Wednesday, April 1, 2009

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याकडून माझ्या अपेक्षा

मिसळपाव या मराठी संकेतस्थळावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विनायक पाचलग यांच्या चर्चेवर मी दोन प्रतिक्रिया लिहिल्या (दिनांक २९ मार्च २००९ आणि ३१ मार्च २००९). त्या खालीलप्रमाणे

प्रतिक्रिया क्रमांक १ (दिनांक २९ मार्च २००९)

मी ठाण्यातील एका नामवंत शाळेचा विद्यार्थी होतो.आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांवर आणि शिक्षकांवर संघ परिवाराच्या विचारांचा पगडा होता.तेव्हा संघ परिवाराशी संबंधित मंडळी मधूनमधून आमच्या शाळेत येत असत.एकदा ठाणे जिल्ह्यातील जव्हार,मोखाडा या आदिवासी भागात शाळा चालवणारे सद्गृहस्थ आले होते.त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना हिंदू धर्माची ओळख करून द्यायला गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा यासारख्या स्तोत्रांची एक पुस्तिका दिली होती. ती पुस्तिका त्यांनी आमच्या वर्गातही वाटली.तसेच आपल्या चालिरितींमध्ये विज्ञान कसे आहे असे बादरायण संबंध लावून एक छोटेसे भाषण दिले.तसेच पूर्वीच्या काळी भारताने विज्ञानात मोठी प्रगती केली होती, आमच्याकडे पुष्पक विमान होते,शंकराची पिंड म्हणजे न्युक्लियर रिऍक्टर, आमच्याकडे अमुक होते तमुक होते या गोष्टी सांगितल्या.उज्वल भूतकाळापासून प्रेरणा घेऊन आज प्रगतीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत असे तर दिसत नाही.मग या सगळ्या गोष्टींचा आजच्या काळात उपयोग काय?पूर्वी आपल्याकडे पुष्पक विमान असेलही पण आज अमेरिकेतील बोईंग आणि फ्रान्समधील एयरबस वगळता कोणीही प्रवासी वाहतुकीसाठी लागणार्‍या मोठ्या विमानांचे उत्पादन करू शकत नाही आणि आपल्याला आजही त्याच कंपन्यांकडून विमाने खरेदी करावी लागतात त्याचे काय?तेव्हा संघपरिवाराकडे भविष्यासाठी काही ’व्हिजन’ आहे का त्यांना आपल्या चालिरिती, त्यामधील विज्ञान, अथर्वशीर्षादी स्तोत्रे यातच गुरफटून जायचे आहे हा प्रश्न मला तेव्हा तर पडलाच होता आणि आजही पडतो. भारत अनेक शतकांपर्यंत कर्मकांडाच्या जोखडात अडकून पडला होता आणि त्यामुळे आपले अपरिमित नुकसान झाले. पाश्चिमात्य जगतात आईनस्टाईन सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडत होता आणि राईट बंधूंचे विमानाचे उड्डाण चालू होते त्या काळात महाराष्ट्रात शाहू महाराजांना वेदातील मंत्रांचा अधिकार आहे की त्यांच्यासाठी पुराणातील मंत्र म्हणावेत या क्षुल्लक विषयावर खल चालू होता. संघाकडे असलेल्या निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या फौजेचा वापर करून या जोखडांविरूध्द लढायला मदत होऊ शकते. पण तसे होताना दिसत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.तेव्हा संघाने सावरकरांचा विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक काळाला अनुरूप असा मार्ग आचरला तर ते चांगले होईल.नुसता भारतीय संस्कृतीचा उदोउदो करायचा आणि आपल्या समाजाच्या गळ्याभोवती फास बनून राहिलेल्या रूढीपरंपरांचे एका परिने समर्थन करायचे हे मला तरी अयोग्य वाटते.

दुसरे म्हणजे संघाचे स्वदेशीविषयक आणि बहुराष्ट्र कंपन्यांविरोधी धोरण हे अर्थशास्त्रातील सिध्दांतांच्या विरोधी आहे.भारत आज पाश्चिमात्य देशांपेक्षा गरीब आहे. पण याचा अर्थ पाश्चिमात्य देशांबरोबर भारताला फायदेशीर व्यापार करता येणार नाही हे म्हणणे चुकीचे आहे.समजा दोन देशांमधील एक देश सगळ्या गोष्टी दुसर्‍या देशापेक्षा स्वस्तात बनवू शकत असला तरीही त्यांच्यात दोघांनाही फायदेशीर व्यापार होऊ शकतो हे इंग्लिश अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डोने सप्रमाण सिध्द केले आहे.तसेच परकिय गुंतवणुकीपासून त्यांना फायदा होतो तसाच आपल्यालाही फायदा होतो.निर्यातीला प्रेरणा देणारी धोरणे राबविण्याऐवजी देशातच कमी प्रतीच्या वस्तू तयार करण्यावर (Import substitution) भर दिल्यामुळे अनेक वर्षे भारत आर्थिक प्रगती करू शकला नव्हता.त्याच धोरणांना चिकटून राहून घड्याळाचे काटे मागे नेण्यात आपले हित आहे का?

---विल्यम जेफरसन क्लिंटन


प्रतिक्रिया क्रमांक २ (दिनांक ३१ मार्च २००९):

गझनीच्या महंमदाबरोबर अल-बेरूनी नावाचा एक इतिहासकार आला होता.त्याने म्हटले आहे की भारतीय लोकांना वाटते की आपलीच संस्कृती तेवढी श्रेष्ठ आणि जग कुठे चालले आहे याकडे त्यांचे लक्ष नसते.गेल्या हजार वर्षात त्यात खूप फरक पडला आहे असे वाटत नाही.नव्या विचारांचे स्वागत न करता आम्ही तेवढे शहाणे असे म्हणत आपण आपल्या खोलीचे दरवाजे बंद करून घेतले तर दरम्यानच्या काळात जग पुढे निघून जातेच पण आपल्या खोलीतही वातावरण कधी कुजायला लागते हे समजत नाही.पाणी साचून त्याचे डबके झाले की त्यात मलेरियाचे डास होणारच.

भारतातील सामान्य लोकांच्या राहणीमानात गौतम बुध्दाच्या काळापासून इंग्रज येण्यापूर्वीच्या काळात खूप जास्त फरक पडला नव्हता.बारा बलुतेदारी पध्दत कायमच होती.इतकेच नव्हे तर बलुतेदार वापरत असलेली हत्यारे, शेतकरी वापरत असलेले नांगर यात दोन-अडीच हजार वर्षात फारसा फरक पडला नव्हता.अशा वातावरणात जातीव्यवस्था,सती,बालविवाह,हुंडा यासारख्या प्रथा समाजात कधी आणि कशा रूजल्या हे कोणालाच कळले नाही.अनेक लोक अशा प्रथांचे खापर परकिय आक्रमणांवर फोडतात. ते काही अंशी बरोबर आहे पण १००% बरोबर नाही असे मला वाटते.एक उदाहरण द्यायचे झाले तर संत ज्ञानेश्वरांचा जन्म १२७५ मधला.ते ७-८ वर्षाचे असताना आपला समाज संन्याशाच्या मुलांच्या मुंजी कराव्या की करू नयेत या चर्चेत मश्गूल होता.त्यावेळी महाराष्ट्रावर तरी एकही परकिय आक्रमण झालेले नव्हते.पहिले आक्रमण अल्लाद्दिन खिलजीचे त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १२९३ चे. याउलट त्यावेळी महाराष्ट्रात श्रीमंती आणि ऐश्वर्य अपरंपार होते.तरीही असल्या चर्चा आपला समाज करतच होता.

भारतात इंग्रज येण्यापूर्वीच्या काळात आपला समाज विविध रूढीपरंपरांनी गांजलेला होता.इंग्रजांचे राज्य भारतात सर्वप्रथम बंगालमध्ये स्थापन झाले. त्यानंतरच्या काळात आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय पासून केशवचंद्र सेन,ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यापर्यंत समाज सुधारकांची मोठी फौज बंगालमध्ये झाली.महाराष्ट्रातील इंग्रज आल्यानंतरच्या काळातील पहिले समाज सुधारक महात्मा फुले.राजा राममोहन रॉय फुल्यांच्या आधीचे.इंग्रज विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.तसेच भगवद्गीता आणि भारतीय संस्कृतीचाही त्यांचा अभ्यास होता.त्यांच्या सारख्या समाज सुधारकांनी बंद झालेले दार उघडले आणि पाश्चिमात्य विचारातीलही चांगले ते घेतले आणि काही वर्षातच बंगाल प्रांत सर्व क्षेत्रात भारतात अग्रेसर झाला.बंगालमध्ये इंग्रज राज्य सर्वप्रथम स्थापन होणे आणि त्यानंतर काही वर्षातच तो प्रांत भारतात अग्रेसर बनणे हा केवळ योगायोग आहे असे मला वाटत नाही.बंगालमध्ये लोकांनी आपल्या प्रतिभेचा वापर केलाच आणि त्याच बरोबर नव्या पाश्चिमात्य विचारांचे स्वागत केले याचा तो परिणाम आहे.यात मी इंग्रज राज्याची भलामण करत आहे असे कृपा करून समजू नका.इंग्रज राज्याचे भारतावर इतर दुष्परिणाम नक्कीच झाले.पण वस्तुनिष्ठ अभ्यास करताना जे आहे ते मान्य करण्यास काहीच अडचण नसावी.काही अंशी असाच चांगला बदल महाराष्ट्रात झाला.पण इतर प्रांत (ओरीसा वगैरे) या बदलापासून दूर राहिले आणि दुर्दैवाने बंगाल-महाराष्ट्रात जे घडले ते तिथे घडले नाही.

भारतीय संस्कृतीत भगवद्गीतेसारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत.त्यातील बहुतांश गोष्टी हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत.त्यातल्या सध्याच्या काळास लागू होत असलेल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात.त्याचबरोबर इतर समाजातून चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि आपल्या भविष्यकाळासाठी त्याचा वापर करावा ही अपेक्षा.पण केवळ भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आणि पाश्चिमात्य संस्कृतीत सर्वकाही त्याज्य आहे अशा स्वरूपाची आत्मकेंद्री भावना घातक ठरेल.सध्याच्या पाश्चिमात्य जगतात केवळ स्वैराचार आहे असे नाही तर एम्.आय.टी, प्रिन्सटन सारखी जगप्रसिध्द विद्यापीठे आहेत आणि त्यात अनेक ऋषितुल्य प्राध्यापक संशोधन करतात याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणे योग्य नाही.भारतीय संस्कृतीतही जसा राम आहे तसा रावणही आहेच.तेव्हा सर्व चांगल्या गोष्टींची ठेकेदारी भारतीय संस्कृतीची (आणि तीही हजारो वर्षापूर्वीची) आणि सर्व वाईट गोष्टी इतरांच्या अशी आत्मवंचना करत आपणच आपली कॉलर ताठ करणे योग्य नाही असे मला वाटते. संघ परिवारातील मंडळींकडे बघून ते नेमके हेच करत आहेत असे वाटते.

सध्याच्या जिहादी दहशतवादाच्या काळात हिंदू समाजाचे संघटन करणे ही काळाची गरज आहे आणि संघ ते करत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे.पण त्याचबरोबर आपली दारे बंद करून जी चूक आपल्या पूर्वजांनी केली तीच चूक संघासारख्या संघटनेने करू नये ही अपेक्षा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

1 comment:

Waman Parulekar said...

girish dole ughadanar likhan aahe tuz...

asach lihit ja......

- vaman