Saturday, March 21, 2009

निसर्गाचे संकेत

माझा मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर प्रसिध्द झालेला निसर्गाचे संकेत हा लेख

नमस्कार मंडळी,

कधीकधी आपल्याला भविष्यात काय घडणार याची कल्पना निसर्ग स्वप्ने, भास किंवा जाणीवेच्या पातळीवरील अनुभवांमधून देतो. कधी त्याक्षणी निसर्गाच्या संकेतांचा अर्थ कळतो तर कधी कळत नाही. अनेकदा अशा एखाद्या अनुभवाचा किंवा स्वप्नाचा संबंध काय आणि तो अनुभव/स्वप्न का पडले हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्याविषयी फारसा विचार करत नाही. पण निसर्ग आपल्याला ज्या घटनेविषयी सुचित करायचा प्रयत्न करत आहे ती घटना घडून गेल्यानंतर मात्र आपल्याला अशा घटनांचा उलगडा होतो. मला नक्की काय म्हणायचे आहे हे मला स्वत:ला आलेल्या तीन अनुभवांमधून स्पष्ट होईल.

१) दिनांक २९ मे १९९७. माझे वडिल ठाण्यातील सिंघानिया रूग्णालयात अतिदक्षता विभागात होते.त्यावेळी आम्ही ठाण्यात राहायला होतो. २९ तारखेला सकाळी मी रुग्णालयात पोहोचलो.रूग्ण अतिदक्षता विभागात असेल तर नातेवाईकांनी आपल्या समाधानासाठी बाहेर थांबायचे कारण आत जायच्या ठराविक वेळा सोडून विभागात पाऊलही ठेवता येत नाही.आणि माझे वडिल त्यावेळी बेशुध्दावस्थेत असल्यामुळे आत गेल्यावरही कोणतेही संभाषण व्हायचा प्रश्नच नव्हता. तरीही मी तिथे जात होतो.त्या दिवशी दुपारी माझी बहिण आणि मावशी तिथे येणार होत्या.आणि आम्ही तिघांनी रूग्णालयाच्या कँटिनमध्ये जेऊन मग मी घरी परत जाणार होतो.मी आदल्या दिवशी कँटिनमध्ये जाऊन चहा घेतला होता त्यामुळे मला कँटिन कुठे आहे याची पूर्ण कल्पना होती.तर माझ्या बहिणीला आणि मावशीला कँटिनची जागा माहित नव्हती आणि मी त्यांना तिथे घेऊन जाणार होतो.

कँटिनकडे जाण्यासाठी एका लांब पॅसेजच्या मध्ये खाली जाणारा एक जीना होता.त्या जीन्यावरून कँटिनला जायचे होते.पण त्या दिवशी काय झाले काय माहित.मी कुठे जात आहे याचे अजिबात भान मला नव्हते.मी त्या लांब पॅसेजमध्ये जीन्यावरून खाली न जाता चालतच राहिलो.आणि मी पूर्णपणे ’ब्लँक’ झालो होतो.त्याच पॅसेजच्या शेवटी शवागार होते आणि तिथे गेल्यावर माझी बहिण म्हणाली ’अरे इथे कुठे घेऊन आलास?आपल्याला कँटिनला जायचे आहे’.तेव्हा मी भानावर आलो आणि माझ्या रस्ता चुकल्याचे लक्षात आले.मग मी परत त्या पॅसेजमधून उलटे जाऊन कँटिनमध्ये गेलो.

हा सगळाच प्रकार माझ्यासाठी अनाकलनीय होता.पुढे दोन दिवसांनी ३१ मे १९९७ रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले.तेव्हा माझ्या लक्षात आले की दोन दिवसांपूर्वी झालेला प्रकार म्हणजे पुढे काय होणार आहे याचा निसर्गाने दिलेला संकेत होता.त्याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही पण नंतर कळला.

२) दुसरा प्रकार मी अमेरिकेत असताना घडला.मी अमेरिकेत पी.एच.डी करत होतो आणि माझ्या दुर्दैवाने मला पी.एच.डी साठी मार्गदर्शन करणारे गाईड अत्यंत त्रास देणारे निघाले.मार्गदर्शन करण्यापेक्षा कसलेच मार्गदर्शन न करणे असा त्यांचा स्वभाव निघाला.मी माझ्या परिने होईल तितके हातपाय मारले आणि बराच प्रयत्न केला.पण पूर्णपणे स्वत:च्या हिंमतीवर व्हायला पी.एच.डी म्हणजे पाचवीची परीक्षा नव्हे!दगडावर डोके आपटून रक्त येण्याखेरीज दुसरे काहीही होत नाही आणि उगीच ’टाईमपास’ चालला आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी पी.एच.डी सोडून भारतात परत यायचा निर्णय घेतला.

माझा दुसरा अनुभव आहे ऑक्टोबर २००७ मधला.मी भारताबाहेर बराच काळ राहिल्यामुळे भारत हाच माझ्यासाठी परदेश झाला होता.आणि भारतात परत गेल्यावर मला नोकरी मिळणार की नाही, त्यासाठी किती दिवस थांबावे लागेल अशा अनंत चिंतांनी घेरून टाकले होते. त्यावेळी अमेरिकेतील कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याप्रमाणे माझे वेळापत्रक विचित्र होते. झोपायच्या उठायच्या वेळा याला काहीही धरबंद नव्हता.
एकदा विद्यापीठात सर्व एम.एस आणि पी.एच.डी च्या विद्यार्थ्यांसाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते.अशा सेमिनारमध्ये मेहेरदाद नेगाहबान या भारदस्त नावाचे मूळचे इराणी असलेले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आयोजन करण्यात पुढे असत.सेमिनार दुपारी चारच्या सुमारास संपला आणि मी त्यानंतर घरी येऊन झोपलो. झोपेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात प्रा.नेगाहबान विद्यापीठात होते आणि सेमिनारला हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ते ’इकडे या’ असे बोलवत होते. इतर विद्यार्थ्यांबरोबर मी पण तिकडे गेलो तर ते मला म्हणाले ,’अरे तू इथे का येतोस?हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही.तू दुसर्‍या मार्गाने जा’ असे म्हणून दुसर्‍या एका दिशेला त्यांनी बोट दाखवले. मी त्या दिशेला जाऊ लागलो.बरोबर इतर कोणीच नव्हते. विमान प्रवासात मी नेहमी न्यायचो ती हँडबॅग माझ्याजवळ होती आणि पुढे जाऊन बघतो तर विमान उभे होते.
त्यानंतर मी ताबडतोब जागा झालो. माझ्यासाठी ’चांगला मार्ग’ भारतात आहे आणि तिकडे नेण्यासाठी विमान माझ्यापुढे उभे होते. तसेच भारतात परत गेल्यावर सर्वकाही चांगले होईल असा तो संकेत आहे हे माझ्या लक्षात आले. ही कदाचित अंधश्रध्दा असेलही पण त्या क्षणानंतर माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. पुढे भारतात परत आल्यानंतर माझे सगळे चांगलेच झाले.

३) मी मिपावर माझा २६/११ मुंबई हल्ल्यानंतरचे संपादकिय लिहिले.ते ई-मेलवर पाठवून दिले आणि थोड्या वेळातच मला माझ्या चुलत भावाचा फोन आला की माझ्या चुलत बहिणीचे यजमान ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावले.माझे वडिल आजारी असताना त्यांनी आम्हा सगळ्यांनाच खूप मदत केली होती.ही घटना घडायच्या ३-४ दिवस आधी मला १२ वर्षांपूर्वी झालेल्या घटना उगीचच आठवत होत्या. उदाहरणार्थ माझे वडिल रूग्णालयात असताना माझे त्यांचे काय बोलणे झाले ते मला आठवले.माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतून हॉलवर गेलो होतो.त्यावेळी काय बोलणे झाले ते पण मला आठवले.त्याच वर्षी त्यांच्या मुलाची शाळा बदलली होती. तेव्हा तो नव्या शाळेत नीट स्थिरावला का, त्याला नवे मित्र मिळाले का असे प्रश्न मी त्यांना विचारले होते. हे सगळे मला आठवले.
इतक्या वर्षांनंतर मुद्दामून आठवाव्यात इतक्या महत्वाच्या या गोष्टी निश्चितच नव्हत्या. तेव्हा हे सगळे मला का त्या वेळी का आठवावे हे मला कळेना.लवकरच त्यांच्याबद्दल काही बातमी येणार आहे हा तो संकेत होता का?

या सगळ्या गोष्टींचा बुध्दीवादाने खुलासा होईल असे वाटत नाही.ही अंधश्रध्दा आहे का हे मला माहित नाही पण निसर्ग कधीकधी भविष्यात काय होणार आहे याची कल्पना आपल्याला देत असतो का?अर्थात प्रत्येक महत्वाच्या घटनेची कल्पना आपल्याला मिळत नाही. ते का हे पण समजायला मार्ग नाही.

आपल्यापैकी कोणाला असे अनुभव आले आहेत का?

No comments: