Friday, June 15, 2007

गतानुगतिको लोका:

माझा उपक्रम या मराठी संकेतस्थळावरील  हिंदू धर्मातील श्राध्द संकल्पना या लेखावरील प्रतिसाद. (दिनांक १४ जून २००७)


शाळेत असताना संस्कृतमध्ये 'गतानुगतिको लोका:' म्हणून एक गोष्ट धडा म्हणून होती. थोडक्यात त्या गोष्टीचा सारांश असा: एकदा राणीच्या दासीचे लाडके गाढव मरते.त्यानंतर ती दासी मोठमोठ्याने रडू लागते.राणीला तिची दासी रडत आहे ही बातमी कळते. त्यानंतर राणी त्या दासीच्या घरी जाऊन रडू लागते.मग राजा,सेनापती, सरदार, दरबारातील इतर मानकरी आणि असे करत करत शहरातील सर्व लोक दासीच्या घरी जाऊन रडू लागतात.नक्की काय झाले आहे हे विचारायची कोणीही तसदी घेत नाही आणि केवळ दुसरा माणूस रडत आहे म्हणून मी पण रडणार या 'गतानुगतिक' मनोवृत्तीमुळे सर्व लोक तिथे जाऊन रडायला लागतात.बाजूने काही परदेशी पर्यटक चाललेले असतात.त्यांना कळत नाही की शहरातले सगळे लोक का रडत आहेत! ते त्या रडणार्‍या माणसांपैकी एकाला कारण विचारतात. तो माणूस म्हणतो,'मला माहित नाही.माझा शेजारी इथे येऊन रडायला लागला म्हणून मी पण आलो'.शेजारी तिसर्‍या माणसाकडे बोट दाखवतो. असे करत करत कोणालाही कारण माहित नसते आणि शेवटी सेनापती राजाकडे, राजा राणीकडे आणि राणी दासीकडे बोट दाखवते.शेवटी दासीचे गाढव मेले हे कारण होते हे कळताच सगळ्यांची चांगलीच फजिती होते.

आपल्या समाजातही कमी-अधिक प्रमाणात असाच गतानुगतिकपणा आढळत नाही का?केवळ शास्त्रात लिहिले आहे म्हणून आपण अनेक गोष्टी कारण न समजता करत असतो.त्या कारणामुळे अनेक रूढी परंपरा पिढ्यानपिढ्या आपण जोपासत आलो आहोत.मला वाटते श्राध्द-पक्ष-पंचक या गोष्टी त्याचाच एक भाग आहेत.मी भारतीय तत्वज्ञानाविषयी जे काही वाचन केले आहे (स्वामी दयानंद, डॉ. राधाकृष्णन यांची पुस्तके) त्यावरून असे स्पष्ट आहे की भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे आत्मा हे प्रत्येक जीवाचे (अमिबापासून माणसापर्यंत प्रत्येकाचे) खरे स्वरूप आहे.आत्मा हा अमर असून त्याला जन्म-मृत्यू यासारख्या शरीराला लागू होणार्‍या संकल्पना लागू होत नाहीत. एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करणे म्हणजे आत्म्यासाठी कपडे बदलण्याइतके सोपे आहे.या सर्व गोष्टी आचरणात आणायला कठिण असल्या तरी एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून मला पटतात.पण श्राध्द-पक्ष सारखी कर्मकांडे नाहीत.कारण जर प्रत्येक जीवाचे शाश्वत स्वरूप आत्मा असेल आणि आत्म्याला जन्म-मृत्यू काही नसेल तर 'मृत' व्यक्तीसाठी श्राध्द कशाकरता हा प्रश्न उभा राहतो.

आणि दुसरा प्रश्न म्हणजे भगवद्गीता आणि श्राध्द-पक्ष यासारखी कर्मकांडे एकाच हिंदू धर्माचा भाग कशा होऊ शकतात? की काही हजार वर्षांच्या काळात पुरोहित वर्गाने आपल्या स्वार्थासाठी (दक्षिणेची सोय व्हावी म्हणून) अशी कर्मकांडे बेमालूमपणे शास्त्रांमध्ये घुसडून दिली आहेत?आणि २००७ च्या जगातही आपण त्यामागचे कारण न विचारता गतानुगतिकासारखे त्या कर्मकांडांचे पालन करत आहोत? दशमीच्या दिवशी कोणी मरण पावले की लागले पंचक. उपाय काय? पंचक शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या! मूळ नक्षत्रावर मुलीचा जन्म झाला तर त्याची शांती करा म्हणजे पुरोहिताला दक्षिणा द्या! आपल्या हातून मांजर मेले तर पापाचे परिमार्जन म्हणून पुरोहिताला दक्षिणा द्या! अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे खरे कारण धर्माच्या नावावर कशाचातरी बागूलबोवा दाखवून लोकांना लुबाडणे हे आहे असे मला वाटते.माझे तरी मत बनले आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी तत्कालीन ब्राह्मणांनी (त्यात माझे पूर्वजही आले) अशा अनेक गोष्टी शास्त्रांमध्ये घुसडून दिल्या आहेत.काही हजार वर्षांच्या काळात त्या गोष्टी इतक्या बेमालूमपणे शास्त्रात मिसळून गेल्या की मूळ काय आणि घुसडलेले काय हे ओळखणे कठिण झाले.अन्यथा भगवद्गीतेसारखे उच्च तत्वज्ञान आणि इतरांना लुबाडणारी कर्मकांडे एकाच धर्माचा भाग कसे होऊ शकतात याचे कारण देणे कठिण आहे.

बायबलमध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे म्हटले आहे.त्याविरूध्द मत मांडले म्हणून कोपर्निकस आणि गॅलिलिओ यांना धर्मगुरूंनी तुरूंगात डांबले होते.निदान इतिहासाच्या पुस्तकात तरी असेच लिहिले होते. २००७ च्या जगात काही कट्टर लोक सोडले तर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असे कोणीच म्हणणार नाही.जर एक समाज म्हणून ख्रिस्ती लोकांनी बायबलमध्ये म्हटलेली एखादी गोष्ट नाकारायचे धैर्य दाखवले असेल तर आपण आपल्या शास्त्रात न पटणार्‍या गोष्टी असतील तर त्या का नाकारू शकत नाही?पण दुर्दैवाने तसी नीरक्षीरविवेकबुध्दी आपण दाखवत नाही.

मागे मी आंतरजालावरील एका चर्चा व्यासपीठामध्ये असे मत मांडले तर मला काहींनी 'तू ख्रिस्ती का मुसलमान' असा प्रश्न विचारला होता.जर आपल्या शास्त्रांमधील काही गोष्टी मला मान्य नसतील आणि मी जर त्याबद्दल मतप्रदर्शन केले तर मी ख्रिस्ती किंवा मुसलमानबनतो का?आणि मला असा प्रश्न विचारणारेच लोक मोठ्या तोंडाने 'हिंदू धर्म मोठा सहिष्णू आहे' असे म्हणतात. असो.

----विल्यम जेफरसन क्लिंटन

2 comments:

HAREKRISHNAJI said...

आपण योग्य तेच लिहीले आहेत

विसुना VISUNA said...

वि.दा. सावरकरांचा 'स्त्री' मासिकात १९४५साली प्रसिद्ध झालेला लेख शं.वा. किर्लोस्करांच्या चित्रांसकट स्त्री (जुलै की ऑगस्ट) २००८ मध्ये पुनःप्रसिद्ध झाला.
जरूर वाचावा.