Sunday, March 14, 2010

२२ जून १८९७

मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर २२ जून १८९७ या मराठी चित्रपटावर एक चांगली चर्चा झाली. त्यात कोणाला दहशतवादी म्हणावे आणि कोणाला क्रांतिकारक म्हणावे हे आपण कोणत्या बाजूला असतो त्यावर अवलंबून असते असा सूर निघाला. त्यावर माझे मत:

प्रतिसाद १:

मी वाचलेल्या इंदिराजींच्या चरित्राप्रमाणे (लेखक: इंदर मल्होत्रा, पुपुल जयकर आणि कॅथरीन फ्रॅन्क) तरी बियंत सिंह आणि सतवंत सिंह या इंदिराजींची हत्या करणाऱ्यांचा पंजाबातील खलिस्तानी चळवळीशी थेट संबंध होता असे मी तरी वाचले नाही. कटात सतवंत सिंहचा काका केहार सिंह पण सामील होता. बियंत सिंह १९८० पासून इंदिराजींचा अंगरक्षक होता आणि ऑपरेशन ब्लू स्टारपासून तो अस्वस्थ होता. त्याने आणि इतर सूत्रधारांनी जुलै १९८४ मध्ये दिल्लीतील गुरूद्वारा रकबगंज येथे इंदिराजींची हत्या करायची प्रतिज्ञा केली आणि ३१ ऑक्टोबर रोजी त्याची अंमलबजावणी केली. इंदिराजींची हत्या करायचा विडा बब्बर खालसा आणि तत्सम संघटनांनी उचललेला होता पण प्रत्यक्ष हत्या झाली त्यात पंजाबातील दहशतवादी संघटनांचा थेट हात नव्हता. याचाच अर्थ बियंत-सतवंत-केहार यांचा खलिस्तान चळवळीशी संबंध नव्हता आणि त्यांनी इंदिराजींची हत्या स्वयंप्रेरणेने केली. तसे असेल तर आपल्या व्याख्येप्रमाणे ते ’क्रांतिकारक’ ठरतात का? ही माहिती चुकीची असल्यास सुधारावी ही विनंती.

त्याचप्रमाणे नथुराम गोडसेने गांधींची हत्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या साथिदारांबरोबर योजना करून पार पाडली.त्यात इतर कोणत्याही संघटनेचा (रा.स्व.संघ वगैरे) हे सिध्द होऊ शकलेले नाही. तसेच नथुरामने गांधींवर गोळ्या झाडल्या पण तिकडे हजर असलेल्या इतर कोणालाही कसलीही दुखापत केली नाही. मग नथुराम पण क्रांतिकारक ठरतो का?

खलिस्तान चळवळ काय किंवा लष्कर-ए-तोयबा काय अशा संघटना सरकारी कार्यालयांप्रमाणे कोणताही कागदोपत्री रेकॉर्ड सहसा ठेवत नाहीत.त्यामुळे एखादा मनुष्य अशा संघटनेचा सदस्य आहे हे सिध्द करणे खूपच कठिण असते.तेव्हा जरी बियंत-सतवंत-केहार कुणा खलिस्तानी संघटनेचे सदस्य असले तरी कायद्याच्या दृष्टीने ते सिध्द कसे करणार? आणि जरी एखादा मनुष्य अशा संघटनेचा सदस्य असला तरी त्याने केलेल्या कृत्याबद्दल सबंध संघटनेला कसे जबाबदार ठरवणार? १९९५ मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री बियंत सिंह (त्यांचे नाव पण योगायोगाने बियंत सिंहच निघाले) यांची हत्या झाली आणि त्याबद्दल काही लोकांना न्यायालयाने शिक्षापण सुनावली आहे. समजा त्यापैकी एखादा कुठल्यातरी प्रतिष्टित कंपनीत नोकरीला असेल तर याचा अर्थ बियंत सिंह हत्येमागे त्या कंपनीचा हात होता असा होतो का? असो.

आज बियंत-सतवंत-केहार यांना हुतात्मा समजणारी मंडळी आहेत. त्यांना काही गुरूद्वारांनी मरणोत्तर संतत्वपण बहाल केले आहे. पण आपल्यासारखे अनेक लोक त्यांना दहशतवादी समजतात. त्याचप्रमाणे नथुराम गोडसेला पण ’महात्मा’ समजणारे लोक आहेतच. तेव्हा कोण दहशतवादी आणि कोण महात्मा किंवा क्रांतिकारक हे आपण कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते. त्या अर्थी ती सीमारेषा ’धूसर’ आहे असे म्हणायचा थत्ते साहेबांचा उद्देश आहे असे वाटते.

अवांतर:

१) राजकिय कारणांसाठी निरपराधांची हत्या करणारा तो दहशतवादी अशी व्याख्या केली जाते. यातही ’निरपराध’ कोण यावर एकमत कसे होणार? पॅलेस्टाईनमधील संघटनांना आपण दहशतवादी म्हणतो पण इस्त्राएलच्या वरवंट्याखाली भरडले गेलेले लोक क्रांतिकारक म्हणतात.असे दहशतवादी/क्रांतिकारक अनेकदा मानवी बॉम्ब बनून इस्त्राएलींची हत्या घडवून आणतात.आता असे मारले गेलेले इस्त्राएली हे निरपराध का? आपण त्यांना जरूर निरपराध म्हणू. पण पॅलेस्टाईनमधील लोकांच्या दृष्टीने ते त्यांची हक्काची जमीन हडप करून त्यांना देशोधडीला लावणारे कर्दनकाळ असतात.इस्त्राएलची स्थापना का झाली, त्यामागे जबाबदार कोण हे वादाचे मुद्दे नक्कीच आहेत.इंग्लंड-अमेरिकेने पॅलेस्टिनींची जमिन परस्परपणे ज्यूंच्या घशात घातली असे पॅलेस्टिनी लोक मानतात. पण सद्यकालात पॅलेस्टिनियन्सच्या जमीनीवर कोण राहत आहे?सामान्य इस्त्राएलीच ना?असे लोक पॅलेस्टिनियन्सच्या नजरेतून ’निरपराध’ असतील का किंबहुना का असावेत? एक समकक्ष उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या गुंडाने माझ्या घराची खोली माझ्या इच्छेविरूध्द घशात घातली आणि तिथे तिसऱ्या माणसाला राहायला आणले तर तो तिसरा माणूस ’निरपराध’ असणार की नाही?इतरांच्या मते तो निरपराध असला तरी तो माझ्या घराच्या खोलीत बेकायदा राहत असल्यामुळे माझ्या दृष्टीने तो अजिबात निरपराध असणार नाही.

तेव्हा पॅलेस्टाईनमधील चळवळीला क्रांतिकारक चळवळ म्हणावे की दहशतवादी चळवळ? हे धूसर रेषेचे आणखी एक उदाहरण नाही का?

स्प्ष्टीकरण: भिंद्रनवाले कंपनीने पंजाबात वाहिलेले रक्ताचे पाट आणि काश्मीरातील हत्याकांड ही निरपराधांची हत्या आहे असेच माझे मत आहे.कारण या दोन्ही ठिकाणी अनेक शतके एकत्र राहत असलेल्या दुसऱ्या समाजघटकातील लोकांना पध्दतशीरपणे लक्ष्य बनविले गेले आहे. इस्त्राएलप्रमाणे बाहेरून कोणी आलेच असले तर पाकिस्तानातून येणारे मारेकरी आहेत.

२) फिडेल कॅस्ट्रो १९५९ मध्ये बॅटिस्टाची सत्ता उलथवून लावून क्युबाचे अध्यक्ष झाले.ती चळवळ अहिंसक होती असे कोण म्हणेल? त्यात बॅटिस्टाशी काहीही घेणेदेणे नसलेल्या एकाही क्युबन नागरीकाचा बळी पडला नाही असे छातीठोकपणे कोणी म्हणू शकेल का? मग फिडेल कॅस्ट्रो पण दहशतवादी झाले का? अमेरिका त्यांना जरूर दहशतवादी म्हणते पण त्यांचे अनुयायी त्यांना महान क्रांतिकारक आणि द्रष्टे पुरूष मानतात. ही पण धूसर रेषा नाही का?

३) रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार करणारा कॉन्स्टेबल मनोहर कदम हा अतिरेकी का? तो म्हणतो की जमावाने टॅंकरला आग लावू नये म्हणून गोळीबार करणे भाग होते. ती आग लागली असती तर मोठाच अनर्थ घडला असता. तर काही संघटना ही ’टॅंकर थिअरी’ पूर्णपणे नाकारतात आणि त्यांच्या मते कदमने सकाळी कामावर निघालेल्यांना मुद्दामून गोळ्या घालून ठार मारले. समजा कदमने गोळीबार स्वत:च्या अधिकारात नव्हे तर कोणा वरीष्ठाच्या आदेशाची अंमलबजावणी करायला केला असेल तरीही तो दहशतवादी का? की केवळ वरीष्ठ दहशतवादी ठरणार? या प्रश्नांची उत्तरे पण आपण कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असतात.

प्रतिसाद क्रमांक २:

तरी देखील इंदिरा गांधी हत्या सोडल्यास जे काही खलीस्तानवाद्यांनी केले, त्याचा विचार करता ते भारतीय क्रांतिकारकांच्या हिंसेच्या जवळचे वाटत नाही.
याविषयी काही दुमत नाही.पंजाबातील दहशतवाद्यांनी (हो ते दहशतवादीच होते) १९९१ च्या लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान व्हायच्या आधी लुधियानाजवळ दोन रेल्वेगाड्या थांबवून बेछूट गोळीबार केला होता आणि शंभरेक लोकांना यमसदनी धाडले.बियंत सिंह मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी के.पी.एस.गिल यांना खऱ्या किंवा खोट्या चकमकीत दहशतवाद्यांना संपवायचे स्वातंत्र्य दिले. त्या काळात मी दूरदर्शनवर बघितलेली एक बातमी माझ्या पक्की लक्षात आहे. पंजाब पोलिसांनी एका सुमारे ६०० लोकांच्या हत्येत सहभाग असलेल्या एका दहशतवाद्याचा ’एन्काऊंटर’ केला होता. अशा कर्दनकाळांची आणि भगतसिंह प्रभृतींची तुलना कशी होऊ शकेल? ते भारतीय क्रांतिकारकांच्या हिंसेच्या जवळचे तर सोडाच पूर्णपणे विरोधातले वाटते.

माझा मुद्दा केवळ बियंत-सतवंत-केहार यांच्याविषयीचा आहे.सुवर्णमंदिरात दहशतवादी घुसले होते हे सत्यच आहे पण ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये सुवर्णमंदिराची आणि अकाल तख्तची अपरिमित हानी झाली आणि त्यामुळे सामान्य शीखाला त्याचे दु:ख झाले हे पण तितकेच सत्य आहे. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता इंदिराजींपुढे वेगळा काही मार्ग होता असेही वाटत नाही. १९८७ मध्ये सुवर्णमंदिरात परत दहशतवादी घुसल्यावर राजीव गांधींनी परिस्थिती वेगळ्या पध्दतीने हाताळली. तसे इंदिराजींना करणे शक्य झाले असते की नाही हा ’जर-तर’ चा भाग झाला.पण सुवर्णमंदिराला झालेल्या हानीमुळे इंदिराजी शीख समुदायातील अनेकांना खलनायिका वाटू लागल्या तर त्यात आश्चर्य वाटू नये. सोमनाथ मंदिराची लूटमार करणाऱ्या गझनीच्या महंमदाला कोणी ठार मारले असते तर त्याला मी दहशतवादी नक्कीच म्हटले नसते उलट त्याला मी मोठा योध्दा आणि वीरपुरूषच मानले असते. त्याच न्यायाने जर शीख समुदायातील काहींना इंदिराजींचे मारेकरी (भिंद्रनवाले नव्हे) संत वाटत असतील तर मला ते समजू शकते. अर्थात मी त्यांना संत नक्कीच म्हणत नाही. माझ्या दृष्टीने ते दहशतवादीच आहेत.कारण त्यांनी भारताच्या पंतप्रधानांची हत्या केली. पण काहींच्या मते ते संत आहेत कारण त्यांनी सुवर्णमंदिराच्या पावित्र्याची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला संपवले.’धूसर रेषेमागचा’ मूळ मुद्दा हाच आहे. आपण कोणत्या बाजूला आहोत यावर आपले मत अवलंबून असते. यावरून मी चापेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांची दहशतवाद्यांबरोबर तुलना करत आहे असा अर्थ कसा काय निघतो?मी नक्की कोणत्या बाजूला आहे हे मला पक्के ठाऊक आहे आणि त्याबद्दल कोणताही संभ्रम माझ्या मनात नाही. (असा संभ्रम स्वयंघोषित मानवाधिकारांच्या पुरस्कर्त्यांना पडला आहे असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटते). त्यामुळे माझ्यासाठी चाफेकर बंधू क्रांतिकारकच आहेत.पण त्यामुळे धूसर रेषेचा मुद्दा बाद होत नाही.

अर्थात जे एखाद्याच व्यक्तीला ठरवून मारतात आणि इतरांना इजा पोचवत नाहीत ते प्रत्येक वेळेस क्रांतिकारक ठरतातच असे नाही. अशातच म. गांधी, इंदिरा गांधी, आणि इझॅक रॅबिनचे खुनी बसतात असे वाटते.

परत तोच मुद्दा निघत आहे.मदनलाल धिंग्राने एकट्या कर्झन वायलीला उडवले पण इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही. तसेच मदनलालने किंवा इतर क्रांतिकारकांनी दिसला इंग्रज की घाल गोळी असेही केलेले नव्हते. तरीही मुद्दामून कर्झन वायलीला संपवले म्हणजे कर्झन वायलीने भारताचा अपमान/नुकसान केले असले पाहिजे. त्याने नक्की काय केले हे माझ्या या क्षणी लक्षात नाही कारण ते वाचन करून बरीच वर्षे झाली आहेत.पण आपण मदनलाल धिंग्राचे समर्थन करताना म्हणतो की त्याने भारताचा शत्रू कर्झन वायलीलाच उडवले इतर कोणाच्याही केसालाही धक्का लावला नाही. त्यापुढे जाऊन आपण असे म्हणतो की मदनलालला त्याने केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चात्ताप झाला नव्हता आणि तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पुढे मदनलाल हसत हसत फासावर गेला.

दृष्य क्रमांक १: नथुराम गोडसेने ५५ कोटींची पाकिस्तानला दक्षिणा देऊन भारताचा शत्रू-- पाकिस्तानला मदत करणाऱ्या, मुस्लीम लीगचा प्रत्यक्ष कृतीदिन चालू होता त्यावेळी शांतपणे बसलेल्या पण हिंदू प्रतिकाराला उभे राहिल्यावर उपोषणाला बसून हिंदूंना शस्त्र म्यान करायला लावणाऱ्या आणि म्हणूनच हिंदूंचे शत्रू असलेल्या महात्मा गांधींची हत्या केली. नथुरामने केवळ गांधींनाच मारले. इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही. गांधींना मारल्यानंतर नथुरामने बंदूक टाकून दिली आणि तो स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पुढे तो हातात भगवद्गीता घेऊन हसत हसत फासावर गेला.

दृष्य क्रमांक २: बियंत सिंहने आमच्या सुवर्णमंदिरावर हल्ला करून त्याच्या पावित्र्याची पायमल्ली करणाऱ्या, आमच्या अकाल तख्ताचा, आमच्या धर्मग्रंथाचा अपमान करणाऱ्या इंदिरा गांधींवर रिव्हॉल्व्हरमधून ५ गोळ्या झाडल्या. इंदिराजींबरोबर त्यावेळी आर.के.धवन आणि इतर काही लोक होते. त्यापैकी कोणाच्या केसालाही त्याने धक्का लावला नाही.इंदिराजी जमिनीवर पडल्यावर सतवंत सिंहने ’आमच्या धर्माचा शत्रू’ वाचायची थोडीही शक्यता बाकी राहू नये म्हणून त्यांच्यावर स्टेनगन मधून अजून २५ गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडल्यानंतर बियंत सिंहने ’आम्हाला काय करायचे ते आम्ही केले आता तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा’ असे म्हणत हातातील बंदूक खाली टाकली. दरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकून तिथे आलेल्या (दिल्ली पोलिसांच्या की लष्कराच्या?) जवानांच्या गोळीबारात बियंत सिंह ठार झाला तर सतवंत सिंह जखमी झाला. पुढे सतवंत सिंह आणि केहार सिंह (हसत हसत का ते माहित नाही) फासावर गेले.

दृष्य क्रमांक ३: देवाने ज्यूंना दिलेल्या भूमीत पूर्ण ज्यूंचे राज्य स्थापन केलेले असतानाही पॅलेस्टिनी लोकांबरोबर काही कारण नसताना शांततेच्या वाटाघाटी करून ऍब्रॅहॅम आणि मसीहा आणि तत्सम संतपुरूषांच्या ओल्ड टेस्टॅमेन्टमधील विधान खोटे पाडणाऱ्या पाखंडी यित्झॅक राबीनना आमच्या यिगाल आमीरने ठार मारले.त्याने इतर कोणाच्या केसालाही धक्का लावला नाही.आज तो न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा विनातक्रार भोगत आहे.

माझा प्रश्न: आपण मदनलाल धिंग्राचे ज्या आधारावर समर्थन करतो तो आधार आणि वरील तीन दृष्यांमध्ये नथुराम, बियंत-सतवंत-केहार आणि यिगाल आमीरचे समर्थक ज्या आधारावर समर्थन करतात तो आधार यात नक्की फरक काय?

सामान्य माणूस, ज्याच्या हातात निर्णय घेण्याची सत्ताच नसते, तो भले कुठच्याही बाजूचा असला तरी निरपराधच असतो असे वाटते.

आपल्याला असे वाटते याचे कारण आपल्या घरादारावरून इस्त्राएलचे बुलडोझर फिरलेले नाहीत. आपल्या जमिनीवरून आपल्यालाच हुसकावून लावून कोणी राहत नाही.दूरून उभे राहून मजा बघायला काही त्रास पडत नाही. पण ज्याला भोगायला लागते त्यालाच त्याच्या यातना कळतात. एखादा पॅलेस्टिनी मनुष्य-- ज्याचे घरदार इस्त्राएलने उध्वस्त केले त्याला कसले महत्व अधिक असणार? स्वत:चे घर परत मिळवायला, त्याच्या बायकामुलांना ठार मारलेल्यांवर सूड उगवायला आणि त्याच्या जमिनीवर जो कोण राहात आहे त्याला हुसकावून लावायला की आपण सगळेच करतो तसे भरल्या पोटाचे विचार करायला? असा माणूस मानवी बॉम्ब बनला तर त्यात आश्चर्य ते काय?

भारतात देखील दंगलीत जेंव्हा विशिष्ठ जात, पंथ, धर्म यांना वेठीस धरून मारले जाते ते अयोग्यच आहे.

+१

मात्र ४८ सालानंतर त्या अन्यायाला, अंधळ्या आत्मविश्वासात इस्त्रायलवर अरब राष्ट्रांच्या मदतीने हल्ला करून, त्यांनीच निमंत्रण दिले, त्यामुळे तेंव्हा त्यांना क्रांतिकारक म्हणता येणार नाही.

मग त्यांनी दुसरे काय करायला हवे होते? आंदोलने, सत्याग्रह आणि उपोषणे करून त्यांना त्यांची घरेदारे परत मिळणार होती का?

पण विचार करा जर ही क्रांतिकारी चळवळ असेल तर त्यात सामान्य किती मारले गेलेत आणि सत्ताधिश (अगदी पोलीसांपासून ते वरपर्यंत) किती मारले गेलेत?

मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ’हे सामान्यच माझ्या घरावर कब्जा करून राहात आहेत आणि इतर कोणासाठीही ते निरपराध असले तरी माझ्यासाठी ते कर्दनकाळच आहेत’ असे पॅलेस्टाईनमधील सामान्य युवकास वाटले तर त्यात काय चुकले? ’त्यांचे ’सामान्य’ नागरिक (जे माझ्या लेखी अजिबात निरपराध नाहीत), पोलिस आणि इतर लोक मरू नयेत म्हणून मी देशोधडीला का लागावे? माझ्या पुढच्या पिढ्यांना घराच्या उबदार छत्रापासून का वंचित ठेवायचे?मोठा अजब न्याय झाला. ज्यांनी माझी जमिन हडपली, घरदार उध्वस्त केले ते लोक सामोपचाराची भाषा ऐकत नसतील, त्यांच्या लष्करी सामर्थ्यापुढे माझा अजिबात टिकाव लागणार नसेल तर माझ्यापुढे मानवी बॉम्ब बनण्याशिवाय दुसरा पर्याय नाही’ असे ही त्या सामान्य युवकास वाटले तर त्यात त्याची चूक काय?

अवांतर: पूर्णपणे आलिप्त विचार केला तर इस्त्राएल देशाची स्थापनाच मुळात एक sacrilege आहे असे मला वाटते. तरीही आंतरराष्ट्रीय राजकारणात असा आदर्शवाद चालत नाही आणि त्यातील गुंतागुंतीचा विचार करता मला पॅलेस्टाईनपेक्षा इस्त्राएलच अधिक जवळचे वाटते आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून माझा पाठिंबा इस्त्राएललाच. (माझ्या पाठिंब्याला कोण विचारत नाही ही गोष्ट अलहिदा).

फिडेल कॅस्ट्रोला अमेरिकाच दहशतवादी म्हणते. ते देखील, मला माहीत नाही, कदाचीत बुशबाबाने सुरवात केली आहे का?

कदाचित दहशतवादी हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. पण अमेरिकेच्या सी.आय.ए ने फिडेल कॅस्ट्रोंना मारायचे एकूण ६३८ वेळा प्रयत्न केले. दहशतवादी नाही तरी अमेरिका कॅस्ट्रोंना ’एक संपविण्यायोग्य कटकट’ नक्कीच मानते.

प्रतिसाद क्रमांक ३:

चापेकर बंधूंच्या त्यागाचे महत्व नाकारायचा करंटेपणा कोणीही करणार नाही/करू नये. पण रॅंडला मारायच्या मागे नक्की कारण काय होते? त्याचे सैनिक देवघरात बूट घालून जात नसते तर चापेकर बंधूंचे पित्त तितक्याच प्रमाणात खवळले असते का? समजा पुण्यात प्लेग आलाच नसता तरीही चापेकरांनी रॅंडला मारले असते का? कोणास ठाऊक. या जर-तरच्या गोष्टी झाल्या तेव्हा नक्की काहीच सांगता येणार नाही.तरीही मग चापेकरांचे महत्व का आणि कोणते? त्यांनी एक मार्ग दाखवून दिला त्यावर पुढील क्रांतिकार्याची दिशा ठरली. चापेकरांना फाशी दिली त्या रात्री एका पंधरा वर्षाच्या मुलाने तळमळत देवीच्या प्रतिमेपुढे ’देशाच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता झुंजेन’ अशी प्रतिज्ञा केली. त्या मुलाचे नाव होते विनायक दामोदर सावरकर! आणि नंतरच्या काळात सावरकरांचे क्रांतिकार्याला योगदान सर्वांना माहितच आहे.

आजच आय.आय.एम मध्ये गुगलवर केस स्टडीवर चर्चा झाली. १९९८-९९ मध्ये लॅरी पेजने गुगलची सुरवात केली आणि वर्षभरात काही धोरणात्मक निर्णय घेतले. गुगल आज अनेक बिलियन डॉलरची उलाढाल असलेली कंपनी आहे.पेजने १९९८-९९ मध्ये जे धोरणात्मक निर्णय घेतले तेव्हा त्याला आपली कंपनी अनेक बिलियन डॉलरची उलाढाल करेल असे वाटले असेल का? तसे असायची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळेच आपली कंपनी एवढी मोठी व्हावी यासाठी १९९८-९९ मध्ये पेजने असे धोरणात्मक निर्णय घेतले असे म्हणणे ही अतिशयोक्ती झाली.पण त्यामुळे त्या धोरणात्मक निर्णयांचे महत्व कमी होते का? तसे नक्कीच नाही कारण ते निर्णय त्याने तेव्हा घेतले नसते तर आज गुगल एवढी मोठी होऊच शकली नसती.

आता हे इथे सांगायचा उद्देश काय?लॅरी पेजला जसे १९९८-९९ मध्ये धोरणात्मक निर्णय घेताना गुगलला २०१० मधील स्वरूप द्यायची आपण सुरवात करत आहोत असे वाटले असायची शक्यता कमी आहे त्याचप्रमाणे चापेकरांना रॅंडला मारायच्या वेळी आपण भारताच्या इतिहासातील महत्वाच्या टप्प्याची सुरवात करत आहोत असे वाटले असायची शक्यता जरा कमीच वाटते. त्यामुळे लॅरी पेजच्या १९९८-९९ मधील निर्णयांचे आणि चापेकरांच्या १८९७ मध्ये रॅंडला मारायच्या कृतीचे महत्व अजिबात कमी होत नाही.

पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा असतो की असे म्हटले की अनेकदा लोक भावनेच्या भरात जाऊन क्रांतिकारकांचा अपमान वगैरे वगैरे शब्दात हेटाळणी करतात. दिपक पवार म्हणून एक सर (मराठी भाषा संस्थेचे दिपक पवार तेच का हे मला माहित नाही) आम्हाला १०वीत एन.टी.एस ला इतिहास शिकवायला होते. त्यांनी आम्हाला इतिहासातील एक महत्वाचा धडा दिला. तो म्हणजे वस्तुनिष्ठ अभ्यास करताना कधीही भावनेच्या भरात जाऊ नये.तटस्थपणे विचार करून अभ्यास करून आपली मते बनवता आली पाहिजेत. म्हणजे काय? कोणाही ऐतिहासिक व्यक्तीचा अभ्यास करताना ती व्यक्ती महान किंवा दुष्ट असा पूर्वग्रह बाजूला ठेवता आला पाहिजे. ही प्रक्रिया खूपच कठिण असते.पवार सरांचे ऐकूनही मी पण अनेकदा असे भावनेच्या भरात गेलेलो आहे.क्रांतिकारक, सावरकर वगैरे नावे ऐकली की झाले! माझ्या मनात त्यांच्या विषयीचा जो आदर आहे आणि जे स्थान मी त्यांना दिले आहे त्यापेक्षा कणभरही खालची गोष्ट मी ऐकून घ्यायला मी तयार नसे.आणि तसे कोणी विधान केले तर मी पण संतापून जाऊन अशाच प्रतिक्रिया देत असे.असो.

तेव्हा माझे चापेकरांविषयीचे मत थत्ते साहेबांच्या मताप्रमाणेच असेल तर कृपया ’क्रांतिकारकांचा अपमान’, ’फुकटचे स्वातंत्र्य मिळाले म्हणून चढलेला माज’ वगैरे म्हणू नये ही विनंती. बाकी या विषयावर मला या किंवा इतर कोणत्याही शक्य असलेल्या व्यासपीठावर वेळ मिळेल तशी चर्चा करायला आवडेलच.

No comments: