Wednesday, May 26, 2010

राजीव गांधींवरील माझ्या लेखावरील प्रतिक्रियेस माझे उत्तर -- भाग ३

या पूर्वीची चर्चा

मूळ लेख
प्रतिसाद १
प्रतिसाद २

विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते--'Democracy is not the best institution but unfortunately we do not know any other institution that is better'. लोकशाहीच्या मर्यादा आहेत याबद्दल दुमत व्हायचे कारणच नाही. पण म्हणून हुकुमशाही आणणे म्हणजे रोगापेक्षा औषधच गंभीर अशी परिस्थिती होईल. त्यामुळे मी तरी लोकशाहीच्या मर्यादा मान्य करूनही लोकशाहीचाच समर्थक आहे.

आता आपणच दिलेले सवाई गंधर्वातील गायकीचे उदाहरण घेऊ. समजा अशा महोत्सवामध्ये संगीतातले बारकावे माहित असलेलेच सगळे श्रोते गेले तर त्यांना चांगल्या दर्जाचा गायक आणि सुमार दर्जाचा गायक यामधला फरक कळायला फारसा वेळ लागणार नाही.पण समजा श्रोत्यांमध्ये माझ्यासारखे श्रोतेही गेले (ज्यांना संगीतातले काहीही कळत नाही) तर त्यांना तो फरक कळणार नाही. आणि संगीत कळत असलेल्या श्रोत्यांमध्येही १००% लोक एखाद्या गायकाला चांगला आणि दुसऱ्या गायकाला सुमार म्हणतीलच असे नाही. मला संगीतातले फारसे कळत नाही म्हणून अभिनय क्षेत्राचे उदाहरण देतो. तरी त्यामुळे मूळ मुद्दा बदलत नाही. प्रत्येकाला अभिनेता आवडण्यामागे/नावडण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. कोणाला अभिनेत्याच्या आवाजातील चढउतार आवडतात तर कोणाला देहबोली. कोणाला चेहऱ्यावरील हावभाव आवडतात तर कोणाला अजून काही.प्रत्येकाला अभिनेत्याची कोणती गोष्ट भावेल याचे काही गणिती सूत्र नक्कीच नाही.त्यामुळेच कोणाला तीन खानांमधला एक आवडतो तर कोणाला हृतिक. आता समजा एखाद्याला आमिर खान आवडत असेल त्याने शाहरूख समर्थकाला चुकीचे म्हटले तर तो त्याच्या बाजूने बरोबरच असतो. पण असे चुकीचे म्हणणे योग्य आहे का? कारण त्याच न्यायाने इतर अभिनेत्यांचे समर्थक आमिर समर्थकाला चुकीचे म्हणतील. तेव्हा चित्रपट क्षेत्रातल्या दोन दर्दी आणि माहिती असलेल्या व्यक्तींचे कोणता अभिनेता चांगला यावर एकमत होणे कठिण आहे.

आता वळू या लोकशाहीकडे.आपण शिकले-सवरलेले, चांगल्यापैकी नोकरी/व्यवसाय असलेले आणि आज दोन वेळेला जेवायला मिळाले तरी उद्या मिळेल का असा प्रश्न न पडणारे लोक आहोत. आपल्या सारख्यांना कदाचित राष्ट्राचा अभिमान (म्हणून राम मंदिर, अणुचाचण्या, भारताच्या पंतप्रधानपदी परदेशात जन्मलेली व्यक्ती नको, स्वीस बॅंकेतून पैसे परत आणणे वगैरे) मुद्दे भावतील कारण आपण हातावर पोट असलेल्यांना हे मुद्दे भावतील का? काही काळ प्रचारतंत्र जोरात वापरून त्यांना या मुद्द्यांचे महत्व जरूर पटवून देता येईल पण ते फार काळ चालणार नाही. १९९० मध्ये लालूप्रसाद यादवांनी बिहारच्या मागासवर्गीय जनतेला सांगितले--’मै आपको स्वर्ग तो दे नही सकता लेकिन स्वर तो जरूर दुंगा’. पिढ्यानपिढ्या जातीव्यवस्थेच्या ओझ्याखाली लपलेल्या त्या मतदारांना या गोष्टीचे आकर्षण वाटले नसेल तर नवलच. तसेच ’कॉंग्रेस का हाथ आम आदमी के साथ’ ही कॉंग्रेस पक्षाची घोषणा अशा हातावर पोट असलेल्यांना आपल्यासाठी वाटली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आता आपण आपल्या बाजूने विचार केला तर अशा लोकांचे मत जरूर चुकीचे वाटेल पण आपण स्वत: त्यांना आयुष्यात येत असलेल्या हालअपेष्टांना सामोरे गेलेलो नसल्यामुळे ते नक्की कसा विचार करतात आणि त्यांना काय भावते हे आपल्याला सांगता येणे कठिण आहे. यात अनेकदा होते असे की राजकारणी मंडळी भूलथापा देऊन या सामान्य जनतेला हातोहात फसवतात. असे म्हणतात की Public memory is short. त्यामुळे राजकारणी मंडळी आपला स्वार्थासाठी वापर करत आहेत हे त्यांना समजायला उशीर होतो. हे सर्व बाजूंसाठी तितकेच लागू होते. आपल्यासारखे लोक बिहारच्या जनतेने लालू यादवांना आणि राबडीदेवींना वर्षानुवर्षे निवडून कसे दिले, कॉंग्रेसने ’फारसे काही न करता’ त्यांचा पक्ष एकामागून एक निवडणुका कशा जिंकतो किंवा पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट वर्षानुवर्षे निवडून कसे येतात हा प्रश्न जरूर विचारू. पण त्याचवेळी कॉंग्रेस समर्थक मुंबई महापालिकेत काहीही न करता शिवसेना कशी निवडून येते किंवा गुजरात दंगलींमध्ये हात असूनही (खरा-खोटा भगवंतालाच माहित) नरेंद्र मोदी निवडून कसे येतात असे प्रश्न विचारतील. आता असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या आमीर खान समर्थकाने ’काय तो इतरांना सलमान खान आवडतो समजत नाही. आमचा आमीर किती चांगला अभिनय करतो’ असे म्हटल्यासारखे आहे. असा प्रश्न विचारून उपयोग नाही कारण दोन अभिनेत्यांचे समर्थक वेगळ्या मापदंडांवर दोन अभिनेत्यांना मोजतात. त्यामुळे निर्णयात थोडी तरी subjectivity येतेच.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका चीनधार्जिणी आहे हे वेळोवेळी दिसून आलेलेच आहे. किंबहुना त्या पक्षाचा जन्मच १९६२ च्या युध्दानंतर चीनचे समर्थन या मुद्द्यावर झाला आहे. तरीही ते बंगालमध्ये मतदारांना त्यांना भावेल ती गोष्ट देतात किंवा निदान तसा आभास तरी निर्माण करतात.त्यामुळेच बंगालमध्ये त्यांचा पक्ष वर्षानुवर्षे निवडून येऊ शकतो. ज्या पक्षाच्या निष्ठा भारताबाहेर आहेत तो पक्ष वर्षानुवर्षे निवडून येणे किंवा भारताने पाकिस्तानला २००० कोटी रुपये द्यावे अशी जाहिर मागणी करणाऱ्या मुलायम सिंह यादवांचा पक्ष निवडून येणे हीच लोकशाहीची मर्यादा आहे असे मला वाटते. पण अनेकदा जातीपातींचे गणित राष्ट्रहितापेक्षाही महत्वाचे ठरते आणि त्यातून निवडणुकांमध्ये असे निकाल लागतात.

कोणी म्हणेल की भारतात साक्षरतेचे आणि शिक्षणाचे प्रमाण कमी आहे म्हणून अशा मुद्यांना महत्व दिले जाते. पण अगदी उच्चशिक्षित आणि बुध्दीमत्तेचे वरदान असलेल्यांचे तरी एकमत कुठे होते? अरूण जेटली, कपिल सिब्बल आणि सोमनाथ चॅटर्जी हे तीन उच्चशिक्षित, बुध्दीजीवी, बुध्दीमत्तेचे वरदान असलेले आणि हातावर पोट नसलेले well to do राजकारणी आहेत. तरी त्यांचे एकमत होत नाही हे उघडच आहे. राजकारण्यांचे सोडाच आपल्यासारख्याच पार्श्वभूमीतून आलेले तीन लोक घेतली तरी त्यांची राजकिय मते सारखीच असतील असे खात्रीने सांगता येत नाही. अगदी एकाच घरी वाढलेल्या भावंडांमध्येही अनेकदा हा फरक असतो. सोमनाथ चॅटर्जींचे वडिल निर्मलचंद्र चॅटर्जी हिंदुत्ववादी नेते होते आणि सोमनाथदा डाव्या विचारसरणीचे. आता या फरकाचे उत्तर काय? मनुष्यस्वभाव दुसरे काय? तेव्हा आपण अगदी म्हटले की सवाई गंधर्व महोत्सवाला संगीतातल्या दर्दी लोकांनीच जावे तरी त्यांच्यात एकवाक्यता व्हायची शक्यता जरा कमीच.

आता लोकशाहीत जनमताचा आदर करावा म्हणजे काय? आपले एक ठाम मत आहे ते चांगलेच आहे. आपले स्वतंत्र मत ठेवायचा आणि कायद्याच्या चौकटीत ते मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. समजा एखाद्या निवडणुकीत जनादेश आपल्या मताविरूध्द गेला तर सर्वप्रथम तो खळखळ न करता स्विकारावा. पुढचे पाऊल म्हणजे तो नक्की आपल्या विरूध्द का गेला याचा अभ्यास करावा आणि लोकांपुढे आपली बाजू मांडावी. लोकांना ती पटली तर लोक पुढच्यावेळी आपल्याला निवडून देतीलच. आणि आपली भूमिका मांडण्यातही एकवाक्यता हवी. अखंड भारताचे स्वप्न बघणाऱ्याच पक्षाचे महत्वाचे नेते भारताच्या फाळणीत महत्वाची भूमिका असलेल्या जीनांचे गोडवे गाऊ लागतात तेव्हा मात्र काही प्रमाणात का होईना जनतेत दिशाभूल करणारे संदेश पाठवतात आणि त्यातून आपल्या पक्षाचे झाले तर नुकसानच होईल फायदा तर नक्कीच नाही.

लोकशाहीचे महत्व काय? या पध्दतीत विविध मतेमतांतरे असलेले लोक शांततेला बाधा आणू न शकता आपले मत जनतेपुढे मांडू शकतात. ’माझे मत पटत नाही काय? मग घालतो गोळी’ अशा प्रकारच्या प्रवृत्तीने भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. आणि त्यातून गोळी घालणारे आपण असू तरी एक वेळ ठिक. पण कधीतरी गोळी खायची वेळही आपल्यावर येणारच आहे हे लक्षात घेतले की लोकशाही व्यवस्थेचे महत्व प्रकर्षाने जाणवते.

3 comments:

Naniwadekar said...

क्लिंटन साहेब : मूळ मुद्‌दा होता तो कॉग्रेसमधे घराणेशाही आहे का? त्यावर तुमची पळवाट की 'पण ज़े काही आहे ते लोकांना मान्य आहे'. लोकांना ते मान्य आहे हे कोणालाच अमान्य नाही. 'ज़े काही आहे' त्याला घराणेशाही म्हणावे का, हा प्रश्न आहे. पुढे माधवराव पेशवा थोर निघाला, बाजीराव पेशवा नालायक निघाला, संभाजी दारुडा आणि स्त्रीलम्पटही होता आणि शत्रूला मिळालाही होता; आणि अत्यंत शूरही होता आणि डोळे फोडल्या गेले पण धर्म सोडला नाही, वगैरे वगैरे सोडा. ते सत्तेवर आले याचं पहिलं आणि शेवटचं कारण म्हणजे ते एका घराण्याचे होते. राजीवला पक्षनेतेपद मिळालं ते त्याच एकमेव कारणामुळे. (ते जनतेला खटकलं नाही वगैरेची चर्चा नको, कारण त्याबाबत आपला मतभेद नाहीच.)

तेव्हा आधी विचारलेला प्रश्न परत :
निव्वळ लालूप्रसादांची पत्नी म्हणून राबडी देवी मुख्यमंत्री झाली, हे तुम्हाला खटकत नाही? बिहारच्या लोकांना काय वाटतं, वगैरे सोडा. तुम्हाला काय वाटतं? मग तोच न्याय राजीवला लागत नाही?

- डी एन

हेरंब said...

>> संभाजी दारुडा आणि स्त्रीलम्पटही होता.

नानिवडेकर, तोंड सांभाळावे ही माफक अपेक्षा !!!!!!

Naniwadekar said...

> बाजीराव पेशवा नालायक निघाला, संभाजी दारुडा आणि स्त्रीलम्पटही होता ...
>---

'दुसरा बाजीराव' नालायक निघाला ... असे वाचावे.

http://www.google.com/#hl=en&source=hp&q=sambhaji+maharaj&aq=f&aqi=g10&aql=&oq=&gs_rfai=&fp=754b7f73eb24aff -- 'During his reign, we find no evidence to support notions, made popular by Marathi drama and ballads, that Sambhaji was constantly drunk or drugged or in his harem.'
-- And before his reign?

http://books.google.com/books?id=1MFh_SDhibQC&pg=PA135&lpg=PA135&dq=kalusha+sambhaji&source=bl&ots=rOoJFaxNq7&sig=nOndMHaTZ5S7uj58iOALGSc_wso&hl=en&ei=Qcn9S5GwBoSuNqW-naYB&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CBIQ6AEwAA#v=onepage&q=kalusha%20sambhaji&f=false -- 'A young girl rose from the gaadi on which Sambhaji was sitting ... and fled'. 'She is shy', said Sambhaji.'

पण संभाजीला बायांमधे खरेच रस असला तर ते तुलनेनी चालण्यासारखे आहे. इंग्रजी साम्राज्य बहरात असताना ग्लॅडस्टननी पाहिलेल्या ११ पन्तप्रधानांपैकी ८ व्यभिचारी होते; साम्राज्याचा तरीही उत्कर्ष होतच राहिला. संभाजीनी दिलेरखानाशी हातमिळवणी करणे हा मोठा अपराध आहे; त्यामुळे शिवाजीच्या आयुष्याची काही वर्षे नक्कीच कमी झाली असणार.