Tuesday, March 31, 2009

एका मराठी ब्लॉगवरील लेखावर माझी प्रतिक्रिया

समीर पळसुले-देसाई यांच्या मराठी ब्लॉगवरील इतिहास की पौराणिक कथा या लेखावरील माझी प्रतिक्रिया.

>>ह्या रिकामटेकड्या मार्क्सवाद्यांनी प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत वाचला असता तर ही धूळ उडायचे कारणच नव्हते. 

मार्क्सवादी रिकामटेकडे आहेत यात शंका नाही.पण हे प्रभंजन शास्त्री कोण, त्यांचा सिध्दांत कोणत्या पुराव्यांवर आधारित आहे,त्याची सत्यासत्यता कोणी पडताळून बघितली आहे का या प्रश्नांची उत्तरे दिल्यास बरे होईल.उद्या कोणीही उठून स्वत:ला वाटेल तो सिध्दांत मांडेल. स्वत:ला शास्त्री म्हणवून घेतल्यामुळे हे सिध्दांत बरोबर होतात असे नक्कीच नाही.

>> हे सर्व डोंगर ढीग उकारून काढले तर कौरव-पांडव-कंस ह्यांच्या अस्तित्वाचे शेकडो पुरावे सापडतील.

तसा प्रयत्न कोणी केला आहे का?अमुक केले तर तमुकचे शेकडो पुरावे सापडतील या बोलण्याला काय अर्थ आहे?सिध्दांत वगैरे मोठे शब्द वापरले जातात तेव्हा ती गोष्ट पुराव्यानिशी सिध्द करता आली पाहिजे.संशोधनाच्या जगतात ’असेल’ याला फारसे महत्व नाही.जर मार्क्सवादी लोक हिंदूंच्या श्रध्देवर प्रहार करत आहेत असा आपला दावा असेल तर तो योग्य आहे.पण त्याला सिध्दांत वगैरे मोठ्या शब्दांचा मुलामा देऊ नका ही विनंती.या कारणामुळे हिंदू cause चे नुकसानच होते, फायदा नाही.

>>दुर्योधन-दु:शासन-कंस ह्यांच्या कवटया जीवाश्मांच्या रूपात सापडल्या म्हणजे ह्या उथळ डोक्याच्या मार्क्सवाद्यांची तोंडे बंद होतील

समजा उद्या कवट्या मिळाल्या तरी त्या कवट्या दुर्योधन-दु:शासन-कंस यांच्याच आहेत हे कसे सिध्द करणार?

आपला दावा आहे की रामायण-महाभारत हा इतिहास आहे.तसे असेल तर बुध्दीला पटेल असे पुरावे द्यावेत ही विनंती.माझ्या मते रामायण-महाभारत खरोखर घडले होते हा हिंदूंच्या श्रध्देचा भाग झाला.आणि त्या श्रध्देला कोणी आव्हान देऊ नये.ज्या न्यायाने ’व्हर्जिन मेरी’ येशूला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि तो श्रध्देचा भाग म्हणून गणला जातो तसाच रामायण-महाभारतही गणला जावा.आणि हो मी हिंदूंच्याच हितरक्षणाचा समर्थक आहे तरीही आपल्या लेखामुळे हिंदू cause चे नुकसान होईल असे राहून राहून वाटते म्हणून ही प्रतिक्रिया.

Wednesday, March 25, 2009

भारतातील प्रादेशिक पक्ष

प्रादेशिक पक्षांची वाढ होण्यामागे राष्ट्रीय पक्षांचे स्थानिक समस्या सोडविण्यात आलेले अपयश बर्‍याच अंशी जबाबदार आहे. एन.टी.रामाराव यांनी १९८२ मध्ये तेलुगु देसम पक्षाची स्थापना केली.त्यावेळी काँग्रेस पक्षाने राज्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले हाच त्यांचा मुद्दा होता.आसामातील बांगलादेशी घुसखोरांना विरोध करायला विद्यार्थी आंदोलन उभे राहिले आणि त्याच आंदोलनातून आसाम गण परिषदेचा जन्म झाला.मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात शिवसेनेचा जन्म झाला.या सगळ्या पक्षांचा जनाधार वाढला याला केंद्रात बहुतांश काळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने राज्यातील समस्यांकडे केलेले दुर्लक्ष (किंवा तसा समज) हाच कारणीभूत आहे. 

काही पक्षांची स्थापना वेगळ्या कारणाने झाली.उदाहरणार्थ पंजाबात अकाली दल हा शिखांचे हितरक्षण करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष तर तामिळनाडूत द्रमुक हा द्रविड अस्मितेचे रक्षण करायला स्थापन झालेला पक्ष होता.राष्ट्रीय पक्षांचे राज्याकडे झालेले दुर्लक्ष हा मुद्दा पंजाबात काही प्रमाणात लागू होता पण तामिळनाडूत मात्र द्रविड अस्मिता हाच मुद्दा प्रादेशिक पक्षाची स्थापना होण्यात महत्वाचा होता.तसेच काश्मीरातील काश्मीरींचे हितरक्षण करणारा नॅशनल कॉन्फरन्स हा प्रादेशिक पक्ष होता. सिक्कीममध्ये सिक्कीम संग्राम परिषद हा प्रादेशिक पक्ष होता.

पूर्वीच्या काळी काँग्रेस पक्ष बलिष्ठ होता तेव्हा त्याला आव्हान वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांनी दिले.तरीही उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजराथ, कर्नाटक,ओरिसा या मोठ्या भागात प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व नव्हते.आणि या प्रदेशात काँग्रेस पक्ष बलवान होता म्हणून विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष जिंकला तरी केंद्रात अस्थिरता निर्माण होत नव्हती.पण १९८९ नंतरच्या काळात परिस्थिती बदलली.१९८९ साली सर्व समाजवादी नेते जनता दलाच्या झेंड्याखाली एकत्र आले. समाजवादी नेते हे फुटण्यासाठीच एकत्र येतात हा इतिहास आहे.नंतरच्या काळात काँग्रेस पक्षही पूर्वीचे सामर्थ्य गमावून बसला.तेव्हा या पूर्वाश्रमीच्या जनता दलातून वेगवेगळ्या वेळी फुटून मुलायम सिंहाचा समाजवादी पक्ष, अजित सिंहांचा भारतीय लोकदल, ओमप्रकाश चौटालांचा भारतीय राष्ट्रीय लोकदल,शरद यादव-जॉर्ज फर्नांडिस यांचा जनता दल (संयुक्त), लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, रामविलास पासवानांचा लोकजनशक्ती आणि नवीन पटनाईकांचा बीजू जनता दल (नवीन पटनाईक १९९७ नंतर राजकारणात आले पण त्यांच्या पक्षातील सहकारी त्यांचे वडिल बीजू पटनाईक यांच्या बरोबर पूर्वाश्रमीच्या जनता दलात होते) असे विविध पक्ष स्थापन झाले.ही सगळी मंडळी १९८९ मध्ये जनता दलात एकत्र होती.त्यातील प्रमुख नेत्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. या पक्षांचे स्वरूप प्रादेशिक किंवा स्थानिक (उदाहरणार्थ अजित सिंहांच्या पक्षाचा प्रभाव बागपतजवळील उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात आहे.) असे होते आणि यामुळे प्रादेशिक पक्षांच्या कॅलोडोस्कोपमध्ये भर पडली. ही सर्व मंडळी किंवा त्यांचे पूर्वसुरी (अजित सिंहाचे वडिल चरण सिंह, बिहारमधील कर्पूरी ठाकूर इत्यादी) १९७७ च्या जनता पक्षातही एकत्र होते. पण १९८० नंतरच्या काळात या मंडळींना फाटाफूट होऊन स्वत:चे पक्ष स्थापन करता आले तरी काँग्रेस पक्ष मजबूत असल्यामुळे या पक्षांच्या वाढीला फारसा वाव नव्हता.तेव्हा १९८९ नंतर काँग्रेस पक्षात झालेला र्‍हास हे या पक्षांच्या वाढीचे एक प्रमुख कारण आहे. काही प्रमाणात काँग्रेसची जागा भरायला दुसरा राष्ट्रीय पक्ष भाजप होता. पण नंतरच्या काळात (१९९९ नंतर) भाजपचे जातीपातींचे गणित चुकले आणि प्रादेशिक पक्षांना मोकळे रान मिळाले.

या सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये मूळ राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षातून फुटून निघालेले पक्ष लक्षात घेतले तर अत्यंत गुंतागुंतीची परिस्थिती समोर दिसते.करूणानिधी आणि एम्.जी.रामचंद्रन यांच्यातील मतभेदांमुळे अण्णा द्रमुकची स्थापना तामिळनाडूत झाली. हा गट द्रमुकमधून फुटला होता.पुढे करूणानिधी आणि वायको यांच्यामधील मतभेदांमधून मद्रमुकची स्थापना झाली. हा ही गट द्रमुकमधूनच फुटला होता.जयललिता आणि जानकी रामचंद्रन यांच्यात मतभेद झाल्यामुळे अण्णा द्रमुक पक्षात एम्.जी.रामचंद्रन यांच्या निधनानंतर उभी फूट पडली.तसेच एन्.टी.रामाराव-लक्ष्मी पार्वती यांच्याशी मतभेद झाल्यामुळे चंद्रबाबू नायडूंचा गट वेगळा झाला.जयललितांशी झालेल्या मतभेदांमुळे अण्णा द्रमुकचे नेते थिरूनाव्वकरसू यांनी त्यांचा स्वत:चा पक्ष स्थापन केला.तसेच १९९६ च्या निवडणुकीत अण्णा द्रमुकशी युती करायला विरोध म्हणून जी.के.मूपनार आणि पी.चिदंबरम यांनी तमिळ मनिला काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या मतभेदांमधून ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.तसेच कर्नाटकात एस.बंगाराप्पा यांचा कर्नाटक काँग्रेस पक्ष, माधवराव शिंद्यांचा मध्य प्रदेश विकास काँग्रेस आणि चिमणभाई पटेलांचा जनता दल (गुजरात) हे ही प्रादेशिक पक्ष होते.राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षही शिवसेना या प्रादेशिक पक्षातून फुटून निघालेला आहे तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळच्या काँग्रेस पक्षातून फुटलेला आहे. सिक्कीम संग्राम परिषदेतून बाहेर पडून पवनकुमार चामलिंग यांनी सिक्कीम डेमॉक्रॅटिक फ्रंट या पादेशिक पक्षाची स्थापना केली. यापैकी लक्ष्मीपार्वती, जानकी रामचंद्रन यांचे पक्ष अस्तित्वात नाहीत तर बंगाराप्पा,माधवराव शिंदे आणि चिमणभाई पटेल यांचे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले आहेत.        

आणि या प्रादेशिक पक्षांच्या मांदियाळीत एखाद्या जातीचे हितरक्षण करण्यासाठी निर्माण झालेले पक्ष आणि वैयक्तिक लोकप्रियतेचा फायदा घेऊन निर्माण झालेले पक्ष ही शेवटची साखळी. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष हा प्रामुख्याने दलितांचे हितरक्षण करायला स्थापन झाला होता. (पुढे त्यानेच सोशल इंजिनियरींग केले ही गोष्ट वेगळी).तसेच तामिळनाडूत पट्टाली मक्कल काची हा पक्ष वन्नियार समाजाचे हितरक्षण करण्यासाठी स्थापन झाला होता. वैयक्तिक लोकप्रियतेचा फायदा घेऊन स्थापन केलेले चिरंजीवींचा प्रजाराज्यम आणि विजयकांत यांचा तामिळनाडूतील डीएमडीके हे पक्ष होत.

तेव्हा राजकारणात या वेगवेगळ्या प्रकारचे प्रादेशिक पक्ष दिसतात.निवडणुक आयोगाच्या नियमांप्रमाणे चार किंवा जास्त राज्यांमध्ये ४% पेक्षा जास्त मते जिंकणारा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता पावतो.त्या नियमानुसार बसप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष तांत्रिक दृष्ट्या राष्ट्रीय पक्ष आहेत पण त्यांचे प्रभावक्षेत्र आजच्या घडीला तरी अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही आहेत.  

प्रादेशिक पक्षांच्या स्थापनेचा आणि त्यामागच्या कारणांचा मागोवा घेतल्यानंतर आता वळू या प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवरील भूमिकेकडे.गेल्या काही निवडणुकींमध्ये तामिळनाडू हे राज्य मोठी महत्वाची भूमिका बजावत आहे.१९९१,१९९६,१९९८ आणि २००४ या निवडणुकींमध्ये राज्याची भूमिका महत्वाची होती. २००४ मध्ये भाजपने द्रमुकला सोडून अण्णा द्रमुकशी युती केली आणि ज्या ४० जागा सहजपणे भाजप-द्रमुक आघाडीला मिळाल्या असत्या त्या आपसूक काँग्रेसला गेल्या.त्यामुळे देशात एन्.डी.ए चा पराभव झाला आणि मनमोहन सिंह पंतप्रधान झाले.या राज्यातील प्रादेशिक पक्षांनी आपली पोळी व्यवस्थित भाजून घेतली. कधी भाजप बरोबर तर कधी काँग्रेस बरोबर युती करून या पक्षांनी स्वत:चे महत्व अबाधित राखले. १९९८ आणि २००४ मध्ये अण्णा द्रमुक भाजपबरोबर होता तर १९९९ मध्ये तो काँग्रेसबरोबर होता. १९९९ मध्ये द्रमुक भाजपबरोबर होता तर २००४ मध्ये तो काँग्रेसबरोबर होता.तसेच पी.एम्.के आणि मद्रमुक हे पक्ष १९९८ आणि २००९ मध्ये अण्णा द्रमुक बरोबर तर १९९९ मध्ये द्रमुकबरोबर होते.आता या दोन्ही पक्षांची स्वत:ची एक मतपेढी आहे.त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्यास निवडून यायला ती मते पुरेशी असतील असे नाही पण द्रमुक किंवा अण्णा द्रमुकबरोबर युती केल्यास त्या आघाडीला घसघशीत फायदा या दोन पक्षांमुळे होऊ शकतो.असा घसघशीत फायदा १९९८ मध्ये अण्णा द्रमुकला आणि २००४ (आणि काही अंशी १९९९) मध्ये द्रमुकला झाला आहे.त्यातून पुढे केंद्रात सरकार स्थापन कोण करणार हे ठरते.

तामिळनाडूत पीएमके आणि मद्रमुकला ५ ते ७% मते मिळत असली तरी देश पातळीवर एक टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळत नाहीत.पण या दोन पक्षांमुळे केंद्रात सरकार कोण स्थापन करणार हे ठरायला मदत होते हे वरील उदाहरणांवरून स्पष्ट होते. तेव्हा पूर्ण देशात लोकसभेच्या ६-७ जागा लढवून फारफार एक टक्का मते मिळविणारे पक्ष पंतप्रधान कोण बनणार हे ठरवतात ही लोकशाहीची थट्टाच म्हटली पाहिजे. तसेच राज्यातील स्वत:चे राजकिय हित लक्षात घेऊन हे पक्ष आयत्या वेळेला टोपी फिरवू शकतात.१९९६ च्या निवडणुकांनंतर स्थापन झालेल्या संयुक्त आघाडीचे आमंत्रक चंद्रबाबू नायडू होते.भाजपविरोध हा संयुक्त आघाडीचा प्रमुख मुद्दा होता.पण १९९८ च्या निवडणुकांनंतर केंद्रात काँग्रेसला रोखण्यासाठी नायडूंच्या तेलुगु देसमने सरळ भाजपबरोबर हातमिळवणी केली.गेली २०-२५ वर्षे भाजपबरोबर असलेली शिवसेना निवडणुकींनंतर पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सरळ तिसर्‍या आघाडीत सामील होऊ शकेल.

तेव्हा हे प्रादेशिक पक्ष स्वत:च्या स्वार्थासाठी पूर्ण देशाचे राजकारण प्रभावित करू शकतात.याला पायबंद कसा घालता येईल हा एक प्रश्नच आहे.

काही लोक म्हणतात की प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणुका लढवायला बंदीच असावी.पण भारतीय राज्यघटनेप्रमाणे भारताचा कोणीही नागरीक राज्यघटना मानणार्‍या कोणत्याही पक्षात/संघटनेत सामील होऊ शकतो आणि लोकसभा/विधानसभा निवडणुक लढवू शकतो.तेव्हा घटनात्मक दृष्ट्या हा उपाय वैध राहणार नाही.तसेच जर कोणाही भारतीय नागरीकाला अपक्ष म्हणून निवडणुक लढवायला बंदी नसेल तर प्रादेशिक पक्षाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणुक लढवायला बंदी का?लोकसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्ष अस्थिरता निर्माण करू शकतात तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील स्थानिक पक्षही अस्थिरता निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात विनय कोरेंचा जनसुराज्य हा पक्ष. त्या पक्षाचे कोल्हापूर जिल्ह्यातून २-३ आमदार निवडून आले आहेत.पण कोल्हापूर जिल्ह्याबाहेर या पक्षाचे अजिबात सामर्थ्य नाही.लोकसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांना बंदी करायची असेल तर त्याच न्यायाने विधानसभा निवडणुकींमध्ये अशा स्थानिक पक्षांना बंदी करणार का?सध्या बसप हा पक्ष उत्तर प्रदेशात तरी बलिष्ठ आहेच. कदाचित काही वर्षांनी पूर्ण देशात तो बलिष्ठ असेल.पण त्या पक्षाची सुरवात १९८९ मध्ये लोकसभेची एकच जागा (मायावतींची बिजनौर) जिंकून झाली होती हे ध्यानात घेतले तर मोठ्या पक्षांची सुरवात छोटीच असते हे लक्षात येईल.मग अशा पक्षांना मुळात लोकसभा निवडणूक लढवायला बंदी घातली तर त्यांना पुढे वाढायला वावच मिळणार नाही.

दुसरे म्हणजे विधानसभेत किती मते मिळाली त्या प्रमाणात प्रादेशिक पक्षांना लोकसभेच्या जागा द्याव्यात हा उपाय सुचवला आहे.पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुद्दे वेगळे असतात आणि मतदार आता त्यानुसार मते देण्याइतका चोखंदळ नक्कीच आहे.उदाहरणार्थ १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेने शिवसेना-भाजप युतीस जास्त मते दिली आणि ४८ पैकी २८ जागा युतीने जिंकल्या.पण त्याचवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र तितक्या प्रमाणावर जागा युतीस मिळाल्या नाहीत.तेव्हा हा उपाय लागू पडेल असे वाटत नाही.

मला वाटते की पुढील काही वर्षे तरी या प्रादेशिक पक्षांमुळे होणारा त्रास सहन करावा लागेल.त्यावर उपाय म्हणजे राष्ट्रीय पक्ष बळकट करणे.लोकसभा जागांच्या तुलनेत सध्या दोन प्रमुख पक्ष-- काँग्रेस आणि भाजपमध्ये खूप अंतर नाही.भाजपचा विचार केला तर त्याचा पूर्वाश्रमीचा जनसंघ लोकसभेत जास्तीत जास्त ३५ जागा जिंकण्यात यशस्वी झाला होता.१९८४ मध्ये दोन जागा मिळून भाजपची वाताहत झाली होती.पुढे रामजन्मभूमीसारखा मुद्दा पक्षाला मिळाला म्हणून पक्षाने १८२ पर्यंत झेप घेतली.पुढच्या काळात असा मुद्दा त्यांच्या हातून निसटला. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर, काश्मीरी पंडितांचे काश्मीरात पुनर्वसन,बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी यासारख्या मुद्द्यांवर विरोधी पक्षात असताना उच्चरवाने बोलणारा भाजप सत्तेत आल्यावर काहीही करू शकला नाही.याचा परिणाम म्हणून भाजपची शक्ती आता बरीच कमी झाली आहे. तरीही नरेंद्र मोदी,येडियुरप्पा,शिवराज सिंह चौहान आणि रमण सिंह यासारख्या लोकप्रिय नेत्यांमुळे पक्षाची पुरती घसरगुंडी झालेली नाही.पण यापुढील काळात प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसला तर गुजरात,कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तिसगड या राज्यांमध्ये भाजपचा पराभव होऊन फायदा काँग्रेसला होईल.काँग्रेस-भाजप सरळ सामना असलेल्या राज्यांमध्ये सध्या बहुतांश ठिकाणी (राजस्थान आणि दिल्ली वगळता) भाजपची सरकारे आहेत.त्यांना फटका बसला तर काँग्रेसला सरळ फायदा होईल.जर काँग्रेस पक्ष १९९१ इतपत जागा जिंकू शकला तर प्रादेशिक पक्षांमुळे निर्माण होणारी अस्थिरता तात्पुरती का होईना कमी होईल.याउलट भाजपने चमत्कार करून उत्तर प्रदेशात परत पाय रोवले तरी प्रादेशिक पक्षांचे महत्व कमी होईल.

Saturday, March 21, 2009

निसर्गाचे संकेत

माझा मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर प्रसिध्द झालेला निसर्गाचे संकेत हा लेख

नमस्कार मंडळी,

कधीकधी आपल्याला भविष्यात काय घडणार याची कल्पना निसर्ग स्वप्ने, भास किंवा जाणीवेच्या पातळीवरील अनुभवांमधून देतो. कधी त्याक्षणी निसर्गाच्या संकेतांचा अर्थ कळतो तर कधी कळत नाही. अनेकदा अशा एखाद्या अनुभवाचा किंवा स्वप्नाचा संबंध काय आणि तो अनुभव/स्वप्न का पडले हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्याविषयी फारसा विचार करत नाही. पण निसर्ग आपल्याला ज्या घटनेविषयी सुचित करायचा प्रयत्न करत आहे ती घटना घडून गेल्यानंतर मात्र आपल्याला अशा घटनांचा उलगडा होतो. मला नक्की काय म्हणायचे आहे हे मला स्वत:ला आलेल्या तीन अनुभवांमधून स्पष्ट होईल.

१) दिनांक २९ मे १९९७. माझे वडिल ठाण्यातील सिंघानिया रूग्णालयात अतिदक्षता विभागात होते.त्यावेळी आम्ही ठाण्यात राहायला होतो. २९ तारखेला सकाळी मी रुग्णालयात पोहोचलो.रूग्ण अतिदक्षता विभागात असेल तर नातेवाईकांनी आपल्या समाधानासाठी बाहेर थांबायचे कारण आत जायच्या ठराविक वेळा सोडून विभागात पाऊलही ठेवता येत नाही.आणि माझे वडिल त्यावेळी बेशुध्दावस्थेत असल्यामुळे आत गेल्यावरही कोणतेही संभाषण व्हायचा प्रश्नच नव्हता. तरीही मी तिथे जात होतो.त्या दिवशी दुपारी माझी बहिण आणि मावशी तिथे येणार होत्या.आणि आम्ही तिघांनी रूग्णालयाच्या कँटिनमध्ये जेऊन मग मी घरी परत जाणार होतो.मी आदल्या दिवशी कँटिनमध्ये जाऊन चहा घेतला होता त्यामुळे मला कँटिन कुठे आहे याची पूर्ण कल्पना होती.तर माझ्या बहिणीला आणि मावशीला कँटिनची जागा माहित नव्हती आणि मी त्यांना तिथे घेऊन जाणार होतो.

कँटिनकडे जाण्यासाठी एका लांब पॅसेजच्या मध्ये खाली जाणारा एक जीना होता.त्या जीन्यावरून कँटिनला जायचे होते.पण त्या दिवशी काय झाले काय माहित.मी कुठे जात आहे याचे अजिबात भान मला नव्हते.मी त्या लांब पॅसेजमध्ये जीन्यावरून खाली न जाता चालतच राहिलो.आणि मी पूर्णपणे ’ब्लँक’ झालो होतो.त्याच पॅसेजच्या शेवटी शवागार होते आणि तिथे गेल्यावर माझी बहिण म्हणाली ’अरे इथे कुठे घेऊन आलास?आपल्याला कँटिनला जायचे आहे’.तेव्हा मी भानावर आलो आणि माझ्या रस्ता चुकल्याचे लक्षात आले.मग मी परत त्या पॅसेजमधून उलटे जाऊन कँटिनमध्ये गेलो.

हा सगळाच प्रकार माझ्यासाठी अनाकलनीय होता.पुढे दोन दिवसांनी ३१ मे १९९७ रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले.तेव्हा माझ्या लक्षात आले की दोन दिवसांपूर्वी झालेला प्रकार म्हणजे पुढे काय होणार आहे याचा निसर्गाने दिलेला संकेत होता.त्याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही पण नंतर कळला.

२) दुसरा प्रकार मी अमेरिकेत असताना घडला.मी अमेरिकेत पी.एच.डी करत होतो आणि माझ्या दुर्दैवाने मला पी.एच.डी साठी मार्गदर्शन करणारे गाईड अत्यंत त्रास देणारे निघाले.मार्गदर्शन करण्यापेक्षा कसलेच मार्गदर्शन न करणे असा त्यांचा स्वभाव निघाला.मी माझ्या परिने होईल तितके हातपाय मारले आणि बराच प्रयत्न केला.पण पूर्णपणे स्वत:च्या हिंमतीवर व्हायला पी.एच.डी म्हणजे पाचवीची परीक्षा नव्हे!दगडावर डोके आपटून रक्त येण्याखेरीज दुसरे काहीही होत नाही आणि उगीच ’टाईमपास’ चालला आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी पी.एच.डी सोडून भारतात परत यायचा निर्णय घेतला.

माझा दुसरा अनुभव आहे ऑक्टोबर २००७ मधला.मी भारताबाहेर बराच काळ राहिल्यामुळे भारत हाच माझ्यासाठी परदेश झाला होता.आणि भारतात परत गेल्यावर मला नोकरी मिळणार की नाही, त्यासाठी किती दिवस थांबावे लागेल अशा अनंत चिंतांनी घेरून टाकले होते. त्यावेळी अमेरिकेतील कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याप्रमाणे माझे वेळापत्रक विचित्र होते. झोपायच्या उठायच्या वेळा याला काहीही धरबंद नव्हता.
एकदा विद्यापीठात सर्व एम.एस आणि पी.एच.डी च्या विद्यार्थ्यांसाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते.अशा सेमिनारमध्ये मेहेरदाद नेगाहबान या भारदस्त नावाचे मूळचे इराणी असलेले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आयोजन करण्यात पुढे असत.सेमिनार दुपारी चारच्या सुमारास संपला आणि मी त्यानंतर घरी येऊन झोपलो. झोपेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात प्रा.नेगाहबान विद्यापीठात होते आणि सेमिनारला हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ते ’इकडे या’ असे बोलवत होते. इतर विद्यार्थ्यांबरोबर मी पण तिकडे गेलो तर ते मला म्हणाले ,’अरे तू इथे का येतोस?हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही.तू दुसर्‍या मार्गाने जा’ असे म्हणून दुसर्‍या एका दिशेला त्यांनी बोट दाखवले. मी त्या दिशेला जाऊ लागलो.बरोबर इतर कोणीच नव्हते. विमान प्रवासात मी नेहमी न्यायचो ती हँडबॅग माझ्याजवळ होती आणि पुढे जाऊन बघतो तर विमान उभे होते.
त्यानंतर मी ताबडतोब जागा झालो. माझ्यासाठी ’चांगला मार्ग’ भारतात आहे आणि तिकडे नेण्यासाठी विमान माझ्यापुढे उभे होते. तसेच भारतात परत गेल्यावर सर्वकाही चांगले होईल असा तो संकेत आहे हे माझ्या लक्षात आले. ही कदाचित अंधश्रध्दा असेलही पण त्या क्षणानंतर माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. पुढे भारतात परत आल्यानंतर माझे सगळे चांगलेच झाले.

३) मी मिपावर माझा २६/११ मुंबई हल्ल्यानंतरचे संपादकिय लिहिले.ते ई-मेलवर पाठवून दिले आणि थोड्या वेळातच मला माझ्या चुलत भावाचा फोन आला की माझ्या चुलत बहिणीचे यजमान ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावले.माझे वडिल आजारी असताना त्यांनी आम्हा सगळ्यांनाच खूप मदत केली होती.ही घटना घडायच्या ३-४ दिवस आधी मला १२ वर्षांपूर्वी झालेल्या घटना उगीचच आठवत होत्या. उदाहरणार्थ माझे वडिल रूग्णालयात असताना माझे त्यांचे काय बोलणे झाले ते मला आठवले.माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतून हॉलवर गेलो होतो.त्यावेळी काय बोलणे झाले ते पण मला आठवले.त्याच वर्षी त्यांच्या मुलाची शाळा बदलली होती. तेव्हा तो नव्या शाळेत नीट स्थिरावला का, त्याला नवे मित्र मिळाले का असे प्रश्न मी त्यांना विचारले होते. हे सगळे मला आठवले.
इतक्या वर्षांनंतर मुद्दामून आठवाव्यात इतक्या महत्वाच्या या गोष्टी निश्चितच नव्हत्या. तेव्हा हे सगळे मला का त्या वेळी का आठवावे हे मला कळेना.लवकरच त्यांच्याबद्दल काही बातमी येणार आहे हा तो संकेत होता का?

या सगळ्या गोष्टींचा बुध्दीवादाने खुलासा होईल असे वाटत नाही.ही अंधश्रध्दा आहे का हे मला माहित नाही पण निसर्ग कधीकधी भविष्यात काय होणार आहे याची कल्पना आपल्याला देत असतो का?अर्थात प्रत्येक महत्वाच्या घटनेची कल्पना आपल्याला मिळत नाही. ते का हे पण समजायला मार्ग नाही.

आपल्यापैकी कोणाला असे अनुभव आले आहेत का?

Friday, March 20, 2009

शिवछत्रपतींना जातीच्या चौकटीत डांबणार्‍या प्रवृत्तीचा जाहिर निषेध

मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर ’शिवाजी महाराजांचे ब्राम्हणीकरण’ या लेखाद्वारे छत्रपतींच्या डोंगराएवढ्या महान कर्तृत्वाला जातीच्या चौकटीत बंदिस्त करायचा अश्लाघ्य प्रयत्न झाला.संकेतस्थळाच्या चालकांनी तो प्रयत्न तो लेखच अप्रकाशित करून हाणून पाडला आणि चांगलेच केले.सर्व गोष्टींचा जातीपातीच्या कोत्या मनोवृत्तीतून विचार करायच्या प्रवृत्तीविरूध्द मी माझा पुढील लेख लिहिला (दिनांक २० मार्च २००९).पण ती चर्चाच उडवली गेल्यामुळे माझा लेखही त्यात गेला. माझा मिसळपाववरील मित्र आनंदयात्रीने ती चर्चा उडवली जाणार हे वेळीच लक्षात घेऊन माझा लेख जतन करून ठेवला होता.त्यामुळेच माझा लेख मला माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करता येत आहे याची जाण ठेवून मी आनंदयात्रीचे आभार मानत आहे.


जाहिर निषेध

दुर्दैवाने प्रत्येक गोष्टी जातीपातीच्या चौकटीतून बघायची आपल्या समाजाला इतकी सवय झाली आहे की सबंध भारतात हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे उदात्त ध्येय उराशी बाळगणार्‍या शिवाजी महाराजांना काही वर्षांनी आपला समाज ’मराठ्यांचे पुढारी’ ठरवून मोकळा होणार आहे असे दिसते.महाराजांचे उदात्त ध्येय पचनी न पडलेल्या आणि शतकानुशतके चाललेल्या गुलामगिरीचे विष अंगात भिनलेल्या अनेकांनी महाराजांच्या मार्गात अडथळे उभारायचा प्रयत्न केला आणि महाराजांचा अर्धा वेळ आणि अर्धी शक्ती तरी आपल्याच लोकांशी संघर्ष करण्यात गेली.

सध्या ब्राम्हणांवर आगपाखड करायची उबळ अनेक संघटनांना आली आहे आणि यातून हिंदू समाजात फाटाफूट वाढून पाकिस्तानचे काम आणखी सोपे होणार आहे. जातीपातींच्या घृणास्पद साठमारीत शिरायची मला खरं म्हणजे इच्छा नाही पण हा विषय निघालाच आहे म्हणून आणि समाजात फाटाफूट करायचा प्रयत्न करणार्‍या संघटना जो अपप्रचार करत आहेत त्यांना उत्तर द्यायला म्हणून काही गोष्टी सांगणे भागच आहे.

अफजलखान प्रकरणी महाराजांचे वकिल पंताजीकाका आणि अफजलखानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे दोघेही ब्राम्हणच होते. पंताजीकाकांनी अफजलखानाच्या छावणीत जाऊन तिथल्या बातम्या काढून आणल्या आणि गोड बोलून अफजलखानाला गाफिल ठेवले.त्याची महाराजांना मोठीच मदत झाली.महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तोंसारखे प्रशासक होतेच. महाराज आग्र्याहून निसटल्यानंतर त्यांनी संभाजीराजांना मथुरेला मोरोपंत पिंगळ्यांच्या मेहुण्याकडे ठेवले होते. कोकणातल्या बाळाजी आवाजींना महाराजांनी चिटणीसपद दिले आणि स्वराज्याचा राज्यकारभार चोखपणे चालविण्यात बाळाजींचा वाटा मोठा होता.रामदासांविरूध्द सध्या बरीच आगपाखड केली जाते पण त्याच रामदासांनी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ’उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करायला’ आणि ’बुडाला औरंग्या पापी’ या शब्दात आनंद व्यक्त केला होता.पुढे शंभूराजांना लिहिलेल्या पत्रात रामदास म्हणतात ’शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप’.महाराजांनंतर संभाजी राजांविरूध्द कारस्थाने करण्यात जसे अण्णाजी दत्तो होते तसेच हिरोजी फर्जंद आणि महाराणी सोयराबाई पण होत्या.संभाजीराजांनी गैरसमजुतीने बाळाजी आवाजींना हत्तीच्या पायी दिले पण त्यांच्याच मुलाने-- खंडोबल्लाळाने स्वामीनिष्ठेचा मोठा आदर्श घालून दिला. ताराबाईच्या काळात रामचंद्रपंत अमात्यांची भूमिका मोठीच महत्वाची होती. महाराजांना विरोध मोरे, सुर्वे, खंडोजी खोपडे हे ब्राम्हणेतर देखील होते. तेव्हा महाराजांचे ध्येय समजून त्यांच्याबाजूने लढणारे आणि ते ध्येय न समजता त्यांना विरोध करणारे सगळेच लोक होते हे लक्षात न घेता एकाच जातीविरूध्द आगपाखड करायचा जो प्रकार सध्या चालू आहे तो घृणास्पद आहे.

महाराजांना एखाद्या जातीच्या चौकटीत बंदिस्त करायचा प्रकार म्हणजे औरंगजेबाने महाराजांना आग्र्यात कैदेत डांबले त्यापेक्षाही भयंकर आणि लांच्छनास्पद प्रकार आहे आणि त्याचा जाहिर निषेध.


अवांतर--जातीपातींच्या विचारांमधून आपण कधी वर उठणार आहोत की नाही हेच समजत नाही.पृथ्वीराज चौहान या आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या राजाने आपल्या मुलीबरोबर प्रेम केले म्हणून जयचंद राठोडने महंमद घौरीला मदत केली आणि दिल्लीवर सुलतानी अंमलाचा काळाकुट्ट अध्याय सुरू झाला. महाराष्ट्रावर अल्लादिन खिलजीचे आक्रमण व्हायच्या आधी ८-१० वर्षे महाराष्ट्रात संनाश्यांच्या मुलांची मुंज करावी की नाही ही व्यर्थ चर्चा चालू होती.त्याचवेळी युरोपात केंब्रिजसारख्या विद्यापीठांची स्थापना होत होती. कोल्हापुरला शाहू महाराजांना वेदातील मंत्राचा अधिकार आहे की नाही यावर १८९९ ते १९०५-०६ या काळात मोठा खल चालू होता.आणि दरम्यानच्या काळात पाश्चिमात्य देशांमध्ये आईनस्टाईन सापेक्षतावादाचा सिध्दांत मांडत होता आणि राईट बंधू विमानाचे उड्डाण करीत होते. एकीकडे पाश्चिमात्य जगत विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेत असताना आणि आपला शत्रू येऊन लुटालूट करत असताना आपण मात्र जातीपातींच्या विचारातून वर उठायला तयार नव्हतो आणि नाही. याची फार मोठी किंमत आपण चुकती केली आहे आणि अजूनही करत आहोत. हे नष्टचर्य कधी संपणार आहे हेच कळत नाही.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

Wednesday, March 18, 2009

सबप्राईम क्रायसिस

माझा मिसळपाव या मराठी संकेतस्थळावरील ’बामनाचे पोर’ यांच्या  subprime crisis.. (कोसळलेला) पत्त्याचा बंगला या लेखावरील माझी प्रतिक्रिया. (दिनांक १८ मार्च २००९)

चांगल्या लेखाबद्दल बामनाच्या पोराला धन्यवाद. मला माहित असलेल्या आणखी काही गोष्टी इथे लिहित आहे.

२०००-२००१ च्या मंदीनंतर अमेरिकेतील फेडरल रिझर्व चे चेअरमन ऍलन ग्रीनस्पॅन (भारतातील रिझर्व बँकेच्या गव्हर्नर ला समकक्ष) यांनी व्याजदरात मोठ्या प्रमाणावर कपात केली.याचे कारण म्हणजे व्याज दर कमी केले की बाजारात नव्या उद्योगधंद्यांसाठी किंवा नव्या योजनांसाठी लागणारा पैसा जास्त ’स्वस्तात’ उपलब्ध होतो. यातूनच नव्या नोकर्‍या निर्माण होतात आणि त्यातूनच बाजारातील मागणी वाढते.यातूनच पुढे मंदीच्या विळख्यातून सुटायला मदत होते. तेव्हा व्याजाचे दर खूपच कमी पातळीवर आल्यामुळे मंदीतून सुटका झाली.या सगळ्याच्या या लेखात चांगला आढावा घेतलाच आहे.

बँकांकडे असलेला पैसा बाजारात आणण्यासाठी बँकांनी अनेक क्लुप्त्या लढविल्या. त्यातील ’सबप्राईम बॉरोअर’ना कर्ज देणे हा एक उपाय होता. अमेरिकेत प्रत्येक माणसाचा क्रेडिट कार्ड तसेच गाडीसाठी किंवा घरासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचा इतिहास बघून एक ’क्रेडिट स्कोर’ दिला जातो. त्यासाठी तीन ’क्रेडिट रेटिंग’ संस्था आहेत. हा स्कोर ७२० पेक्षा जास्त असलेले लोक ’प्राईम बॉरोअर’ आणि त्यापेक्षा कमी स्कोर असलेले लोक हे ’सबप्राईम बॉरोअर’ असतात. हा क्रेडिट स्कोर जास्त असेल (उदाहरणार्थ ८००) तर प्रत्येक गोष्टीसाठी दिलेल्या कर्जावर कमी व्याज आकारले जाते. २००० सालापर्यंत सबप्राईम बॉरोअरना घरासाठी कर्ज मिळणे खूपच कठिण होते. या लेखात म्हटल्याप्रमाणे २००१-०२ सालानंतर बँकांनी लोकांना घरासाठी कर्जाऊ पैसे देण्यासाठी कागदपत्रे, क्रेडिट स्कोर वगैरे ’फडतूस’ गोष्टींना फारसे महत्व दिले नाही. २००५ मध्ये तर ’निंजा लोन’ (Ninja-- No Income, No Job, No Asset) फारसा विचार न करता दिले जात होते. जेव्हा कर्जाचे हप्ते चुकवले जातात तेव्हा व्याजाबरोबरच मूळ मुद्दलातील थोडा भाग चुकता केला जातो. पण पहिल्या दोन वर्षांसाठी नुसते व्याजच भरा, मुद्दलाचे नंतर बघू अशा स्वरूपाच्या सवलती दिल्या गेल्या. सबप्राईम लेंडरना कर्ज द्यायचे लाँजिक असे की जर एखाद्याने कर्जाची परतफेड केली नाही तरी त्याच्या घरावर टाच आणून लिलावात ते घर विकून ब्ँकेला पैसे वसूल करून घेता येऊ शकेल.

पुढे लेहमन ब्रदर्स सारख्या इन्वेस्टमेंट बँकांनी Collateralized Debt Obligations (CDO) हा एक डेरिव्हेटिव्हचा नवा प्रकार आणला.स्थानिक बँका लोकांना घर विकत घेण्यासाठी कर्ज देत. उदाहरणार्थ १ लाख डाँलर चे कर्ज समजा महिन्याला ६०० डाँलर भरून पूर्ण कर्ज २० किंवा ३० वर्षांत लोकांनी परतफेड करायची असा करार असतो. (इथे हे आकडे उदाहरणार्थ घेतलेले आहेत.) CDO मध्ये लेहमननी स्थानिक बँकांनी लोकांना दिलेली कर्जे विकत घेतली. म्हणजे २००५ मध्ये कर्जाऊ दिलेले १ लाख डाँलरचे कर्ज २०२५ किंवा २०३५ मध्ये परत मिळण्याऐवजी बँकांना ताबडतोब मिळत असे. यामुळे बँका खूष असत. दर महिन्याला कर्ज घेतलेल्यांनी दिलेल्या दरमहा ६०० डाँलर हप्त्यातून काही भाग बँका स्वत: कमिशन म्हणून ठेऊन उरलेला भाग लेहमनला देत. म्हणजेच बँकांना कमिशन मिळत होते आणि कर्जाची ताबडतोब परतेफेड होत असल्यामुळे बँका खूष असत.

लेहमन ब्रदर्स स्थानिक बँकांकडून विकत घेतलेल्या कर्जाचे पुढे अनेक ’पुड्यांमध्ये’ विभाजन करून त्या ’पुड्या’ शेअर बाजारात विकायला लावत असे. म्हणजे १ लाख डाँलरच्या समजा शंभर डाँलरच्या १००० पुड्या करून शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी उपलब्ध केल्या. या पुड्या म्हणजेच Collateralized Debt Obligations (CDO). याचे स्वरूप सामान्य गुंतवणूकदार म्युचुअल फंडात काही भाग खरेदी करून गुंतवणूक करतात तसेच होते. स्थानिक बँकांनी स्वत:चे कमिशन ठेऊन दिलेल्या पैशातून लेहमन ब्रदर्स गुंतवणूकदारांना लाभांश देत असे. अर्थातच लेहमन ब्रदर्स स्वत:चा मलिदा खात होतेच. पण लाभांशापेक्षाही गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे होते त्यांच्या पुड्यांची वाढलेली मार्केट व्हँल्यू. समजा एक लाख डाँलर किंमत असलेले कर्ज आज शंभर डाँलरच्या १००० पुड्यात विभाजित केले आहे. घरांच्या किंमती वाढतच जाणार आहेत तेव्हा आज एक लाख किंमतीचे घर ५ वर्षांनी दीड लाखाचे होणारच आहे हा मुळातील (अनाठायी) विश्वास होता.तेव्हा या विश्वासाचाच पुढचा भाग म्हणजे आज शंभर डाँलर किंमतीची पुडी ५ वर्षांनी १०० डाँलरपेक्षा जास्त होणार आणि ती पुडी विकून सामान्य गुंतवणूकदारांना नफा होणार. मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे लोकांनी अशा कृत्रिमपणे वाढलेल्या किंमतीना घर रिफायनान्स केल्यामुळे आणि या रिफायनान्स केलेले कर्जाचेही अशा पुड्यांमध्ये विभाजन केल्यामुळे घराच्या बाजारातील किंमतीचा संबंध सामान्य लोकांनी घेतलेल्या या पुड्यांच्या वाढलेल्या मार्केट व्हँल्यूशी लागू शकत होता.

या सगळ्यात लेहमनला फायदा काय?यातही पुन्हा घराच्या किंमती वाढतच जाणार हे गृहितक.समजा कोणी कर्जाची परतेफेड केली नाही तर स्थानिक बँका त्या घरावर टाच आणणार आणि त्या घराची किंमत १ लाखापेक्षा नक्कीच जास्त (समजा दीड लाख) असणार.आणि हे कर्ज लेहमनने विकत घेतले असल्यामुळे दीड लाख डाँलर लेहमनला मिळणार आणि हा लेहमनला फायदा होता.

आता स्थानिक बँकांना कमिशन मिळत असल्यामुळे आणि लेहमनकडून ताबडतोब पैसे मिळत असल्यामुळे स्थानिक बँकांना कोण कर्ज घेतो याचे फारसे सोयरसुतक नव्हते.तेव्हा आला ग्राहक की द्या कर्ज अशापध्दतीने मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप केले. इथे स्थानिक बँकांचा लोभ दिसून येतो.

पण जे लोक कर्जाची परतफेड करू शकणारच नव्हते त्यांना कर्ज दिले गेले होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. लोकांनी कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर बँकांनी ते घर लिलावात आणले.सुरवातीला त्या घरांची किंमत मूळ किंमतीपेक्षा जास्त होती. पण अशी घरे शेकड्यांच्या आणि हजारोंच्या संख्येने लिलावात आल्यामुळे डिमांड आणि सप्लाय नात्यामुळे त्या घरांच्या किंमती आपोआपच कमी झाल्या. त्यातून ’अंडरवाँटर’ कर्जाचा प्रश्न मोठा होता.म्हणजे समजा मूळ कर्ज १ लाखाचे आहे. ते रिफायनान्स करून आता कर्ज २ लाखाचे आहे. पण घरांच्या किंमती कमी झाल्यामुळे घराची बाजारातील किंमत ८० हजारच असेल तर याचा अर्थ ८० हजाराच्या घरावर लोकांचे २ लाखांचे कर्ज होते.अशा अनेकांनी स्वत:च घर बँकेच्या स्वाधीन केले आणि स्वत: अपार्टमेंटमध्ये गेले. यामुळे घराच्या किंमती अजून खाली आल्या.

साखळी क्रियेतला पुढचा टप्पा म्हणजे लेहमननी विकलेल्या पुड्या विकत घेतलेले लोक. त्यांच्या पुड्यांची शेअर बाजारातील किंमत बरीच कमी झाल्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांनी लेहमनकडे आपल्या पुड्या परत करायचा सपाटा लावला.तेवढी ’लिक्विडिटी’ लेहमनकडे नव्हती तेव्हा लेहमनला दिवाळखोरी जाहिर करावी लागली.

लेहमननी ए.आय.जी या विमा कंपनीकडून या पुड्यांचा विमा उतरवला होता. काही कारणाने जर सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान होत असेल तर ए.आय्.जी कंपनीने ते भरून द्यावे यासाठी उतरवलेला हा विमा होता.या प्रकाराला Credit Default Swap म्हणतात. पण सामान्य गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्यामुळे ए.आय.जी कडे मोठ्या प्रमाणावर दावे गेले. तेवढे दावे निकाली काढण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनाही दिवाळखोरी जाहिर करावी लागली.

लेहमन भारतीय शेअर बाजारात 'Foreign Institutional Investors' मार्फत गुंतवणूक करत असे. लेहमनने दिवाळखोरी जाहिर करायच्या आधी सामान्य गुंतवणूकदारांची देणी देण्यासाठी मिळतील तिथून पैसे उभे करायच्या उद्देशाने भारतीय शेअर बाजारातून पैसे काढले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारावरही परिणाम झाला आणि तो कोसळला.

अशाप्रकारे अमेरिकेतील घरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर मंदी आली.नवी घरे बांधायचे प्रमाण जवळपास थंडावले. त्यामुळे घरबांधणी क्षेत्राशी संबंधित उद्योगात (सिमेंट, स्टील वगैरे) मंदी आली.घर ही अत्यंत मूलभूत गरज असल्यामुळे घर संकटात आल्यामुळे लोकांनी खर्च करण्यात हात आखडता घेतला. आपण नक्की राहणार कुठे, आपले घर राहणार की जाणार असे प्रश्न उभे राहिल्यामुळे माँलमध्ये खरेदी, नव्या गाड्यांची खरेदी, पर्यटन यासारख्या क्षेत्रांसाठी लोक पैसा कमी खर्च करू लागले. लोकांची क्रयशक्तीच कमी झाल्यामुळे मंदी सर्वच क्षेत्रात पसरली.

अमेरिकन वाहन उद्योगाला (फोर्ड,जीएम, क्राईसलर) जपानी आणि कोरियन कंपन्यांकडून खूपच स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि त्यामुळे या उद्योगात नफ्याचे प्रमाण मुळातच कमी आहे.त्यात मंदी आल्यामुळे नव्या गाड्या विकल्या जायचे प्रमाण कमी झाले आणि फोर्ड आणि जीएम संकटात आल्या आणि त्यांना सरकारकडे पैशाची याचना करावी लागली.

भारतीय आय.टी कंपन्यांचे अमेरिकेतील बँका आणि इतर मोठ्या कंपन्या ’क्लाएंट’ असतात. अमेरिकेतील मंदीमुळे भारतीय आय.टी. कंपन्यांना मिळणारे प्रोजेक्ट कमी झाले आणि त्याचा परिणाम भारतातील आय.टी कंपन्यांवर पडला.

यातून बाहेर येण्यासाठी ओबामांनी ’स्टिम्युलस पँकेज’ जाहिर केले. यात किनेशियन अर्थशास्त्रीय सिध्दांताप्रमाणे सरकारने पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायचे ठरवले आहे. त्यातून नव्या नोकर्‍या निर्माण होतील आणि अर्थव्यवस्था परत रूळावर येईल अशी अपेक्षा आहे.

सबप्राईम क्रायसिसविषयी मला जी माहिती आहे ती इथे लिहिली आहे.जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

---विल्यम जेफरसन क्लिंटन