Wednesday, December 26, 2007

हिटलरविषयी

माझा मराठी संकेतस्थळ मिसळपाववरील सागर यांच्या नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर या चर्चेवरील माझा प्रतिसाद. (दिनांक: २५ डिसेंबर २००७)

>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि.

१००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही.

हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले.

हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल.

माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे--

१) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली.
२) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा
३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग
४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का?

इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो?

आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का?

भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार?

हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का?

कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

5 comments:

Saurabh said...

नमस्कार,
मी सौरभ वैशंपायन.

हिटलरचे पोलंडपासुनचे आक्रमण हे नैतिक दृष्ट्या चुकच होते हे मला १००% मान्य आहे. मात्र हिटलरला सैतान म्हणणार्‍या ब्रिटिश - अमेरीकन - रशियन आणि त्यांच्या हो मध्ये हो मिसळणार्‍यांचा मला मनस्वी राग आहे. मुळात हिटलरकडॆ हि माकडे बोटं दाखवतात तेव्हा उरलेली चार बोटे यांच्याकडेच राहतात हे विसरुन चालणार नाहि. या जगातले ९०% प्रॉब्लेम हे ब्रिटन आणि अमेरीका या दोन देशांनी निर्माण केले आहेत. दुसर्‍या महायुध्दा आधी ब्रिटिशांनी आणि नंतर अमेरीकनांनी.
दुसर्‍या महायुध्दा आधी जगभर स्वत:च्या तिर्थरुपांची जहागिरी असल्यागत पसरवलेल्या वसाहती आणि भारतात १८५७ चे अत्यंत्य क्रुरपणे दडापलेले स्वातंत्र्यसमर, जालियनवाला बागेतील नृशंस नरसंहार, भगतसिंग व सहकार्‍यांच्या प्रेतांची केलेली विटंबना या खेरीज इस्राइल चा प्रश्न निर्माण करणाअरे ब्रिटिशच होते. काड्या घालायचे काम या हलकट वृत्तींच्या माणासांनी मनापासुन केले.

अमेरीकेबाबत काय बोलणार? मुळात ते स्पॅनिश रक्त. त्यातुन करोडो रेड इंडियन लोकांच्या प्रेतावर आजचे अमेरीका उभे आहे हे विसरु नका. जपानवर अणुबॉंम्ब टाकणारे हेच, व्हिएतनाम कम्युनिस्ट कळापात जाऊ नये म्हणून तेथे २४ वर्ष अहोरात्र धिंगाणा घालणारे हेच, लाखो व्हिएतनामी स्त्रीयांची अब्रु लुटणारे आणि अमेरीकन बाप व व्हिएतनामी आई अशी न घर का... पिढी निर्माण करणारे हेच.
इराक दहन करणारे हेच. हे का हिटलरवर बोटे ठेवणार? मानवी प्रयोगांबाबत बोलाल तर भोपाळाची गॅस लिकेज हि घटना हा अपघात नसुन तो प्रयोग होता असे मानले जाते आणि अमेरीकनांच्या नियतीबाबत मी तर नक्किच यावर विश्वास ठेवेन.

रशिया बाबत तर काय बोलावे? स्वकियांचेच रक्त पिणारी जमात आहे. सायबेरियाची भूमी लाखो रशियन व अगदि ज्युंच्यासह रक्ताने भिजली आहे यात काहिहि खोटे नाहिये.


राहता राहिला भारतीयांच्या दृष्टिने विचार तर दहा पिढ्यांनी अहिंसक चळावळ करुन देखिल जे स्वातंत्र्य मिळाले नसते ते हिटलरच्या युरोपातील तांडवाने आपसुक मिळाले. पाहुण्याच्या काठिने का होईना साप मेला हे महत्वाचे.

तर एकुण जगात हिटलर तेव्हढा वाईट्ट आणि बाकि संताचे अवतार हे चित्र रंगवले जाते ते नाझी भस्मासुराचा उदयास्त पेक्षाहि दसपट एकांगी आहे.

Girish said...

अमेरिकेतील स्थानिक रहिवाशांच्या कत्तली करण्यात आल्या आणि त्यातूनच युरोपमधल्या स्थलांतरीतांनी अमेरिका या देशाची स्थापना केली.तसेच व्हिएटनामवर युद्ध लादून कत्तली केल्या याचे समर्थन करता येऊ शकणार नाही.तसेच माओ,स्टॅलिन यांनीही लाखांच्या कत्तली केल्या.त्याचेही समर्थन होऊ शकत नाही.कत्तली काय सगळ्यांनीच केल्या मग त्या हिटलरने केल्या तर त्यात काय बिघडले असे म्हणून हिटलचे समर्थन करणारे अनेक लोक असतात त्यांना माझा विरोध आहे.हिटलरने दुसरे महायुध्द सुरू करून इंग्लंडचे पेकाट मोडले आणि म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ही गोष्ट खरीच आहे.पण भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिटलरने युद्ध सुरू केलेले नव्हते आणि भारताला त्याचा फायदा अनपेक्षितपणे मिळाला.तसेच हिटलरचा हल्ला भारतावर झाला असता तर पोलंडपेक्षा भारताची अवस्था वेगळी झाली असती असे मला वाटत नाही.याचा अर्थ अमेरिका-इंग्लंड करते ते सगळे काही बरोबर असा होत नाही.

पूर्णपणे आलिप्त दृष्टीकोन ठेऊन विचार केला तर अमेरिकेचे इराकवरील आक्रमण आणि इस्राएलचे पॅलेस्टाईनमधील प्रकार (किंबहुना मुळातच त्या देशाची झालेली स्थापना) या गोष्टी चुकीच्या आहेत.निरपराधांच्या कत्तलीचे समर्थन होऊ शकत नाही.पण त्यात भारताचे हितसंबंध लक्षात घेता माझा त्याला पाठिंबा आहे.भारताला शेजारून आलेल्या धर्मांध दहशतवादाचा मोठा धोका आहे यात शंका नाही.आणि त्या दहशतवादाचा भस्मासूर (तालिबान) उभा करण्यात अमेरिकेचा सहभाग आहे हे ही तितकेच मान्य.मात्र बदलत्या परिस्थितीमध्ये तो भस्मासूर अमेरिका-इंग्लंड-स्पेन यासारख्या देशांविरूध्दही उलटला आहे.आणि तो त्यांच्याविरूध्द उलटविण्यात इराक युद्धाचा आणि पॅलेस्टाईन प्रश्नाचा वाटा मोठा आहे.अन्यथा तालिबान्यांची (आणि तत्सम अतिरेकी संघटनांची) सर्व शक्ती भारताविरूध्द केंद्रित झाली असती ती काही प्रमाणात पाश्चिमात्य देशांविरूध्द वळली आहे.तसेच त्या कारणाने काही तालिबान्यांचा परस्पर काटा अमेरिकेने काढला तर ते आपल्याला चांगलेच होईल.आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सगळे देश आपले हित बघत असतात/ बघायला हवे. आणि तालिबान्यांचा कोणत्याही कारणाने होणारा खातमा आपल्या सध्याच्या हितसंबंधांसाठी चांगला आहे.

हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्याला मात्र मी पूर्ण समर्थन देतो.याविषयीचे माझे मत मी याच ब्लॉगवर इथे लिहिले आहे.बहुदा हिरोशिमा हल्ल्याचे समर्थन करणारे ०.१% लोक जगात असतील त्यातला मी एक आहे.याविषयी आपली मते ऐकायला आवडेल.

Saurabh said...

हिटलरने केलेल्या कत्तली या नक्किच चुक होत्या मात्र त्यावर कोणी बोट ठेवावे हा प्रश्न आहे. माझे म्हणणे इतकेच आहे कि अमेरीकेने - ब्रिटनने - रशियाने हिटलरवर बोट ठेवु नये.

९/११ झाल्यावर अमेरीकेला जाग आली तोवर आमचे जळत होते त्यावर अमेरीका उलटे उपदेशाचे डोस पाजत राहिले होती. मुळात इराक दहन करण्यापेक्षा पाकिस्तानला वेसण घातली असती तर जगातला किमान १/४ दहशत्वाद कमी झाला असता. इराकवरील युध्द मी बुशचे वैयक्तीक युध्द समजतो. बापाला जमले नाहि म्हणून मी करतो हा सरळ उद्देश होता. ९/११ शी इराकचा काहिहि संबध नव्हता. इराककडे ना अणुबँम्ब होते ना कुठलीहि रासायनिक हत्यारे. इतकिच हौस होती तर इराण आणि नॉर्थ कोरीयाला घ्या शिंगावर.
राहता राहिला तालिबानी शक्तींचा भारतावर उलटाण्याचा प्रश्न तर इथे २ मुद्दे -
मुळात भारत त्यांच्या लिस्ट्वर होताच फक्त क्रमांक खाली घसरला इतकेच. म्हणाजे आजचे मरण उद्यावर किंवा आपण सुपात आहोत अमेरीका जात्यात. आणि पॅलेस्टाईन चा प्रश्न हा इस्राइलच्या जन्मापासुनच निर्माण झालाय भारताला इस्राइल-पॅलेस्टाईन या संघर्षामुळे वेळ मिळाला असे नाहि म्हणता येणार. किंवा इराक दहन हे ९/११ नंतर केले गेले त्या दृष्टिनेहि भारताला तालिबानींपासुन संरक्षण मिळाले असे नाहि म्हणू शकत.
उलट तालिबानींना अफगाण मधुन हुसकल्यावरच भारताची डोकेदुखि वाढली आहे. स्वात प्रांत हे त्याचे ताजे उदाहरण आहे. स्वात फक्त म्हणायला पाकिस्तानात आहे पण त्याचा त्रास भारताला होणार हे नक्कि. शिवाय इराक आणि अफगाणिस्तान हे अमेरीकेने कितीहि डोकेफोड केली तरी कट्टरपंथियांच्या हातुन नाहि काढु शकणार कारण तुम्हि जितके युध्द लादाल तितके ते अजुन कट्ट्र होणार. अमेरीका जुलुम करते ह्या गोष्टिला अमेरीका स्वत:च पुरावे देत आहे. आणि अमेरीका जर व्यवस्थापनाच्या दृष्टिने आम्हि इथे उतरलो आहोत अशी लोणकढी थाप पुढेहि मारणार असेल तर इराक हे अमेरीकेसाठी दुसरे व्हिएतनाम ठरेल हे नक्कि. महिन्याला किमान ३०-३५ स्फोट बगदाद आणि परीसरात घडतात तिथे इतर इराक तर कट्टरपंथियांचे नंदनवनच आहे.

Girish said...

>>९/११ झाल्यावर अमेरीकेला जाग आली तोवर आमचे जळत होते त्यावर अमेरीका उलटे उपदेशाचे डोस पाजत राहिले होती.

नक्कीच. पण अमेरिकेला ९/११ च्या घटनेनंतर का होईना जाग आली आणि त्यातून आपल्यावर भविष्यकाळात उलटू शकणारे काही तालिबानी तरी परस्पर मारले गेले तर त्याचा फायदा भारताला आहेच ना.

>>मुळात इराक दहन करण्यापेक्षा पाकिस्तानला वेसण घातली असती तर जगातला किमान १/४ दहशत्वाद कमी झाला असता.

मान्य.पण भारतीयांनी ती अपेक्षा का ठेवावी?आपण आपले प्रश्न सोडविणार नाही आणि आपले प्रश्न अमेरिकेने सोडवावे ही अपेक्षा का? ९/११ च्या आधी पाकिस्तानकडून अमेरिकेला तसा कोणताही धोका नव्हता किंबहुना असलेला धोका अमेरिकेला समजलेला नव्हता. मग अशावेळी अमेरिकेने स्वत:चे हित बघावे की भारताचे?भविष्यकाळात पाकिस्तानकडून अमेरिकेला अधिकाधिक त्रास व्हायला लागला तर अमेरिका पाकिस्तानला वेसण घालेलही. पण ती स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी.भारताचा फायदा व्हावा म्हणून नाही आणि तशी अपेक्षा करणेही चुकीचे आहे.

>.मुळात भारत त्यांच्या लिस्ट्वर होताच फक्त क्रमांक खाली घसरला इतकेच. म्हणाजे आजचे मरण उद्यावर किंवा आपण सुपात आहोत अमेरीका जात्यात.

अहो हेच सर्वात महत्वाचे.कारण अमेरिकेचा नाश करणे तालिबान्यांना सोपे जाणार नाही आणि तालिबानी परस्पर अमेरिकेशी भांडण्यात मश्गूल राहिले तर भारताच्या कटकटी काही प्रमाणात तरी कमी होतील.अंतरामुळे अमेरिका काही प्रमाणात जास्त सुरक्षित आहे पण खूप जास्त नाही. बिघॅम्पटन मध्ये काल (दिनांक ३ एप्रिल २००९) झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानच्या बैतुल्ला मसूदने स्विकारली आहे. अशा कटकटी अमेरिकेच्या मागे लागल्या तर अमेरिकेला तालिबानविरूध्द कारवाई करणे भाग पडेल. तसा जनमताचा रेटा अमेरिकेच्या अध्यक्षांवर येईल.तेव्हा भारतासाठी हे जास्त चांगले नाही का?

>>उलट तालिबानींना अफगाण मधुन हुसकल्यावरच भारताची डोकेदुखि वाढली आहे
पण तालिबान्यांच्या विरूध्द अमेरिकेसारखी महासत्ता आली आहे हे भारतासाठी ’लाँग टर्म’ मध्ये चांगले आहे.

R. Prashant said...

नमस्कार !!
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला उजाळा "स्वातंत्र्यसमर १८५७ चा" http://swatantrasamar1857cha.blogspot.com/,
त्यात तुम्हाला बघायला मिळेल दुर्मिळ चित्र आणि त्यांची संक्षिप्त माहीती - १८५७ च्या समराला सुरुवात करणारे विवादीत काडतुस, बंडात वापरलेली पी-५३ रायफल, मंगल पांडेंच्या फाशीचा हुकुमनामा, समरातील काही आठवणी - क्रुरपणे दिली जाणारी फाशी, काश्मिरगेट वरील रणसंग्रांम (दिल्ली), बराखपुर येथील छावणी, शिपायांची कैद, तोफेच्या तोंडी सैनिक, लखनव येथील इंग्रजावर हल्ला, इंग्रज अधिकारी हॅवलॉक यांनी केलेली कत्तल, मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुरशाह जफर, बेगम हज्ररत महल, कुंवरसिंह, नाना साहेब, राणाबेनी माधवसिंह, १८५७ काळातील इंग्रज अधिकारी - ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया, गर्व्हर्णल जनरल भारत, हेंन्री हॅवलॉक, झाशीच्या राणीचे पत्र, समरातील योध्यांवरील टपाल टिकीटे, ब्रिटीशांची शौर्य पद्क, १८५७ काळातील महत्वपुर्ण नकाशे , १८५७ च्या कालखंडातील चलन, १८५७ सालातील घटनाक्रम इ.


तर मग तुम्ही जरुर भेट द्या, आणि तुमचा अभिप्राय ब्लॉग वर द्या !!

प्रशांत - नाशिक


कदाचित आपण अजुनही तो उठाव म्हणजे एक बंड होते आणि अपराधी सैनिकांना तशी कठोर शिक्षा देणे योग्यच होते असे मानाल,
पण आम्ही भारतीय लोक ते केवळ शिपायांचे बंड होते असे मानत नाही, आम्ही ते आमचे पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्यसमर मानतो.
-स्वामी विवेकानंद-