Saturday, April 4, 2009

पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी

यापूर्वीचे लेखन

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती
पैशाची कहाणी भाग २: कमोडिटी मनी


पैशाची कहाणी भाग ३: रेप्रेझेन्टेटिव्ह मनी

मागील भागात आपण कमोडिटी मनी म्हणजे काय आणि तो कसा वापरात आणला गेला हे बघितले.या कमोडिटी मनीमध्येही काही अडचणी होत्याच.उदाहरणार्थ सोन्या-चांदी सारख्या मौल्यवान धातूंमध्ये फसवाफसवीची शक्यता होती.सोन्याच्या धातूमध्ये इतर काही मिसळून ते सोने म्हणून व्यवहारात आणले जायची शक्यता होती.त्यामुळे सोने स्विकारण्यापूर्वी त्याची शुध्दता तपासून बघायचा नवा ताप निर्माण झाला.तसेच लोक व्यवहारात असलेल्या सोन्याच्या वस्तूंमध्येही एकसारखेपणा असेल असे मानण्याचे काही कारण नाही. काही लोकांकडे मोठा रत्नहार असेल तर काहींकडे साध्या लहान अंगठ्या. तेव्हा या सोन्याच्या गोष्टींची मोडतोड केल्याशिवाय त्याचा वापर व्यवहारात करणे शक्य नव्हते.

तेव्हा नंतरच्या काळात (राजसत्ता आल्यानंतरच्या काळात) सरकार पुढाकार घेऊन सोन्याची नाणी पाडू लागले.याचा फायदा असा झाला की सरकारने पाडलेले नाणे म्हणजे त्यात भेसळ नसणार याची खात्री लोकांना मिळाली.आणि दुसरे म्हणजे सोन्याच्या वजनात आणि मापात एकसारखेपणा आल्यामुळे व्यवहार सुटसुटीत झाला.तरीही सोन्याची नाणी व्यवहारात वापरणे ही एक जिकरीची बाब तर होतीच.ही नाणी एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना चोर दरोडेखोरांचे भय होतेच.आणि दुसरे म्हणजे सोने हा धातू मुळातच जड असल्यामुळे ही नाणी बरोबर वागवणे त्रासदायक होते.

या समस्येवर युरोपात उपाय निघाला.सरकारने सोन्याच्या मालकीची हमी देणारी कागदपत्रे (सर्टिफिकिटे) देणे सुरू केले.आणि या सर्टिफिकिटांच्या बदल्यात त्यावरील किंमतीइतकी सोन्याची नाणी बदलून मिळतील अशी हमी मिळाली.म्हणजे आपल्याकडील सोन्याची नाणी सरकारमान्य पेढीमध्ये द्यायची आणि त्याच्या बदल्यात त्या सर्टिफिकिट घ्यायचे.सोन्याची नाण्यांची ने-आण करण्यापेक्षा कागदाच्या तुकड्याची ने-आण करणे जास्त सोपे होते.आणि सर्व गोष्टींसाठी सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात सर्टिफिकेटची देवाणघेवाण होऊ शकत असे.

नंतरच्या काळात कागदी चलनाचा जन्म झाल्यावर सरकारने सर्टिफिकेट ऐवजी चलनच छापणे सुरू केले.पण मनात येईल तितके चलन सरकार छापत नसे.१७१७ मध्ये इंग्लंडने ११३ ग्रेन (सध्याचे ७.३२ ग्रॅम) सोन्याचे मूल्य एक पौंड असे ठरवले.सरकारला सोन्याच्या खाणीतून मिळालेल्या सोन्याच्या प्रमाणातच पौडांच्या नव्या चलनी नोटा छापल्या जात असत.पौंडाच्या चलनी नोटा आणि सोने interconvertible असत.पुढे १८३४ साली अमेरिकेने एक ट्रॉय औंस (सध्याचे ३१.१ ग्रॅम) सोन्याची किंमत २०.६७ डॉलर अशी ठरवली.याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर आणि पौंडाचा विनिमय दर ठरलेला असे. सध्याच्या ग्रॅम या एककात आकडेमोड केली तर असे दिसते की एका डॉलरमध्ये जवळपास १.५ ग्रॅम (३१.१ भागिले २०.६७) सोने येत होते तर एका पौंडामध्ये ७.३२ ग्रॅम सोने येत होते. म्हणजेच एका पौंडाची किंमत सुमारे ४.८८ डॉलर होती.जोपर्यंत डॉलर आणि पौंडाचा सोन्याबरोबरचा विनिमय दर स्थिर होता तोपर्यंत डॉलर आणि पौंडाचाही परस्परांबरोबरचा विनिमय दर स्थिर होता.डॉलर-पौंड यांच्या सोन्याबरोबरच्या विनिमय दरात सरकारच्या निर्णयानुसार बदल केले जात होते. त्यानुसार डॉलर-पौंडच्या विनिमय दरांमध्येही बदल होत होते.

अमेरिकेत १८६० च्या दशकात गुलामगिरीच्या प्रश्नावरून यादवी युद्ध झाले.त्यानंतरच्या काळात खाणींमधून सोने काढायच्या कामावर अनेक वर्षे परिणाम झाला होता.सरकारला जेवढे सोने बाजारात आणायचे होते तेवढ्याच प्रमाणात नवे डॉलर छापले जात होते.खाणींमधून सोन्याची आवक कमी झाल्यामुळे डॉलरही तेवढ्या प्रमाणावर कमी छापले जाऊ लागले.१८९५ च्या सुमारास अमेरिकेची अर्थव्यवस्था ५% वेगाने वाढत होती आणि सोन्याची आवक त्यापेक्षा कमी होती.या कारणामुळे वस्तूंच्या किंमती कोसळल्या. समजा १८९४ मध्ये १०० डॉलरमध्ये १०० युनिट अर्थव्यवस्था अशी परिस्थिती असेल.म्हणजे १ युनिटसाठी १ डॉलर मोजावा लागत होता.त्यापुढील वर्षी अर्थव्यवस्था १०५ युनिटपर्यंत वाढली पण सोन्याच्या कमतरतेमुळे १०४ डॉलरच बाजारात येऊ शकले तर १८९५ मध्ये १ युनिटसाठी १ डॉलरपेक्षा कमी किंमत मोजावी लागत होती.त्यामुळे बाजारात समजा किंमती ५% ने कमी होत असतील तर कारखानदारांनी कामगारांचे पगार कमी किंमतीचा बागूलबोवा दाखवून ५% पेक्षा जास्त कमी केले. यात कामगारांचे नुकसान होऊ लागले.त्यामुळे १८९६ च्या डेमॉक्रॅटिक नॅशनल कन्व्हेंशन मध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार विल्यम ब्रायन यांनी ’गोल्ड स्टॅंडर्ड’ मध्ये बदल करावा अशी मागणी केली.

पुढे पहिल्या महायुध्दाच्या दरम्यान इंग्लंडने ’गोल्ड स्टॅंडर्ड’ काढून टाकले आणि पौंड सोन्याशी निगडीत न ठेवता छापायला सुरवात केली.पण १९२५ मध्ये परत ’गोल्ड स्टॅंडर्ड’ वापरात आले.

दुसरे महायुध्द संपायला आले असताना १९४४ मध्ये अमेरिकेतील न्यू हँपशायर राज्यात ’ब्रेटन वुड’ या ठिकाणी ’United Nations Monetary and Financial Conference’ भरली.या परिषदेत काही महत्वाचे निर्णय झाले.जागतिक बँक (International Bank for Reconstruction and Development) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) या महत्वाच्या संस्थांची स्थापना करण्यासाठीची बोलणी या परिषदेत झाली. तसेच गॅट कराराची (General Agreement on Tarrifs and Trade) बोलणीही या परिषदेत झाली.दुसर्‍या महायुध्दात महाभयंकर हानी झाली होती.तेव्हा त्यानंतरच्या काळात अशी हानी परत होऊ नये म्हणून जागतिक व्यापाराला संघटित स्वरूप द्यायचे ठरले.यामागची भूमिका अशी की सर्व देशांचे हितसंबंध एकमेकांमध्ये गुंतले तर भविष्यकाळात कोणत्याही देशाला स्वत:च्या हितसंबंधांना धक्का न लावता दुसर्‍या देशावर हल्ला करता येणार नाही आणि यातूनच युध्दखोरी कमी होईल.

’ब्रेटन वुड’ परिषद ही जागतिक व्यापारासाठी महत्वाची होती.त्या परिषदेत अमेरिकेचे गोल्ड स्टॅंडर्ड चालू ठेवायचा निर्णय घेतला.अमेरिकेने आपल्या डॉलरची किंमत सोन्याच्या तुलनेत ’फिक्स’ केली. एका औंस सोन्यासाठी ३५ डॉलर अशी किंमत ठरवली गेली.अमेरिकेने त्याच प्रमाणात नव्या नोटा चलनात आणाव्या असे ठरले. तसेच इतर देशांनी आपली चलने अमेरिकन डॉलरला ’पेग’ करावीत असे ठरले. त्याकाळी डॉलर आणि भारतीय रुपयामध्ये ५ रुपये=१ डॉलर असा दर होता.म्हणजे त्याकाळी भारताने हा दर कायम ठेवण्यासाठी लागतील तितक्या नोटा छापाव्यात असे ठरले.

नंतरच्या काळात अमेरिकेत मंदी आलेली असताना आणि Balance of Payment ऋण असताना दोनदा आपल्या चलनाचे अवमूल्यन केले.म्हणजे एक औंस सोन्यास ३५ पेक्षा कमी डॉलर येऊ लागले. व्हिएटनाम युद्धात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला.तसेच फ्रान्सचे अध्यक्ष द गॉल यांनी अमेरिकेचे आर्थिक वर्चस्व कमी करण्यासाठी आपल्याकडील अमेरिकन डॉलर कमी केले आणि अमेरिकेकडून सोने घेतले. या कारणांमुळे १९७१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी गोल्ड स्टॅंडर्ड रद्द केले आणि डॉलरची खुल्या बाजारातील किंमत मागणी-पुरवठ्याच्या आधारावर ठरेल हे जाहिर केले.

तेव्हा १९७१ पर्यंत एका अर्थी सोने हेच चलन होते.वरकरणी दिसायला डॉलर-पौंड-येन दिसत असत पण ते सोन्यामध्ये कधीही बदलून घेता येत असत. या चलनाच्या प्रकाराला Representative Money म्हणतात. १९७१ मध्ये तो प्रकार संपुष्टात आला.वापरात असलेली सर्टिफिकिटे हा ही Representative Money चा एक प्रकार.

आता पुढील भागात आपण सध्या वापरात असलेला प्रकार-- फियाट मनी याचा उहापोह करू. यापूर्वीच्या भागात लिहिलेल्या गोष्टी फारशा कठिण नव्हत्या आणि नुकत्याच वाचलेल्या होत्या म्हणून त्याविषयी लिहिणे त्या मानाने सोपे होते.फियाट मनी हा जरा किचकट प्रकार आहे तेव्हा त्यावर लिहायला थोडा काळ जाईल असे वाटते.

संदर्भ

१) गोल्ड स्टॅंडर्ड हा विकिपिडियावरील लेख

२) International Economics हे रॉबर्ट कारबॉ या मध्य वॉशिंग्टन विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांचे पुस्तक.

No comments: