Sunday, November 15, 2009

आय.आय.एम अहमदाबादमधून


मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर मी लिहिलेला ’आय.आय.एम अहमदाबादमधून' हा लेख

नमस्कार मंडळी,
गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे.
भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली. त्यानंतर ज्येष्ठ शास्त्रद्न्य विक्रम साराभाई आणि उद्योजक लालजीभाई नानभाई यांनी पुढाकार घेऊन गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये तसेच आय.आय.एम सुरू करावे यासाठी पंडित नेहरू आणि गुजरात राज्य सरकारकडे पाठपुरावा केला आणि १९६१ मध्ये संस्थेची स्थापना झाली.त्यासाठी सुध्दा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले.पहिले वर्षभर संस्थेचा कारभार फारच थोडका होता.संस्थेकडे स्वत:च्या इमारती,ग्रंथालय,कर्मचारी वगैरे काहीही नव्हते.तेव्हा साराभाईंच्या बंगल्यातच संस्थेचा कारभार चालू झाला.गुजरात सरकारने अहमदाबाद शहरातील वस्त्रापूर येथे गुजरात विद्यापीठाजवळ संस्थेसाठी जागा दिली. फ्रेंच वास्तुतद्न्य लुई कॅन यांनी संस्थेच्या इमारतींचे डिझाईन केले.इमारतींसाठी लाल रंगाच्या वालुकाश्म दगडाचा वापर केला गेला.यथावकाश संस्थेचे काम नव्या ठिकाणाहून सुरू झाले. नंतरच्या काळात बंगलोर (१९७९) आणि लखनौ येथे नवीन आय.आय.एम ची स्थापना करण्यात आली. तसेच १९९६ मध्ये इंदौर आणि कोझिकोडे येथे आणि २००८ मध्ये शिलाँग येथे आणखी तीन आय.आय.एम चालू झाली.तसेच २०१० पासून जयपूर आणि इतर काही ठिकाणी नव्या आय.आय.एमची स्थापना करायचा सरकारचा मानस आहे

आय.आय.एम अहमदाबादचे प्रवेशद्वार

संस्थेच्या आवारातील सर्वात सुप्रसिध्द असे ’लुई कॅन प्लाझा’ हे ठिकाण

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत चार (अहमदाबाद,कलकत्ता,बंगलोर आणि लखनौ) या प्रत्येक आय.आय.एम साठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा होती.पण त्यानंतर या चार संस्थांची मिळून एकच (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट-- कॅट) सुरू करण्यात आली.प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा कॅट ही परीक्षा असते.या परीक्षेत पूर्वी गणित, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि रिडिंग कॉम्र्पिहेन्शन असे चार विभाग असत. १९९५-९६ नंतरच्या काळात इंग्लिश आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन या दोन स्वतंत्र विभाग एकत्र करून परीक्षेत एकूण ३ विभाग ठेवण्यात आले. प्रत्येक प्रश्न बहुपर्यायी असतो आणि एकच बरोबर उत्तर असते.तसेच चुकीच्या उत्तरासाठी ऋण मूल्यांकन असते. प्रवेशप्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यासाठी निवड होण्यासाठी परीक्षेच्या तीनही विभागांमध्ये आणि एकूण कमीतकमी मार्क मिळवणे गरजेचे असते.म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचे गणित चांगले असेल तरीही प्रवेशप्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यासाठी निवड होण्यासाठी इतर दोन विभागातही कमीतकमी गरजेचे असलेले मार्क मिळवणे गरजेचे असते. सर्व आय.आय.एम कॅट परीक्षा जरी एकत्र घेत असल्या तरी त्यापुढील प्रक्रिया प्रत्येक संस्थेची स्वतंत्र असते.२००७ च्या कॅट पर्यंत अहमदाबादच्या आय.आय.एम च्या प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी निवड होण्यासाठी परीक्षेच्या प्रत्येक विभागात कमीतकमी ९५.३ पर्सेंटाईल (परीक्षा देत असलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी पहिल्या ४.७% मध्ये) आणि तीनही विभाग मिळून एकूण मार्कांमध्ये ९९.२ पर्सेंटाईल (पहिल्या ०.८% मध्ये) असणे गरजेचे होते. २००७ मध्ये एकूण २ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याची पुढील टप्प्यासाठी निवड होण्यासाठी तो विद्यार्थी परीक्षेच्या तीनही विभागांमध्ये स्वतंत्रपणे पहिल्या ९४०० विद्यार्थ्यांपैकी आणि एकूण मार्कांमध्ये पहिल्या १६०० विद्यार्थ्यांपैकी असणे गरजेचे होते.२००८ च्या परीक्षेत अहमदाबादच्या संस्थेने पुढच्या टप्प्यासाठी निवड करण्यासाठी १० वी आणि १२वी च्या मार्कांनाही महत्व दिले.त्याप्रमाणेच इतर संस्थांचे प्रवेशप्रक्रियेच्या पुढील टप्प्याला निवड करण्यासाठी स्वत:चे नियम (कॅटबरोबरच १०-१२वी, पदवी परीक्षेचे मार्क वगैरे) असतात. परीक्षा देण्यासाठी कमीतकमी पदवीधारक असणे आणि शेवटच्या वर्षाला कमीतकमी ५०% मार्क मिळवणे गरजेचे असते.शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी पण परीक्षेला बसू शकतात.
प्रवेशप्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात २००६ सालापर्यंत ग्रुप डिस्कशन आणि मुलाखत यांचा वापर करण्यात येत असे.पण ग्रुप डिस्कशनमध्ये मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा होतो आणि त्याचा निवडप्रक्रियेसाठी फारसा उपयोग होत नाही असे अहमदाबादच्या संस्थेतील प्राध्यापकांच्या लक्षात आले.म्हणून त्यांनी २००७ पासून पुढच्या टप्प्यासाठी निबंध लेखन आणि वैयक्तिक मुलाखत असे स्वरूप वापरायला सुरवात केली.इतर आय.आय.एम मध्ये अजूनही ग्रुप डिस्कशन वापरले जाते.
यावर्षी अहमदाबाद मध्ये ३१५ आणि कलकत्त्याला ३६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.सर्व आय.आय.एम मिळून सुमारे १६०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला.पुढील ३ वर्षे राखीव कोट्यातील अर्जुन सिंह फॉर्म्युला वापरण्यासाठी सर्व आय.आय.एम मध्ये दरवर्षी २०-२५ जागा वाढविण्यात येणार आहेत.
अभ्यासक्रम दोन वर्षांचा असे समजले जात असले तरी तो प्रत्यक्षात २० महिन्यांचाच असतो. माझा अभ्यासक्रम जून २००९ मध्ये सुरू झाला आणि फेब्रुवारी २०११ मध्ये संपेल.प्रत्येक वर्षात तीन टर्म असतात आणि प्रत्येक टर्म दोन ’स्लॉट’ मध्ये विभागलेली असते.म्हणजे प्रत्येक वर्षात एकूण ६ स्लॉट असतात.पहिल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम समान असतो.त्यात अर्थशास्त्र, फायनान्स, अकाऊंटिंग,मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स आणि ऑपरेशन्स या महत्वाच्या विषयांची तोंडओळख करून देण्यात येते.पुढच्या वर्षी विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे स्वत:चे विषय निवडतात. एखाद्या विद्यार्थ्याला जर एखादा विषय (समजा फायनान्स) खूप आवडला तर पुढच्या वर्षी सर्व विषय फायनान्सशी संबंधित घेता येतात.नाहीतर दोन किंवा तीन विषयांचे (उदाहरणार्थ फायनान्सचे काही आणि मार्केटिंगचे काही) असे काही विषय काही अटी पूर्ण करून विषय घेता येतात.
आमच्या पीजीपी (एम.बी.ए ला समकक्ष) अभ्यासक्रमाचे ३१५, पीजीपी-एबीएम (ऍग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेन्ट) चे ३५ आणि प्रथम वर्ष फेलो प्रोग्रॅम मॅनेजमेन्ट चे २० असे मिळून ३७० विद्यार्थी पहिल्या वर्षात एकच अभ्यासक्रम शिकतात. अर्थातच ३७० विद्यार्थी एका वर्गात एकत्र शिकणे शक्य नसते.त्यामुळे हे विद्यार्थी ए,बी,सी आणि डी या चार सेक्शनमध्ये असतात.प्रत्येक सेक्शनमध्ये ९२ किंवा ९३ विद्यार्थी असतात.
आय.आय.एम अहमदाबादमध्ये समूह शिक्षणाला खूप महत्व असते.अभ्यासासाठी प्रत्यक्ष बिझनेसमध्ये आलेल्या केसेस केस स्टडी म्हणून असतात.त्या केसचा सर्व अंगांनी विचार करून विद्यार्थ्यांनी वर्गात जाणे अपेक्षित असते.कोणत्या दिवशी कोणती केस वर्गात घेणार याचे टाईमटेबल आधीच देण्यात येते.या केसेस बहुतांश वेळा हार्वर्ड किंवा त्या दर्जाच्या विद्यापीठात वापरण्यात येत असलेल्या असतात.प्राध्यापक वर्गात केस ’डिस्कस’ करतात आणि विद्यार्थ्यांनी पण त्यांची मते मांडणे गरजेचे असते.प्रत्येक विध्यार्थी वर्गात किती प्रमाणात आणि कोणत्या दर्जाचा सहभाग घेतो याला मार्क असतात.प्रत्येक विद्यार्थी काय बोलत आहे आणि ते वर्गाच्या सामुहिक शिक्षणासाठी किती महत्वाचे आहे याची नोंद प्राध्यापकांचे मदतनीस (टिचिंग असिस्टंट) ठेवत असतात.वर्गातील ९२-९३ विद्यार्थ्यांपैकी सर्वांची ओळख मदतनीसांना असणे शक्य नसते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्गात बसायच्या जागा ठरलेल्या असतात आणि कोणत्या जागेवर कोण बसले आहे याची यादी आणि प्रत्येक विद्यार्थ्याची छायाचित्रे मदतनीसांकडे असतात. त्यावरून मदतनीस वर्गातील सहभागाबद्दल मार्क देतात.पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा वर्ग

आय.आय.एम अहमदाबादमधील पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मॅनेजमेन्ट हा निवासी अभ्यासक्रम आहे.सर्व विद्यार्थ्यांना संस्थेच्या वसतीगृहामध्येच राहणे सक्तीचे असते.एखादा विद्यार्थी मूळचा अगदी अहमदाबादमधील असला तरी त्याला वसतीगृहावर राहणे सक्तीचे असते. वसतीगृहाच्या अशा २४ इमारती संस्थेच्या आवारात आहेत. २००३-०४ मध्ये संस्थेचा पसारा वाढला आणि विद्यार्थीसंख्या वाढली म्हणून संस्थेचा ’नवा कॅम्पस’ बांधण्यात आला. २४ पैकी १८ इमारती जुन्या कॅम्पसमध्ये तर उरलेल्या ६ नव्या कॅम्पसमध्ये आहेत.जुन्या कॅम्पसमध्ये सर्वत्र लाल रंगाचे साम्राज्य आहे तर नव्या कॅम्पसमध्ये नव्या पध्दतीची इमारत बांधणी आहे. वसतीगृहाच्या एका इमारतीत साधारणपणे २० ते ४० खोल्या असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र खोली असते.’रूम मेट’ ही भानगड आय.आय.एम मध्ये नाही.प्रत्येक वसतीगृहात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असते तसेच सौर पॅनेलद्वारे गरम पाण्याची सोय उपलब्ध केली आहे. प्रत्येक खोलीमध्ये फोनचे कनेक्शनही असते.त्यासाठी संस्थेने टाटा इंडिकॉमबरोबर करार केला आहे.कॅम्पसमध्ये सर्वत्र फोन विनाशुल्क उपलब्ध असतात. लाल रंगाच्या इमारती बाहेरून चांगल्या दिसत असल्या तरी राहण्यासाठी त्या तितक्याशा सोयीस्कर नाहीत त्यापेक्षा नव्या कॅम्पसमधील इमारती राहायला अधिक चांगल्या आहेत.जुन्या कॅम्पसमधील वसतीगृहाच्या लाल रंगाच्या इमारती


नव्या कॅम्पसमधील वसतीगृहाची इमारत

सर्व विद्यार्थ्यांच्या जेवायची सोय मेसमध्ये केली आहे.दिवसातून चार वेळा-- सकाळी नाश्ता,दुपारी आणि रात्री जेवण आणि संध्याकाळी चहा-कॉफी आणि स्नॅक्स असा बेत असतो. तसेच संस्थेचे कॅन्टिनपण आहे.ते सकाळी ८ ते रात्री ४ असे २० तास चालू असते. फोनवरून ऑर्डर दिल्यास विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये खाद्यपदार्थ आणून दिले जातात.

मेसकॅन्टिन

आय.आय.एम अहमदाबादमधील कोर्स हा अत्यंत आव्हानात्मक असतो.प्रत्येक क्लासची तयारी आधी करून जाणे अपेक्षित असल्यामुळे वेळेची मॅनेजमेन्ट हा मोठा जिकरीचा भाग असतो.आय.आय.एम मध्ये गेल्यापासून रात्री २ च्या आत झोपल्याचे मला आठवतच नाही. इथे विद्यार्थी म्हणून आल्यानंतर सगळेजण आपोआपच निशाचर बनतात. नुसता अभ्यासक्रम बघितला तर आय.आय.एम अहमदाबादमध्ये खूपकाही वेगळे शिकवतात असे नाही.इतर कोणत्याही बी-स्कूल मध्ये जो अभ्यासक्रम असतो तोच अभ्यासक्रम इथेही असतो.मग आय.आय.एम चेच नाव जास्त का? त्याचे कारण म्हणजे इथे येण्यासाठी असली जबरदस्त स्पर्धा आणि त्यामुळे इथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कॅलिबर उच्च दर्जाचे असते.२००९-११ च्या बॅचसाठी दर १०,००० अर्जांमधील १४ विद्यार्थ्यांची निवड संस्थेने केली आणि उरलेल्या ९९८६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.साहजिकच हे १४ विद्यार्थी उच्च दर्जाचे असतात हे सांगायलाच नको.आमच्या बॅचमधील ३१५ पैकी कमितकमी १५० विद्यार्थी मूळचे आय.आय.टी मधील आहेत.एक विद्यार्थी आय.आय.टी साठीच्या जे.ई.ई या प्रवेशपरीक्षेत भारतात १२ व्या क्रमांकावर होता आणि आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.दुसरा विद्यार्थी जे.ई.ई मध्ये १० व्या क्रमांकावर होता आणि आय.आय.टी दिल्ली मध्ये चारही वर्षे टॉपर होता.त्यानंतर लेहमन ब्रदर्समध्ये आणि लेहमन कोसळल्यानंतर नोमूरामध्ये तो नोकरीस होता.फायनान्समधील नावाजलेल्या ’सी.एफ.ए’ या परीक्षेच्या तीनही लेव्हल त्याने आय.आय.एम मध्ये यायच्या आधीच पूर्ण केल्या आहेत. अशा कॅलिबरच्या विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकायला मिळते.आय.आय.एम मध्ये जाण्यापूर्वी माझे ’प्रोफाईल’ खूप चांगले आहे असा माझा (गैर)समज होता तो अशा विद्यार्थ्यांना बघून दूर झाला इतकेच नव्हे तर माझे ’प्रोफाईल’ अशा विद्यार्थ्यांपुढे साध्या शब्दात सांगायचे झाले तर ’कचरा’ आहे हे माझ्या लक्षात आले. अर्थात त्यामुळे अजूनही खूपकाही करण्यासारखे आहे हे लक्षात येऊन अधिकाधिक कष्ट घ्यायची प्रेरणा पण मिळते.
आय.आय.एम मध्ये प्राध्यापक प्रत्येक विषयाचे ’गॉड’ असतात.प्रत्येक विषयासाठी मार्क कसे द्यायचे हे प्राध्यापकांच्याच हातात असते. प्रत्येक प्राध्यापकाला ते ठरवायचे स्वातंत्र्य असते. उदाहरणार्थ ३०% वेटेज मध्यावधी परीक्षेला, ३५% वेटेज अंतिम परीक्षेला, १५% वेटेज क्लास पार्टिसिपेशनला आणि २०% वेटेज प्रोजेक्टला अशा प्रकारे प्राध्यापक ठरवू शकतात.आणि सर्व निकषांवर विद्यार्थ्यांचे सातत्य बघून अंतिम ग्रेड दिली जाते. कधीकधी ’क्विझ’ हा पण एक निकष असतो.क्विझ म्हणजे छोटेखानी परीक्षाच.बहुतांश वेळी ही परीक्षा अर्ध्या तासाहून जास्त काळ चालत नाही. ही परीक्षा ’सरप्राईज’ परीक्षा असते. आमची सकाळी ८.४५ ते दुपारी १.१० या काळात तीन लेक्चर्स असतात. त्यानंतर सर्व विद्यार्थी जेवायला मेसमध्ये जातात.मेसबाहेर एक ’क्विझ नोटिस बोर्ड’ आहे. त्यावर दुपारी १.३० पर्यंत नोटिस लावून दुपारी २.३० वाजता कोणत्या विषयाचे क्विझ आहे हे सांगितले जाते.जर १.३० पर्यंत नोटिस लागली नाही तर आज क्विझ नाही असे समजून विद्यार्थी आपल्या खोलीत जाऊन पाहिजे ते करायला (बहुतांश वेळी झोपायला) मोकळा असतो.क्विझ नोटिस बोर्ड

आय.आय.एम मध्ये वेळ आणि डेडलाईन अत्यंत कसोशीने पाळल्या जातात.सकाळी ८.४५ ला लेक्चर सुरू होणार म्हणजे सकाळी ८.४४.५९ पर्यंत वर्गात पोहोचणे अपेक्षित असते.सर्व लेक्चर्सना उपस्थित असणे अत्यंत गरजेचे असते आणि काही कारणाने अनुपस्थित राहायचे असेल तर प्राध्यापकांची परवानगी घ्यावी लागते.अनेकदा प्रोजेक्ट किंवा इतर असाईनमेन्ट ई-मेलवर किंवा आंतरजालावर अपलोड करायच्या असतात.अपलोड करायची ’डेडलाईन’ बहुतेक वेळा रात्री ११.५९.५९ किंवा मध्यरात्रीनंतर १.५९.५९ अशी असते. एक सेकंदाचा उशीरही चालत नाही कारण ते सॉफ्टवेअर ठरलेल्या डेडलाईननंतर एक सेकंदही उशीरा असाईनमेन्ट स्विकारत नाही. असा उशीर झाल्यास त्या असाईनमेन्टचे मार्क गमावावे लागतात.
असो.आय.आय.एम मधील विद्यार्थीजीवनाची मराठीत ओळख करून देणारे फारसे लेख उपलब्ध नाहीत म्हणून हा लेखप्रपंच. मधल्या काळात आम्हाला १० दिवसांची सुटी होती त्या काळात हा लेख लिहून पूर्ण केला आहे. कॉलेज चालू असताना इतका वेळ लेखासाठी देता येणे केवळ अशक्यच.
मी माझ्या सदस्यपानावर माझा ई-मेल पत्ता लिहित आहे.जर कोणाही मिपाकराला किंवा परिचयातील कोणाही विद्यार्थ्याला आय.आय.एम अहमदाबादकडून प्रवेशप्रक्रियेसाठी मुलाखतीचे निमंत्रण आले असेल तर माझ्याशी ई-मेलवर जरूर संपर्क साधावा. माझाकडून होईल तितकी मदत मी नक्कीच करेन. तसेच सोमवार १६ नोव्हेंबर पासून पूर्णवेळ कॉलेज सुरू झाल्यावर मिपावर इतके मोठे प्रतिसाद द्यायला मला वेळ मिळेल असे नाही त्यामुळे उत्तर लिहायला २-३ दिवसांचा अवधी जाऊ शकेल.तेव्हा सहकार्य करावे ही विनंती.