Friday, December 28, 2007

सद्दाम आणि हिटलर

माझा मिसळपाव या मराठी संकेतस्थळावरील सद्दाम आणि हिटलर हा दिनांक २७ डिसेंबर २००७ रोजी लिहिलेला लेख.


मी महाविद्यालयात असताना 'मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली' या पूरक उपक्रमात मी ३ वेळा भाग घेतला आहे. या उपक्रमात दोन विद्यार्थ्यांचा संघ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील एकेका देशाचे प्रतिनिधीत्व करतो.असे एकूण ३० ते ४० संघ मी भाग घेतलेल्या वेळी होते. त्या सर्व संघांपुढे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पारित झालेला ठराव मांडण्यात येतो आणि त्यावर त्या विद्यार्थ्यांनी आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या देशांची भूमिका मांडणारे भाषण करायचे आणि इतर देशांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांची 'बिनपाण्यानी' करायची. आणि हे सर्व नाटक आहे हे लक्षात घेऊन आपली वैयक्तिक मते बाजूला ठेऊन आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या देशाची अधिकृत भूमिका विद्यार्थ्यांनी मांडणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करणार्‍या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारची अधिकृत भूमिका-- "आम्ही काश्मीरात भारतीय दडपशाहीविरूध्द लढणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना नैतिक समर्थन देतो आणि काश्मीरातील हिंसाचार हा स्वातंत्र्यलढा असून दहशतवादाला आम्ही अजिबात समर्थन देत नाही" ही मांडणे अपेक्षित असते. कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठात हा उपक्रम होत असे आणि त्यात काही आफ्रिकन देशांचे प्रतिनिधीत्व केनिया, झिंम्बाब्वे या ठिकाणाहून आलेले विद्यार्थी करत असत. इतर सर्व देशांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी भारतीयच असत.एकूणच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये रस असलेल्यांसाठी हा एक खूपच चांगला उपक्रम होता.

मी या उपक्रमात वेगळ्या वेळी युगोस्लाव्हिया, भारत आणि पॅलेस्टाईन या देशांचे प्रतिनिधीत्व केले होते. मार्च २००१ मध्ये म्हणजे मी शेवटच्या वर्षाला असताना माझे मित्र अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करत होते आणि मी पॅलेस्टाईनचे. त्याअर्थी आम्ही त्या उपक्रमातील प्रतिस्पर्धी होतो. तरीही आम्ही आमच्या देशांच्या भूमिकांविषयी एकत्र बसून तयारी केली होती. माझ्या मित्रांनी आम्हाला पॅलेस्टाईन विषयी काही मुद्दे सांगितले तर आम्ही त्यांना अमेरिकेविषयी.

अर्थातच अमेरिकेच्या इराकविषयक धोरणांवर अनेक प्रश्न विचारले जाणे अपेक्षितच होते. आणि मार्च २००१ म्हणजे दुसरे आखाती युध्द व्हायचे होते आणि बुश अध्यक्षपदी नुकतेच आले होते.तेव्हा मी माझ्या मित्रांना अमेरिकेच्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी खालील मुद्दे सुचवले होते. त्यात एक प्रमुख मुद्दा म्हणजे हिटलर आणि सद्दाम हुसेन यांच्यातील साम्य दाखविणे.


"हिटलर १९३३ मध्ये जर्मनीत सत्तेवर आला. त्याने १९३६ साली र्‍हाईनलँडचा ताबा मिळवला.त्यावेळी जगातील सर्व देशांची भूमिका काय होती? हिटलरने केले त्यात चूक काय आहे?कारण त्याने व्हर्सायच्या तहाप्रमाणे जर्मनीचा ज प्रदेश फ्रान्सला दिला होता तो परत मिळवला.किंबहुना फ्रान्सनेही त्याविषयी अजिबात तक्रार केली नाही.त्यानंतर १९३८ च्या मार्च महिन्यात हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला.त्यामागचे कारण काय तर ऑस्ट्रीयन जनता जर्मनभाषिक आहे.त्यावर जगाची प्रतिक्रिया काय होती?इंग्लंड्-फ्रान्सने फारशी प्रतिक्रिया व्यक्त केलीच नाही. मग आला १९३८ चा सप्टेंबर महिना. हिटलरने झेकोस्लाव्हाकियातील सुडेटनलँडवर हक्क सांगितला. त्यामागचेही कारण काय तर तेथील जनता जर्मन भाषक आहे.तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन स्वतः हिटलरच्या नाकदुर्‍या काढायला बर्खटेसगार्डन येथे ३ वेळा गेले.त्यानंतरच्या म्युनिक करारात तत्कालीन महासत्तांनी (इंग्लंड आणि फ्रान्स) हिटलरपुढे लोटांगण घातले आणि झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच त्या देशाचा प्रांत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकला.जेव्हा हिटलरने पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितला तेव्हा जगाचे डोळ उघडले.पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता.आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या अग्निदिव्यातून जावे लागले आणि ६-७ कोटी लोकांची आहुती त्यात पडली. जर १९३६ मध्येच हिटलरने र्‍हाईनलँडवर ताबा मिळवल्यानंतर तत्कालीन महासत्तांनी कडक भूमिका घेतली असती तर पुढचे रामायण झाले नसते. पण मुळातच बोटचेपी भूमिका घेतल्यामुळे हिटलरचा धीर चेपला आणि तो अधिकाधिक गंभीर कृत्ये करू लागला.

आता वळू या इराकच्या प्रश्नाकडे. सद्दाम १९७९ मध्ये सत्तेवर आला. १९८० मध्ये त्याने इराणवर आक्रमण केले.१९९० मध्ये सद्दामने कुवेतचा कब्ज घेतल्यानंतर आम्ही कडक भूमिका घेतली.आखाती युध्दाच्या वेळेस सद्दामने पहिले काही केले असेल तर इस्राएलवर क्षेपणास्त्रे डागणे. जेरूसलेमवर कब्जा मिळवणे हे तर सद्दामचे ध्येय होते आणि ते त्याने अनेकदा बोलूनही दाखवले होते.त्यानंतर सद्दामने सौदी अरेबियातील अल खाफजी या शहरावर ताबा मिळवला. सौदी अरेबियाचा इराक्-कुवेत संघर्षाशी काय संबंध होता? काहीच नाही.म्हणजे सद्दाम हा आजूबाजूच्या सर्व देशांसाठी मोठा धोका होता. र्‍हाईनलँडचा कब्जा ही हिटलरसाठी सुरवात होती.तसेच कुवेतवरील आक्रमण ही सद्दामसाठी सुरवात कशावरून नसती?अमेरिकेने त्यावेळी कडक भूमिका घेतल्यामुळे तो धोका टळला. आणि ते आक्रमण करणे ही एक गरज होती.

आता राहता राहिला प्रश्न की ते आक्रमण अमेरिकेनेच का करायचे हा.आर्थिक आणि सामरीक दृष्ट्या जर असे आक्रमण करणे कोणत्या देशाला शक्य असेल तर ते केवळ अमेरिकेला. किंबहुना जगातील महासत्ता या नात्याने तसे करणे हे अमेरिकेचे उत्तरादायित्व आहे. आपण घाना किंवा सोमालिया यासारख्या देशांकडून ती अपेक्षा करू शकत नाही.

किंबहुना केवळ इराकच नव्हे तर जगाच्या कोणत्याही भागात जर नवे हिटलर निर्माण होत असतील तर त्यांचा बंदोबस्त करणे ही महासत्ता या नात्याने अमेरिकेची जबाबदारी आहे.आणि किंबहुना ते अमेरिकेने केलेच पाहिजे.हिटलरकडे दुर्लक्ष केल्यामुळे जगाला दुसरे महायुध्द या भयंकर प्रसंगातून जावे लागले. त्या चुकेची पुनरावृत्ती कदापि होता कामा नये."

अर्थात हे बाजू अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संघाने मांडायची असे ठरले होते. अमेरिकेच्या धोरणातही चुका आहेतच.कारण अमेरिकेच्या दृष्टीने कटकटीच्या असणार्‍या हुकुमशहांचाच अमेरिकेने बंदोबस्त केला. याह्याखान ला पूर्णपणे आणि पनामाच्या नोरीगाला अनेक वर्षे अमेरिकेने मोकळे रान दिले.

तरीही या सर्व पार्श्वभूमीवर २००३ चे आखाती युध्द हे १९९१ चा unfinished agenda पूर्ण करण्यासाठी अमेरिकेने केले असे म्हटले तर त्यात चूक काय?

अवांतर-- हे लिहिण्यामागे तात्कालिक कारण नाझी भस्मासूराचा उदयास्त या पुस्तकावरची मिसळपाववरील चर्चा.

Wednesday, December 26, 2007

हिटलरविषयी

माझा मराठी संकेतस्थळ मिसळपाववरील सागर यांच्या नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग.कानिटकर या चर्चेवरील माझा प्रतिसाद. (दिनांक: २५ डिसेंबर २००७)

>>हिटलरसारख्यांची भलामण मला तरी खेदजनक वाटते. 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक म्हणून उत्तम असले तरी बर्‍याचदा एकांगी वाटते. हिटलरमधे कितिही गुण असले तरी तो गुणांचा उपयोग चांगल्यासाठी करत नसल्याने त्याच्या गुणांना काहिच अर्थ उरत नाहि.

१००% मान्य. हिटलरने व्हर्सायच्या तहाच्या नामुष्कीतून जर्मनीला वर आणले आणि १९३८ पर्यंत जर्मनी युरोपातील सर्वात बलिष्ठ देश झाला.त्याचे श्रेय हिटलरला द्यायलाच हवे.१९३६ मध्ये हिटलरने पहिल्यांदा र्‍हाईनलँड वर ताबा मिळवला. र्‍हाईनलँड हा एकेकाळचा जर्मनीचा प्रांत व्हर्सायच्या तहाने फ्रान्सला देण्यात आला होता.तेव्हा र्‍हाईनलँडवरील ताबा पूर्णपणे समर्थनीय होता.पण इतर देशांवरील केलेले आक्रमण खचितच नाही.

हिटलरने १९३८ मध्ये ऑस्ट्रीयावर रक्ताचा एक थेंब न सांडता थेंब मिळवला.ऑस्ट्रीयाचे चॅन्सेलर शुशेनीग यांच्यावर दमदाटी करून आणि स्थानिक सूर्याजी पिसाळ सेयस इन्कार्ट याच्या मदतीने हिटलरने ऑस्ट्रीयावर ताबा मिळवला. त्यामागचे हिटलरचे कारण ऑस्ट्रीयन जनता जर्मन भाषा बोलते हे होते. त्यासाठी ऑस्ट्रीयन जनतेमधून कोणतीही चळवळ उभी राहिली नव्हती हे ध्यानात घ्यायला हवे. तशीच गोष्ट सुडेटनलँडची. झेकोस्लाव्हाकियाचा सुडेटनलँड हा प्रांत जर्मन भाषिकांचा आहे म्हणून तो जर्मनीचा भाग व्हायला हवा असा हिटलरचा दावा होता.त्यावेळी इंग्लंड, फ्रान्स या महासत्तांनी झेकोस्लाव्हाकियाला न विचारताच हिटलरपुढे लोटांगण घालत सुडेटनलँड परस्पर जर्मनीला देऊन टाकले. त्यानंतर काही महिन्यातच हिटलरने उर्वरीत झेकोस्लाव्हाकियावर आक्रमण करत तो देश गिळंकृत केला.त्याचे समर्थन कसे होऊ शकेल? त्यानंतर हिटलरने जेव्हा पोलंडमधील डँन्झिग बंदरावर हक्क सांगितल्यानंतरच जगाचे डोळे उघडले.पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि जगाला दुसर्‍या महायुध्दाच्या कठिण काळातून जावे लागले.

हिटलरने इंग्लंड आणि रशियाचा मोठा भाग वगळता इतर सर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्या भागातील जनतेला किती हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याचे यथार्थ चित्रण नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकात अजिबात नाही.त्या पुस्तकात होलोकॉस्ट वर केवळ एक प्रकरण आहे. मला वाटते त्या हालअपेष्टांचे चित्रण कोणत्याही पुस्तकात होऊ शकणार नाही. युध्दस्य कथा रम्या या न्यायाने सामरीक डावपेच वाचायला खरोखरच मजा येते.पण जर आपल्याला क्षणभर १९४० च्या दशकातील नाझी अंमलाखालील युरोपात कल्पनेने जाता आले तर हिटलरला क्रूरकर्मा हे एकच विशेषण देता येऊ शकते हे ध्यानात येईल.

माझा स्वतःचा फ्रँक कॅप्रा यांच्या why we fight--Battle for Russia आणि तत्सम अनेक माहितीपटांचा संग्रह आहे.आणि त्या काळात बनवलेल्या माहितीपटांमधील दृष्ये बघताना अंगावर खरोखर शहारा येतो. हिटलरच्या समर्थकांनी खालील गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकते ते सांगावे--

१) पोलंडमध्ये ५० लाखांहूनही अधिक नागरीकांच्या कत्तली. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही काही हजार पासून काही लाख लोकांच्या कत्तली.
२) त्याचप्रमाणे युक्रेन, क्रायमिया यासारख्या रशियाच्या भागांमध्ये जनतेवर जरब बसावी म्हणून जागोजागी लोकांना जाहिरपणे फाशी देणे, लेनिनग्राडचा वेढा आणि त्या शहरातील लोकांच्या त्यामुळे झालेल्या हालअपेष्टा
३) नाझी वैदूंनी केलेले अमानवीय प्रयोग
४) नाझींनी जिंकलेल्या भागातून विशेषतः रशियातून गुलाम म्हणून जर्मनीत आणलेल्या हजारो रशियन स्त्रिया. त्यांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली हे सांगायलाच हवे का?

इथे दिलेली यादी खूपच थोडी आहे.त्यात इतर अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. पण या गोष्टींचे समर्थन कसे होऊ शकेल? आपण इंग्रजांनी जालियनवाला बागेत काही शे नि:शस्त्र भारतीयांना ठार मारले म्हणून इंग्रजांच्या नावाने खडे फोडतो. अर्थात ते योग्यही आहे पण त्याचवेळी लाखो लोकांच्या कत्तली करणार्‍या हिटलरचे समर्थन कसे करू शकतो?

आपण भारतीय सुदैवाने दुसरे महायुध्द या भयंकर प्रकारापासून दूर होतो.त्यामुळे हिटलरचे समर्थन करणे आपल्यासाठी खूपच सोपे आहे. पण हिटलरच्या छळछावण्यांमध्ये मरण पावलेल्या लाखो निरपराध लोकांच्या आत्म्यांना सामोरे जाऊन हिटलरचे समर्थन कोणी करू शकेल का?

भारतीयांना पटेल अशी तुलना करायची झाली तर हिटलरची तुलना केवळ गझनीच्या महंमदाबरोबर करता येईल.दोघेही क्रूरकर्मे, दोघांनीही लाखो लोकांच्या कत्तली केल्या, दोघांनीही अपरिमित लूटमार केली ! जर हिटलरचे समर्थन आपण करत असाल तर गझनीच्या महंमदाचे पण आपण समर्थन करणार का?का परदु:ख शीतलम असे म्हणत हिटलरच्या कृत्यांकडे कानाडोळा करणार?

हिटलरच्या मते जगात केवळ जर्मन आर्यवंश श्रेष्ठ होता.वंशात आणि रक्त्तात सरमिसळ झाली तर कमी दर्जाच्या वंशाचे लोक जन्माला येतात हे हिटलरचे तत्वज्ञान होते.आणि अशा कमी वंशाच्या लोकांना जगायचा अधिकार नाही (किंवा त्यांना गुलाम बनविणे हा जर्मन आर्यवंशीयांचा अधिकार आहे) असे हिटलरचे म्हणणे होते. तेव्हा हिटलरच्या मते भारतीय पण कमी दर्जाचेच होते असे म्हटले तर त्यात काय चुकले?सुदैवाने हिटलरचे भारतावर आक्रमण झाले नाही. पण जर का ते झाले असते तर भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हिटलरला आपली रक्ताची तहान भागविणे सहज शक्य होते.जर मूठभर इंग्रज (जे हिटलरपेक्षा बरेच जास्त सुसंस्कृत होते) ते भारतावर १५० वर्षे राज्य करू शकले तर सशस्त्र क्रूरकर्म्या नाझींनी भारताचे काय केले असते?इंग्रज राजवटीत जालियनवाला बाग सारख्या काही घटना घडल्या. नाझी राजवटीत तर गावोगावी जालियनवाला बाग झाले असते. आणि तरीही आपण हिटलरचे समर्थन केले असते का?

कानिटकरांचे पुस्तक हे एक पुस्तक म्हणून चांगले असले तरी केवळ तेच पुस्तक वाचले तर हिटलर हा एक चांगला राज्यकर्ता होता पण रणांगणावर केलेल्या काही चुकांमुळे त्याचा पराभव झाला असे मत बनू शकेल.आणि ते धोकादायक आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन