Tuesday, February 9, 2010

अ‍ॅमवेपासून सावधान

अमेरिकेत असताना काही काळ मी या अ‍ॅमवे च्या लोकांच्या मिठास बोलण्याला फसलो होतो. या लोकांची दुनिया मी अगदी जवळून बघितली आहे आणि हे लोक किती लुच्चे-लबाड-लफंगे बनू शकतात ते पण अगदी जवळून बघितले आहे.मुळात ३ डॉलरला मिळणारी एखादी वस्तू १५ डॉलरला स्वत: विकत घेऊन मूर्ख बनायचे आणि आपल्यासारखे मूर्ख बनायला तयार असणारे १० मूर्ख शोधायचे आणि त्यांना इतर बकरे शोधायला मदत करायची असे हे गणित आहे. पिरॅमिडच्या टोकावर असणारे लोक वर्षाला अगदी मिलियन डॉलर कमवत असतील पण ते मिलियन डॉलर तळात असलेल्या शेकडो जणांना फसवूनच त्यांना मिळत असतात हे कोण नाकारू शकेल? या मंडळींचा कटाक्ष असतो महिन्याला १०० पॉईंटचे सामान खरेदी करण्यावर.जर एखाद्या महिन्यात १०० पॉईंटचे सामान खरेदी केले नाही तर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाब विचारणारे एकामागोमाग एक इतके फोन येतात की विचारू नका.असे अनेक हलकट लोक मी बघितले आहेत. मला वाटते की त्यांच्या डाऊनलाईन मधला एखादा मनुष्य १०० पॉईंटचे सामान खरेदी करायच्या आधी परलोकवासी झाला तर यांची पहिली प्रतिक्रिया असेल-- ’अरे हा या महिन्याचे १०० पॉईंट करून मेला असता तर किती चांगले झाले असते’ !

मला यांचे खरे स्वरूप कळले ते एका घटनेनंतर. प्रत्येकाला यांच्या ’सिस्टिम’ मधून सीडी आणि पुस्तके घ्यायची असतात.मी अमेरिकेत विद्यार्थी असल्यामुळे स्वाभाविकपणे माझे उत्पन्न मर्यादित होते आणि माझा हाफ.कॉम किंवा ऍमॅझॉनवरील वापरलेली स्वस्तातील पुस्तके विकत घेण्याकडे कल असायचा.एकदा माझा ’अपलाईन’ माझ्या गळ्यात ऍमॅझॉनवरील १२ डॉलरला नवे मिळणारे पुस्तक १५ डॉलरला गळ्यात मारू बघत होता. मी त्याच्याकडून ते पुस्तक घ्यायला नकार दिल्यानंतर मी त्या सगळ्यांच्या नजरेतून उतरलो. पण पिरॅमिडच्या टोकावर बसलेल्या कोणत्यातरी हलकटाला मिलियन डॉलरचे बंगले हवेत, पोर्श गाडी, स्वत:चे विमान हवे म्हणून मी जास्त महागाच्या वस्तूच नव्हे तर जास्त महाग पुस्तकेही खरेदी करावीत असा यांचा अट्टाहास! प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी जमात यापेक्षा वेगळी नसेल.

एकट्यादुकट्या बेसावध भारतीयाला मॉल किंवा वॉलमार्टमध्ये खिंडीत गाठण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही. विनाकारण ओळख काढायची, ’मी तुम्हाला कुठेतरी बघितले आहे’ अशा अर्थाचे एखादे वाक्य बोलायचे आणि संवाद साधून मासा गळाला लागतो का हे बघायचे ही त्यांची खासियत. एकदा मी न्यू जर्सीमधील एका वॉलमार्टमध्ये गेलो असताना असाच एक मनुष्य ’मी तुम्हाला कुठेतरी बघितले आहे’ असे म्हणत माझ्यासमोर आला. मी न्यू जर्सीत प्रथमच गेलेलो असल्यामुळे त्याने मला कुठेही कधीही बघितले असायची शक्यता अगदी शून्य होती. मला त्याचा डाव लगेच समजला. त्याने मला प्रश्न विचारला ’Are you from India?' त्याची जिरवायला मी शुध्द मराठी उचारातल्या इंग्लिशमध्ये उत्तर दिले ’No I am from Mozambique'. त्या मनुष्याचा चेहरा बघण्यासारखा झाला हे सांगणे न लागे. तेव्हा अमेरिकेतील ब्लॉग विश्वाच्या नागरिकांनो, अशा जंतूंना पिटाळून लावायला हा उपाय करून बघा. यश नक्कीच मिळेल.