Friday, April 3, 2009

पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती

माझा मिसळपाव या मराठी संकेतस्थळावरील पैशाची कहाणी भाग १: वस्तूविनिमय पध्दती हा लिहिलेला लेख. (दिनांक ३ एप्रिल २००९)

जसाजसा मानवी संस्कृतीचा विकास होत गेला तशातशा माणसाच्या गरजाही वाढत गेल्या.अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांबरोबरच त्याला दागदागिने,चपला, लोहारकाम,मनोरंजना यासारख्या सेवांच्या गरजा वाढीस लागल्या.कोणीही व्यक्ती आपल्याला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टींची/सेवांची पूर्तता करू शकत नाही हे त्याबरोबरच सर्वांच्या लक्षात आले.तेव्हा प्रत्येकाने आपल्याला जी गोष्ट चांगली बनवता येते ती बनवावी आणि त्या गोष्टींची देवाणघेवाण करून सर्वांच्या गरजा पूर्ण कराव्यात ही पध्दत रूढ झाली.

उदाहरण सोपे करायला माणसाच्या गरजा दोनच आहेत असे समजू. समजा या गरजा संत्री आणि कलिंगड या आहेत.म्हणजे काही लोक संत्र्याचे उत्पादन करतात आणि काही लोक कलिंगडाचे उत्पादन करतात आणि या दोन फळांची देवाणघेवाण करून सर्वांच्या गरजा पूर्ण केल्या जातात.एका कलिंगडाने जेवढी भूक भागेल तेवढी भूक भागवायला अनेक संत्री लागतील.तेव्हा देवाणघेवाण करताना कलिंगडाची निर्मिती करणारे एका संत्र्याबदल्यात एक कलिंगड हा व्यवहार नक्कीच मान्य करणार नाहीत.तेव्हा एका कलिंगडामागे किती संत्री हा व्यवहार दोघांनाही मान्य होईल अशा पध्दतीने ठरविणे गरजेचे झाले.अशा पध्दतीने एक माप तांदळामागे किती माप दूध,एका आंब्यामागे किती लिंबे यासारखे व्यवहार दोघांनाही मान्य अशा पध्दतीने ठरविले जाऊ लागले आणि त्यातून वस्तूविनिमय पध्दती वापरली जाऊ लागली.वस्तू विनिमय पध्दतीत समाजात उप्तादन केलेल्या सगळ्या गोष्टी बाजारात चलन म्हणून वापरात येऊ लागल्या.

गावातील व्यवहार थोडक्यात आटोपले जात होते आणि गरजा थोडया होत्या तेव्हा वस्तूविनिमय पध्दती ठिक होती.तरीही त्यात काही अडचणी होत्याच.समजा अ आणि ब या दोन व्यक्तींकडे अनुक्रमे दूध आणि तांदूळ आहेत. अ ला ब कडे असलेल्या तांदळाची गरज आहे तेव्हा समजा त्याने ब ला आपल्याकडील दूध तांदळाची किंमत म्हणून देऊ केले. पण जर ब ला काही कारणाने दूध नको असेल तर ब आपल्याकडचे तांदूळ अ ला द्यायला तयार होणार नाही.तेव्हा त्या दोघांमध्ये व्यवहार होणार कसा?म्हणजेच अ ला त्याच्याकडील दूध देऊन त्याला त्या बदल्यात तांदूळ देईल असा माणूस शोधून काढायला हवा. म्हणजेच विक्रेता आणि ग्राहक यांच्या गरजा एकसारख्याच हव्यात.नाहीतर व्यवहार होऊ शकणार नाही.

दुसरे म्हणजे काही वस्तू या अविभाजनीय असतात आणि त्यामुळे त्या व्यवहारात आणताना अडचणी येऊ शकतात. समजा एका कलिंगडाला चार संत्री असा व्यवहार ठरला आहे आणि ग्राहकाला दोनच संत्र्यांची गरज असेल तर तो आपल्याकडील कलिंगड अर्धे कापून तो व्यवहारात आणू शकेल.पण समजा एका शेळीस ५० संत्री असा व्यवहार ठरला आहे.आणि ग्राहकाला गरज २० संत्र्यांचीच आहे.मग त्याने काय करावे? ५० पेक्षा कमी संत्री आली तर तो व्यवहार त्याच्यासाठी महागाचा ठरेल.आणि विकताना शेळी पूर्णच विकायला हवी.तेव्हा अशा परिस्थितीतही व्यवहार होणे कठिण होते.

तिसरे म्हणजे व्यवहारासाठी वापरात असलेल्या बहुतांश गोष्टी नाशवंत होत्या.समजा एखाद्याकडे पिकलेले दहा आंबे आहेत.ते आंबे फारतर आठवडाभर राहतील.त्यानंतर ते खराब होणार आहेत.समजा एका व्यवहारात अशा आंब्यांची देवाणघेवाण झाली आहे.आणि आपल्याकडे आलेले आंबे त्या व्यक्तीस आठवडयात संपवता आले नाहीत तर त्या व्यक्तीचे काही कारण नसताना नुकसान होणार हे नक्कीच.

चौथे म्हणजे व्यवहारासाठी वस्तू वापरल्या जात असल्यामुळे एक ठराविक विनिमय दर अंमलात आणणे शक्य नव्हते आणि त्यात व्यक्तिगत आवडीनिवडी आणि गरजांचाही अंतर्भाव झाला.उदाहरणार्थ दोन व्यक्तींना आपल्या घरी १० माप तांदूळाची गरज आहे.त्यापैकी एकाकडे आधीच ९ मापे तांदूळ आहे आणि दुसर्‍याकडे १ मापच तांदूळ आहे.ज्याच्याकडे तांदूळ कमी आहे त्याला तांदळाची गरज जास्त आहे त्यामुळे तो आपल्याकडील वस्तू (समजा दूध) स्वस्तात विकायला तयार होईल.पण ज्याच्याकडे आधीच बराच तांदूळ आहे आणि ज्याला अजून १ माप तांदूळच हवा आहे तो आपल्याकडील दूध तेवढ्या स्वस्तात विकायला तयार होणार नाही.अशा परिस्थितीत या दोन विक्रेत्यांकडील दुधाच्या किंमतीत मोठी तफावत असेल.तसेच वैयक्तिक आवडीनिवडींचाही प्रभाव दरावर पडेल.एखाद्याला सोन्याच्या दागिन्यांची अतोनात आवड असेल तो आपल्याकडील दूध (किंवा इतर वस्तू) इतरांपेक्षा जास्त प्रमाणात मोजून सोने विकत घ्यायला तयार होईल. तेव्हा अशा परिस्थितीत प्रत्येक विक्रेत्याकडील किंमत वेगळी असेल. तेव्हा आपल्याला परवडत असलेल्या भावात विकणारा विक्रेता शोधायला ग्राहकांना बरीच पायपीट पडेल.

या सर्व कारणांमुळे वस्तूविनिमय पध्दती किचकट आणि त्रासदायक ठरली.तेव्हा ग्राहक आणि विक्रेता या दोघांनाही मान्य होईल असे माध्यम शोधून काढणे गरजेचे झाले.याच माध्यमाला आपण पैसा म्हणतो.या पैशाचा इतिहासही खूपच रोचक आहे.त्याविषयी पुढच्या भागात.


संदर्भ
एक नक्की संदर्भ सांगता येणार नाही.आतापर्यंत केलेले assorted reading हाच संदर्भ आहे.

No comments: