Sunday, May 23, 2010

राजीव गांधींवरील माझ्या लेखावरील प्रतिक्रियेस माझे उत्तर

मी याच ब्लॉगवर लिहिलेल्या राजीव गांधींविषयी या लेखावर नानीवडेकर यांनी प्रतिक्रिया लिहिली. त्याला मी माझे उत्तर तयार केले आणि ते ’Comment' म्हणून लिहायचा प्रयत्नही केला पण ब्लॉगरमध्ये असलेल्या काही problem मुळे मला ती comment लिहिता आली नाही. तेव्हा माझे उत्तर मी नव्या लेखाद्वारे लिहित आहे.


कारण संजयसमोर त्यांची मात्रा चालत नसे. तो अडसर दूर होताच ते राजकारणात आले

राजीव गांधींना राजकारणात यायची अजिबात इच्छा नव्हती आणि संजयच्या मृत्यूनंतर इंदिरा गांधींना मदत करायला आणि आधार द्यायला ते राजकारणात आले हे वेळोवेळी विविध ठिकाणी स्पष्टपणे मांडण्यात आलेले आहे. आपल्या म्हणण्याचा उद्देश असा दिसतो की राजीव गांधींना राजकारणात यायचेच होते पण संजयपुढे त्यांचे काही चालत नव्हते. तेव्हा संजयचा मृत्यू ही एक संधी समजून ते राजकारणात आले! याबद्दल दोन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे.

१. जर राजीव गांधींना मुळात राजकारणात यायचेच होते आणि संजयपुढे त्यांचे काही चालत नव्हते हे क्षणभर सत्य मानले तरी राजकारणात येण्यासाठी त्यांनी कुठलाही प्रयत्न संजय असेपर्यंत केलेला दिसत नाही. एक उदाहरण द्यायचे झाले तर दक्षिणेत द्रमुक पक्षात स्टॅलीनपुढे अळागिरींचे फारसे चालत नाही. तरीही ते राजकारणात आहेत आणि करूणानिधी निवृत्त झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे यावे यासाठी प्रयत्नही करत आहेतच ना? म्हणजे राजकारणात महत्वाकांक्षा असलेल्या अळागिरींचे दुसऱ्या अधिक dominant व्यक्तीपुढे फारसे चालत जरी नसले तरी राजकारणात टिकून राहायचे, हातपाय मारायचे प्रयत्न तर केलेच/करत आहेतच ना? पण राजीव गांधींनी संजय असेपर्यंत राजकारणात साधा प्रवेश केला नाही, टिकून राहणे, वर जाण्यासाठी प्रयत्न करणे दूरच राहिले. एकिकडे म्हणायचे की त्यांना राजकारणात यायचेच होते पण त्यासाठी त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही (अगदी कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेणे सुध्दा) हे गणित कसे सोडविणार?

२. संजयचा मृत्यू झाला जून १९८० मध्ये.राजीव गांधींनी वैमानिकाच्या नोकरीचा राजीनामा त्यानंतर ७-८ महिन्यांनी दिला. दरम्यानच्या काळात इंदिरा गांधींचा त्यांना राजकारण प्रवेशाविषयी आग्रह चालू होता. त्या आग्रहाला ७-८ महिन्यांनी यश आले. राजीव गांधी स्वत:च्या आईच्या आग्रहाला ते नाही म्हणू शकले नाहीत. जर राजीव गांधींना आधीपासून राजकारणात यायचे होते आणि संजयचा ’अडसर’ दूर झालेलाच होता तर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करायला एवढे महिने का लावले?

आज़ पाकिस्तान, इराण वगैरेंमधेही इंटरनेटचे चांगले ज़ाळे आहे. ते भारतातही राजीवशिवाय पसरले असतेच.

मिसळपाववर अशाच एका प्रकारच्या मुद्द्यावर दिलेले दुसऱ्या एका सदस्यांनी दिलेले प्रत्युत्तर: याच न्यायाने मग कोणालाच कसलेच श्रेय द्यायला नको. न्यूटनला गुरूत्वाकर्षणाचा शोध लावल्याचे श्रेय का द्या?इतर शोध लागले त्याप्रकारे गुरूत्वाकर्षणाचा शोधही कोणीतरी लावलाच असता!

राजीव गांधी ज्या काळात सत्तेत होते त्या काळात भारतातले वातावरण कसे होते? भारतात संगणक आणले तर बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढेल, आपल्यासारख्या गरीब देशाला ही ’थेरं’ परवडणारी नाहीत असेच बहुसंख्य लोकांचे आणि राजकारण्यांचे म्हणणे होते. मिसळपाववरीलच दुसऱ्या एका प्रतिसादात अन्य सभासदाने देवीलाल यांनी शेतकऱ्यांच्या सभेत केलेल्या भाषणाचा उल्लेख आहे. देवीलाल म्हणाले--"सरकार वीजनिर्मितीसाठी पाण्याचा वापर करून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते". कॉंग्रेस पक्षातही नव्या बदलांना विरोध करणारी मंडळी होतीच. या असल्या वातावरणात संगणक, टेलिफोन असे बदल करणे वाटते तितके सोपे नव्हते.

इराण आणि पाकिस्तानची गोष्ट वेगळी आहे. १९७९ पर्यंत इराणमध्ये अमेरिकासमर्थक पेहलवी सत्तेत होते. त्यानिमित्ताने अमेरिकेशी आणि पाश्चिमात्य जगताशी संपर्क आणि त्यामुळे आपसूकच आलेली नव्या बदलांची ओळख इराणला होत होती. तेल उद्योगाच्या निमित्ताने नवे शास्त्र आणि नवे बदल इराणला अनोळखी नव्हते. पाकिस्तानला पण अमेरिका आणि चीनने भरपूर मदत केलेली होती. आज चीन पाकिस्तानसाठी अणुसंयत्रे, बंदरे बांधण्यापासून मदत करते. तसेच पंजाबातील आणि सिंधू नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीमुळे, अमेरिकेने केलेल्या मदतीमुळे (काही प्रमाणात) आणि लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे त्यांच्या राज्यकर्त्यांनी कितीही दिवे लावले तरी अगदी १९८० च्या दशकापर्यंत भारतातल्या सामान्य लोकांपेक्षा पाकिस्तानातल्या सामान्य लोकांचे जीवनमान अधिक चांगले होते. अशा वातावरणात नवे बदल येणे अधिक सोपे असते.

भारताच्या बाबतीत हे दोन्ही मुद्दे लागू नव्हते. आणि स्वातंत्र्यलढ्यातील आदर्शांचा परिणाम म्हणा की इतर काही कारणाने म्हणा समाजवादी विचारांचा पगडा भारतात जास्त होता. आणि नवे बदल आणले तर गरीब आणि श्रीमंतांमधील दरी अधिक रूंदावेल ही भिती सुध्दा आणि त्यामुळेच नव्या बदलांना भारतात विरोधही जास्त होत होता.

तरीही १९९१ मधे IMF पुढे भारताची खराब स्थिती होती
त्यामागे आखाती युद्ध आणि पेट्रोलियमचे भडकलेले भाव आणि १९९० मधील वि.प्र.सिंहांची सरकारची ऐपत नसताना शेतकऱ्यांची हजारो कोटी रुपयांची कर्जे माफ करणे ही कारणे नव्हती का? राजीव गांधींच्या सरकारने अर्थव्यवस्था नरसिंह राव-मनमोहन सिंह यांनी सांभाळली त्याप्रमाणे उत्तमपणे सांभाळली असे माझे नक्कीच म्हणणे नाही पण १९९१ च्या संकटाचा पूर्ण दोष राजीव गांधींवर टाकणेही योग्य नाही असे मला वाटते.

शब्दाला शब्द सहज़ वाढवता येतो; तसे करण्याचीही माझी इच्छा नाही.
धन्यवाद.

घराणेशाही चालणार्या देशात अमुक घराण्यातला माणूस यापलिकडे राजीवजींविषयी ३१-ऑक्टोबर १९८४ ला काय म्हणता येण्यासारखे होते? ते पुढे डिसेम्बरात निवडून आले असतील, पण मग करुणानिधी-मायावती हे देखील अनेकदा निवडून आले आहेत. त्यापासून काही सिद्ध होत नाही.

सिध्द कसे होत नाही? लोकसभेत त्यांना बहुमताचा पाठिंबा होता हे पण सिध्द होत नाही? आपल्या राज्यपध्दतीत लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेली कोणीही व्यक्ती (भारताची नागरीक, वय वर्ष २५ यासारख्या अटी पूर्ण करणारी) पंतप्रधान बनू शकते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी जर कॉंग्रेस पक्षाच्या खासदारांनी राजीव गांधींची नेता म्हणून निवड केली असेल आणि त्या कारणाने त्यांच्यामागे लोकसभेतील बहुमत असेल तरीही ते पंतप्रधान का बनू नयेत? कोणाच्या सरकारला पाठिंबा द्यावा हा खासदारांचा विशेषाधिकार असतो. खासदारांनी चुकीचा निर्णय घेतला असे जनतेला वाटले तर लोकांनी त्या खासदारांना पुढील निवडणुकीत घरी बसवावे! पण डिसेंबरमधील निवडणुकीत लोकांनी उलट भरभरून मते राजीव गांधींच्या पक्षाला दिली.तो लोकांचा स्पष्ट जनादेश होता की नाही? १९८९ मध्ये लोकांनी राजीव गांधींना सरकार स्थापन करायचा जनादेश दिला नाही आणि म्हणून ते परत पंतप्रधान होऊ शकले नाहीत त्याविषयी कोणीही अगदी स्वत: राजीव गांधींनीही तक्रार केली नाही. मग १९८४ मध्ये स्पष्ट जनादेश मिळून ते पंतप्रधान बनले तर तो पण लोकांचाच जनादेश मानून तो स्विकारायला अडचण कसली?इथे घराणेशाहीचा संबंध येतोच कुठे?

आता आपल्यासारख्यांना राजीव गांधी योग्य वाटत नव्हते तर त्यांनी कॉंग्रेसविरोधी मते दिलीच असतील/होती. पण ती राजीव गांधींना पंतप्रधान बनण्यापासून रोखायला पुरेशी नव्हती म्हणून आपल्या पोटात दुखत असेल तर भारताने स्विकारलेल्या राज्यपध्दतीत त्यावर काहीही इलाज नाही. एक लक्षात घ्या की १९८९ मध्ये राजीव समर्थकांची मते त्यांना पंतप्रधान बनवायला पुरेशी नव्हती. हा लोकशाहीचा खेळच आहे.

आणि भाजपचा 'भारतीय जीना पक्ष' उल्लेख करून तुम्ही काय साधले?
गेल्या काही वर्षांतील भाजपने जो गोंधळ घातला आहे त्यामुळे माझ्यासारख्या एकेकाळच्या कट्टर भाजप समर्थकाचा भ्रमनिरास झाला आहे. मी भाजपचा कट्टर समर्थक होतो त्याकाळी Indian National Congress ला पण Italian National Congress म्हणत होतो. तेव्हा कॉंग्रेस पक्षाला ते नाव देऊन जे मी तेव्हा साधले होते तेच आता भाजपला ’भारतीय जीना पक्ष’ म्हणून साधत आहे. काळजी नसावी.

'तुमच्या' भाजपात तशीच स्थिती आहे, याचा घोष न करता 'आपल्या' सार्वभौम भारतात एक सामान्य कुवतीची, मग भले ती सुदैवानी बर्याच प्रगल्भतेनी वागणारी असेलही, परदेशी स्त्री देशाचे मुख्य ठरवते ही खरेच लाजीरवाणी गोष्ट आहे याबद्दल आपले डोळे जितक्या लवकर उघडतील तितके चांगले.

परत तोच मुद्दा निघत आहे. भारताच्या जनतेनेच UPA ला २६०+ जागा देऊन सोनिया गांधींना इतके बलिष्ठ बनविले आहे. म्हणजे भारताच्या जनतेलाच त्यात वावगे काही वाटत नाही. मला स्वत:ला सुध्दा या गोष्टीचे वाईटच वाटते काळजी नसावी. पण आपल्या राज्यव्यवस्थेत २०१४ पर्यंत तरी याबद्दल काहीही करता येणार नाही. आणि २०१४ मध्ये या गोष्टीची पुनरावृत्ती व्हायला नको असेल तर लोकांपुढे आपले म्हणणे आतापासूनच मांडायला हवे. त्यातूनही लोकांनी परत कॉंग्रेसलाच निवडून दिले तर परत आपल्याकडे याबद्दल आणखी ५ वर्षे काहीही करता येणार नाही. तेव्हा यावर उपाय दोनच-- एकतर आपली राज्यव्यवस्थाच बदलून टाकावी किंवा २०१४ मध्ये तसे परत होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. पहिला उपाय करणे तर अर्थातच शक्य दिसत नाही. तेव्हा दुसरा उपाय करणे हितकारक. या बाबतीतही भाजपचे नेते करत आहेत तसा आक्रस्ताळेपणा करून काहीही उपयोग होणार नाही.

3 comments:

Naniwadekar said...

> १९८० च्या दशकापर्यंत भारतातल्या सामान्य लोकांपेक्षा पाकिस्तानातल्या सामान्य लोकांचे जीवनमान अधिक चांगले होते.
>---

या विधानाबद्‌दल मला शंका आहे. भारतातून पाकिस्तानात गेलेल्या लोकांचा बहुतांश भ्रमनिरास झालेला आहे. शिवाय अमेरिकेवर अवलम्बून पाया कच्चा होऊ देता काही काळ जीवनमान उज़वे असले तरी तो योगायोग किंवा नशीबाचा भाग म्हणावा लागेल.

'बहुमत नसूनही राजीव गांधी प्रधानमंत्री झाले' असा कोणाचाही दावा नसताना त्यांना 'बहुमत होते' ही सर्वमान्य गोष्ट वारंवार सांगण्यात काय अर्थ? राबडी देवीलाही अनेक वर्षे विधानसभेत बहुमत होते, आणि आज़ही त्या पक्षाची स्थिती भक्कमच आहे. आपली कुवत कुठल्याही प्रकारे सिद्‌ध न केलेला राजीवसारखा माणूस देशालाही चालतो, कॉग्रेसलाही चालतो. पण भाजपचे नेते घराणेशाही चालवणारा 'आपला देश फालतू आहे' हे म्हणू शकत नाहीत, 'गांधींचा पक्ष लोकशाहीविरोधी आहे' हे म्हणू शकतात. कुठला नेता कुठे काय बोलू शकतो याबद्‌दल त्यांच्या मर्यादा, त्यांचे डावपेच वगैरे असतात हे लक्षात न घेता 'बुद्‌धेला पटेल असे प्रत्येकाने बोलावे' असा तुमचा आग्रह का? एवढ्या मोठ्या राजकारणात सोडाच पण या ब्लॉगवर सुद्‌धा अनेक गोष्टी लिहायची माझी हिंमत नाही, अनेक गोष्टी मी पटत असूनही नाना कारणांमुळे लिहीत नाही.

> या बाबतीतही भाजपचे नेते करत आहेत तसा आक्रस्ताळेपणा करून काहीही उपयोग होणार नाही.
>---

हा 'आक्रस्ताळेपणा' केल्याने १-२ टक्के मते फिरतीलही, असे पुरेसे टक्के एकत्र झाले की बदल होईलही. १९८९ साली कॉग्रेसची जी टक्केवारी कमी झाली त्यातले किती टक्के कशामुळे कमी झाले? अशा धर्तीची मीमांसा कोणीही करू शकत नाही, पण बोफ़ोर्सविरोधी आक्रस्ताळेपणाचा परिणाम अगदी खेड्यांतही ज़ाणवला, जिथे मतदारांना 'बोफ़ोर्स' नावाचा पत्ता असणंही शक्य नाही. लोकांना अ) कधी घराणेशाही चालते, ब) कधी चालत नाही. घराणेशाहीविरोधी पक्ष ब-स्थिती असेल अशी अपेक्षा करतो, त्यात चूक काय? हा पक्ष केन्द्रात भाजप असेल, तमिळनाडू-कर्नाटकमधे करुणानिधी, देवे गौडांविरुद्‌ध कॉग्रेस निर्लज्जपणे घराणेशाहीचा विरोध करेल, देवे गौडा केन्द्रात तोच मुद्‌दा गांधींविरुद्‌ध चालवतील.

> हा लोकशाहीचा खेळच आहे.
>---
या खेळाचा कौल कधी घराणेशाही चालवून घेतो, कधी त्याच्या विरुद्‌ध ज़ातो. लोकशाही कशी चालते याचे एक उदाहरण देतो. १९८९ साली माझा एक गॅझेटेड ऑफ़िसर शीख मित्र दिल्लीत मत देऊन आला. मी विचारलं : किस को वोट डाला? 'जनता पार्टी'. मी काही बोललो नाही, पण त्याच्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवारच नव्हता. आपल्याला राजीवविरोधी मत देणे आहे, कारण या लोकांनी १९८४ साली सरदार मारले, ही एकच गोष्ट त्याच्या डोक्यात होती; तो कमळाला मत देऊन आला. ज़र १९८४ नन्तर पाच वर्षांनी शीख चवताळले तर १९८४ मधे त्यांनी कॉग्रेसविरोधी प्रयत्न का केले नाहीत? हे सुद्‌धा कोणीही सांगू शकणार नाही. राजकारणात अनेक गोष्टी अशा घडतात की ज्या सर्वांनाच अनाकलनीय असतात.

Naniwadekar said...

एक मुद्‌दा स्पष्ट केलेला बरा.

राजीव गांधींना राजकारणात यायचे होते, असे माझे मत नाही. पण यायचे असते तरी संजयच्या हयातीत एक 'अडसर' मार्गी असता. नन्तरही मुख्य ज़ोर इन्दिराबाईंनी लावला. ते अनिच्छेनी राजकारणात आले. ते ही ठीक आहे. त्या पापात पक्षातल्या सगळ्यांकडेच संशयानी पहाणार्‍या इन्दिराबाई आणि राजपुत्र स्वीकारणारी भारतीय जनता यांचाही वाटा आहे. घराणेशाहीला चटावलेल्या आपल्या पक्षाला इन्दिराजींच्या हत्येतून स्थिरावायला २-३ वर्षांची मुदत देऊन ते या उपर्‍या क्षेत्रातून ज़ाऊ शकले असते. म्हटले तर असे मोठे पद स्वेच्छेने सोडणे कठीण आहे. पण तसे करणारे अनेक लोक रोज़ आपल्याला दिसतात. अनेक खेळाडू योग्य वेळी निवृत्त होतात; तसे नेत्यांच्या बाबत का घडू नये? अगदी विश्वनाथ प्रताप सिंह सारख्या संधीसाधू माणसाला १९९६ साली परत पन्तप्रधान बनण्याची संधी मिळाली. शेवटी कोणीच नाही तर देवे गौडाच ठीक, इतकी वेळ आली. पण वि प्र सिंह ठाम राहिले. आणि सुमार दर्जाचा माणूस पन्तप्रधान होऊनही भारतातले राजीवजींनी शोध लावलेले फोन आणि कम्प्य़ुटर्सही नाहीसे झाले नाहीत.

संदीप said...

A good discussion.