नाही.सध्याच्या जगात नवेनवे शास्त्र तंत्रज्ञान, अर्थकारण या गोष्टींना अधिक महत्व आले आहे. तसेच WTO आणि जागतिक व्यापार या गोष्टींना यापुढील काळात अधिकाधिक महत्व येणार आहे कारण नव्या आर्थिक धोरणांनंतर बदललेल्या भारताला या गोष्टींमध्ये मोठी संधी मिळणार आहे. अशा वेळी संघाच्या मुशीत वाढलेले स्वदेशीप्रेमी लोक अधिकारपदावर असावेत का याचा विचार करावाच लागेल. अशा अनेकविध विषयांवर स्वत:चा अभ्यास करून मते मांडू शकणारे केवळ अरूण शौरी आणि अरूण जेटली हे दोनच नेते आणि काही प्रमाणात सुषमा स्वराज आहेत असे मला वाटते. मधल्या काळात संघाची पार्श्वभूमी नसलेल्या अरूण शौरींनाही त्रास दिला गेलाच होता. तेव्हा त्यांच्या हातात सत्ता आल्यास त्यांना किती स्वतंत्रपणे निर्णय घेता येतील हा एक प्रश्नच आहे. वरूण गांधींविषयीतर बोलायलाच नको. नरेंद्र मोदी लोकप्रिय आणि विकासाभिमुख नेते असले तरी गुजरात दंगलप्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर (आणि भारतातही) मान्य होतील असे वाटत नाही. येडियुरप्पांनी विकासकामांपेक्षा स्वत:च्या प्रसिध्दीचा धडाका जास्त लावला आहे असे वाटते.मी वर्षभर The Hindu ची बंगलोर आवृत्ती दररोज वाचत होतो. त्यात येडियुरप्पांचा फोटो नाही असा क्वचितच एखादा दिवस गेला असेल. तसेच रेड्डी बंधू प्रकरणी त्यांची वर्तणूक जबाबदारीची होती असे म्हणायला अवघड जाते.

याउलट कॉंग्रेसमध्ये चिदंबरम, प्रणव मुखर्जी, कमल नाथ, कपिल सिब्बल यासारखे नेते आहेत. निदान ते भूतकाळात रमण्यापेक्षा भविष्याचा विचार करतात असे वरकरणी तरी वाटते. त्यातच भाजपने घातलेल्या गोंधळाविषयी तर बोलायलाच नको. त्याविषयीच्या माझी मते मागच्या वर्षी लिहिलेल्या भाजपविषयी या लेखात. तेव्हा कॉंग्रेस परवडली पण भाजप नको असे लोकांना वाटून राहुल गांधींचा by default विजय झाल्यास त्याला जबाबदार कोण? विरोधी पक्षात असताना कॉंग्रेस नेत्यांनी आपापसात भांडणे करणे, बेजबाबदार विधाने करणे असले प्रकार केलेले नव्हते.पण भाजप नेत्यांनी नेमके हेच प्रकार करून स्वत:ची विश्वासार्हता (माझ्या लेखी) कमी करून घेतली हे तर नक्कीच.

अर्थातच मी माझे नक्की मत अजून बनवलेले नाही कारण २०१४ ला अजून ४ वर्षे वेळ आहे. पण या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचे कर्तृत्व सिध्द झालेले नसणे हाच त्यांच्यासाठी Positive point झाला नाही तर मिळवली. कारण ज्यांचे कर्तृत्व सिध्द झाले आहे अशांनी इतका गोंधळ घातला आहे तर त्यापेक्षा कर्तृत्व सिध्द न झालेले परवडले कारण ते चांगले निघायची थोडीशी तरी शक्यता आहे असे लोकांना (आणि मला सुध्दा) वाटायला लागू नये हीच इच्छा.

No comments: