Thursday, May 6, 2010

तरणतारणमधील गुरूद्वारा आणि अकाली दलाची खलिस्तानवरील भूमिका

मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर एका सदस्याने त्याचा अनुभव लिहिला. आपल्या परदेशी पाहुण्यांना घेऊन सदर सदस्य अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट द्यायला गेले होते.तिथे शीख इतिहासावर एक संग्रहालय आहे.त्या संग्रहालयात भिंद्रनवालेचा फोटो आहे आणि त्या फोटोखाली ’१९८४ च्या लढाईतील शहीद’ असे लिहिले आहे. त्यावर परदेशी पाहुण्यांनी ’१९८४ मध्ये भारताची कोणाबरोबर लढाई झाली होती?’ असा अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला आणि ते सदस्य निरूत्तर झाले. या अनुभवावर त्यांनी कोणत्या लढाईत शहीद हा लेख लिहिला. त्या चर्चेत भाग घेऊन मी लिहिलेली प्रतिक्रिया--

माझा चुलत भाऊ काही वर्षे लुधियानामध्ये वास्तव्याला होता.त्याच्या वडिलांनी (माझ्या काकांनी) सांगितलेला एक किस्सा सांगतो. माझे काका निवृत्त झाले असल्याने मधूनमधून लुधियानाला जात असत. सुवर्णमंदिराच्या बराच मोठा एक गुरूद्वारा तरण तारण मध्ये आहे तो त्यांनी बघितला होता. तिकडे शीख धर्माच्या इतिहासाचे एक छोटेखानी संग्रहालय आहे. त्यात दहा गुरू आणि शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाच्या टप्प्यांचा उल्लेख केला आहे. अर्थातच ’ऑपरेशन ब्लू स्टार’ हा त्यांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा आहेच.त्याविषयी पण तिथे माहिती आहे. आणि त्यानंतर झालेल्या इंदिराजींच्या हत्येचाही उल्लेख आहे. आणि इंदिरा हत्येचा उल्लेख ’जैसा किया वैसा पाया’ या शब्दात केला आहे. ही गोष्ट १९९५ ची. अजूनही हे शब्द तिथे आहेत का याची कल्पना नाही.

असे लाजीरवाणे प्रद्रर्शन काढून टाकण्यासाठी कोणी राजकीय पक्षांनी कारवाई केली नाही का? भाजपा चे ह्यावर काय म्हणणे आहे?

भाजपचे यावर म्हणणे काय याची कल्पना नाही.पण भाजपचा मित्रपक्ष अकाली दलाची भूमिका मात्र संशयास्पद आहे असे म्हणायला मात्र नक्कीच जागा आहे. याची कारणे

१. १९९२ मध्ये अरूण कुमार वैद्यांचे मारेकरी जिंदा आणि सुखाला फासावर लटकवले तेव्हा त्याचा अकाली नेते प्रकाशसिंह बादल, गुरचरण सिंह तोहरा आणि सुरजीत सिंह बर्नाला यांनी निषेध केला होता. अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रपतींची भेट घेऊन फाशी टाळावी अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींना केल्याचे वाचल्याचे आठवते. इतकेच नाही तर हे नेते जिंदा आणि सुखाच्या भोगविधीसाठी (दहावे) पुण्यालाही आले होते.

अवांतर: १९९६ पूर्वी भाजप-अकाली दल युती नव्हती. किंबहुना १९९६ च्या लोकसभा निवडणुका या दोन पक्षांनी एकमेकांविरोधात लढवल्या होत्या. पण वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सरकारला अकाली दल या पूर्वी युती नसलेल्या एकमेव पक्षाने पाठिंबा दिला होता. त्या काळात मी भाजपचा कट्टर समर्थक होतो आणि भाजपने अशा पक्षाचा पाठिंबा घेतलाच का असा प्रश्न मला तेव्हा पडला होता.

२. अकाल तख्ताने २००३ मध्ये भिंद्रनवालेला अधिकृतरित्या हुतात्मा म्हणून जाहिर केले. त्याप्रसंगी प्रकाशसिंह बादल समर्थक आणि शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष अनुपस्थित होते.पण भिंद्रनवालेला संतत्व देण्याविरोधात अकाली दलाने काही ठोस भूमिका घेतली आहे असे ऐकिवात नाही. त्याचप्रमाणे शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या संकेतस्थळावर ६ जानेवारी १९८९ रोजी सतवंत सिंह आणि केहार सिंह ’हुतात्मा’ झाले असे लिहिले आहे. त्यावरही अकाली दलाची भूमिका काय हे स्पष्ट नाही.

३. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे सचिव मनजीत सिंह कलकत्ता यांनी शीख धर्मासाठी हुतात्मा झालेल्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे समितीचे कर्तव्य आहे असे म्हटले आणि त्याचवेळी सतवंत सिंहच्या मातोश्रींचा सत्कार केला. त्यावर बादल गटाची भूमिका काय हे पण स्पष्ट नाही.

४. अकाली दलात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे गट होते. कधी हे गट एकत्र होते तर कधी विरोधात. अशाच एका गटाचे नेते सिमरनजीत सिंह मान यांनी सतवंत सिंहच्या आईचा सत्कार केला त्याप्रसंगी बोलताना म्हटले की शिरोमाणी गुरूद्वारा प्रबंधक समितीने बियंत सिंह (इंदिराजींवर सर्वप्रथम गोळ्या याने झाडल्या) आणि दिलावर सिंह (पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंह यांचे मारेकरी) यांच्या कुटुंबियांचाही सत्कार करावा असे म्हटले . सिमरनजीत सिंह मान यांच्या गटाशी भाजपचे कधीच घेणेदेणे नव्हते तेव्हा मान यांनी केलेल्या कृत्यांबद्दल भाजपला दोष नक्कीच देता येणार नाही. पण मान यांनी असे म्हटल्याबद्दल बादल यांनी त्यांचा निषेध मात्र केला नाही.

असो. भिंद्रनवाले आणि कंपनीला पंजाबमध्ये मानणारे लोक आहेत हे स्पष्टच आहे. मुद्दामून सुवर्णमंदिरातील किंवा इतर ठिकाणी भिंद्रनवाले आणि इंदिराजींच्या मारेकऱ्यांना हुतात्मा ठरवणारी वचने काढून पंजाबात परत हिंसाचार उफाळून यायला योग्य परिस्थिती निर्माण होऊ नये या कारणासाठी असेल कदाचित पण भाजप काय किंवा कॉंग्रेस काय त्याविरूध्द काही भूमिका घेताना दिसत नाहीत.

No comments: