Wednesday, August 9, 2006

इंग्रज राजवट भारतातील वैज्ञानिक प्रगतीस हितकर होती का?

वैज्ञानिक विश्वात प्राचीन काळी भारताने खूपच मोठी झेप घेतली होती.सध्याच्या एम.आय.टी., स्टॅनफोर्ड च्या तोडीची नालंदा,तक्षशिला विद्यापीठे भारतात होती.मात्र सततच्या परकिय आक्रमणांमुळे त्या प्रगतीत खंड पडला.तसेच भारतात जातीव्यवस्था आणि धर्माचे अकारण माजवलेले स्तोम यामुळे वैज्ञानिक प्रगती होणे कठिण होऊन बसले.१३ व्या शतकात इंग्लंडमध्ये जगप्रसिध्द केंब्रिज,ऑक्सफोर्ड यासारख्या जगप्रसिध्द विद्यापीठांची स्थापना होत असताना भारतात मात्र संन्याश्यांच्या मुलांच्या मुंजी कराव्यात की नाही यावर खल चालू होता.

अनेक वर्षांच्या खंडानंतर पेशवाईत अर्ध्याहूनही जास्त भागात हिंदू राज्य स्थापन झाले मात्र दुर्दैवाने पेशव्यांचे वैज्ञानिक प्रगतीकडे दुर्लक्ष झाले.दरम्यानच्या काळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि न्यूटनसारखे महान शास्त्रज्ञ होऊन गेले.मात्र भारत वैज्ञानिक दृष्टया मागासलेलाच राहिला.

इंग्रज राज्याची स्थापना झाल्यावर १८६१ मध्ये मुंबई,कलकत्ता आणि मद्रास विद्यापीठांची स्थापना झाली.देशात अभियांत्रिकीचे आणि वैद्यकिय शिक्षण देणारी महाविद्यालये चालू झाली.त्यातूनच जगदिशचंद्र बोस,सी.व्ही.रामन यांच्यासारखे काही महान वैज्ञानिक घडले.तरीही भारत वैज्ञानिक दृष्टया मागासलेलाच राहिला.

माझ्या विधानाच्या समर्थनार्थ मी एक उदाहरण देऊ इच्छितो.मी पु.ल.देशपांडयांचे 'बिगरी ते मॅट्रिक' हे कथाकथन अनेकवेळा ऐकले आहे.त्यात ते त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतले अनुभव आणि त्यांचे शिक्षक यांच्याबाबतीत बोलतात.त्यात उल्लेख आहे की त्यांना प्राथमिक शाळेत गोपाळ कृष्ण गोखल्यांनी लिहिलेले अंकगणितावरचे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून होते.म्हणून मी एकदा गुगलमध्ये गोपाळ कृष्ण गोखले आणि Arithmetic असा शोध केला. http://www.liveindia.com/freedomfighters/29.html वर असा उल्लेख आहे की त्यांची विद्वत्ता आणि शिक्षणक्षेत्राविषयीची तळमळ याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले अंकगणितावरचे पुस्तक!
गोपाळ कृष्ण गोखले हे त्याकाळचे एम.ए. शिक्षित आणि भारतातील अत्यंत विद्वान लोकांपैकी एक होते.भारतातील आघाडीच्या विद्वान व्यक्तीने प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिण्यात समाधान का मानावे?त्यातच आपला शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातला मागासलेपणा सिध्द होत नाही का?अर्थात गोखल्यांची विद्वत्ता किंवा त्यांची तळमळ याविषयी कोणालाही अजिबात शंका नाही.पण तरीही त्यांच्यासारख्या व्यक्तीने आपले क्षेत्र प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित का ठेवावे?

पाश्चिमात्य जगतात Philosophical transactions of Royal Society of London हे जर्नल १६६५ मध्ये तर Physical Review सारखी जर्नल्स १८९३ मध्ये सुरू झाली.तर २० व्या शतकाच्या प्रारंभी भारतातील एक आघाडीची विद्वान व्यक्ती प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांकरीता पुस्तक लिहित होती.यावरूनच आपण किती मागासलेले होतो याचा अंदाजे येऊ शकेल.

इंग्रज राजवटीत आधुनिक वैज्ञानिक शिक्षणाला प्रारंभ झाला आणि त्यातूनच भारताने अणुसंशोधन, उपग्रह आणि अवकाश, संगणक सॉफ्टवेअर यासारख्या काही क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे तरीही जी काही प्रगती झाली आहे त्याला इंग्रज राजवटीत आधुनिक वैज्ञानिक शिक्षणाला झालेला प्रारंभ जबाबदार आहे असे माझे मत आहे.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

2 comments:

Saurabh said...

इंग्रजांनीसामाजिक दृष्ट्या नक्किच काहि चांगल्या गोष्टि केल्या होत्या. मात्र जो देश शुन्याचा निर्माता आहे त्याला इंग्रजांनी काहि तांत्रिक गोष्टि सांगाव्या हे पटत नाहि.
मूळात युरोप हा ग्रीस वा ईटली वगळता अभियांत्रिकि अथवा गणिती दृष्ट्या शुध्द बिनडोक होता. त्यांची सगळी प्रमेये हि भारत-चीन-अरब-इजिप्त या चार ठिकाणहुन चोरुन अथवा मागुन आणलेली आहेत. आपली वाइट खोड अशी कि लिहुन ठेवायचे नाहि. किंवा लिहुन ठेवले असेल तर ते हरामखोर मुस्लिम आक्रमकांनी पाख्म्ड म्हनून जाळले.
पृथ्वीचा परीघ आपण केव्हाच मोजला होता. आपण "परार्ध" पर्यंतची गणिते वापरत होतो(याहि पुढे(पद्म - महापद्म आहेत ना?) परशुरामांनी सागराकडुन जमिन घेतली किंवा अगस्तींनी सागर आचमनात प्यायला या काव्यरुपि ओळींचा लॉजिकल अर्थ भराव टाकुन भूमी निर्माण केली असा होतो.

भारतीय ज्योतिष अथवा खगोलशास्त्र हे जगत्मान्य होते. कोणार्क सुर्यमंदिरातील सुर्याची मुर्ती हि चुंबकिय बलावर तरंगती ठेवली होती असे वाचल्याचे आठवते (पुस्तकाचे नाव आठवत नाहि)तसे खरेच असेल तर समान चुंबकिय बल गाभार्‍यात विशिष्ट जागी निर्माण करायची तांत्रिकक्षमता भारतीयांकडे होती.

भारतीय संस्कृतीत पाठांतराला महत्व. त्यामुळेच आजहि वेदांतील एकहि मात्रा इकडची तिकडे झाली नाहिये हे लक्षात घेता हि पध्दती किती अचुक होती हे कळाते. भारत हा मुख्यता शांतताप्रिय व शेती प्रधान देश. बाप करतो तेच पोर करत असे. अठरापगड जातींत वांशिक शिक्षण हे रक्तात इतके भिनले असे कि कुठल्याहि शाळेत न जाता आणि कुठलीहि डिग्री न घेता तो व्यवसाय उत्तम चालवला जात असे.
आज कंबोडिया पर्यंत राममंदिरे मिळतात. भारताचा आफ्रिकेतील देशांबरोबर व्यापार चाले म्हणजे भारताचे नौकानयन किमान हजार वर्षांपूर्वी जगातील उत्तम नाविक दलां मध्ये गणले जात होते.

स्थापत्य शास्त्रात आजहि हरप्पा मोहोंजोदाडो सारखि आखिव-रेखिव शहरे जगात इतरत्र मिळळॆ कठिण म्हणजे तेहि शास्त्र उत्तम होते.

जगातील पहिली शस्त्रक्रिया सुश्रुतने केली. -चरक-पातंजली हे तर प्रतिधन्वंतरीच. आयुर्वेद आज परत जगभर झपाट्याने पसरतय. आज ह्या टोणग्यांना जे समजतय ते आपल्या ऋषींनी आयुर्वेदात कधीच लिहुन ठेवलय. तिहि बाजु भक्कम.

म्हणजे इंग्रजांनी आपल्याला शैक्षणिक-व्यवसायिक-वैद्यकिय दृष्ट्या शिकवावे असे फार काहि नव्हते. मात्र त्यांची सामाजिक बाजु नक्किच वाखाणण्याजोगी आहे.

इंग्रजांच्या राज्यामुले भारतीय आज इतके प्रगत आहेत असे म्हणाल तर जपान तर किती मागासला हवा होता ना?

Girish said...

माझ्या मूळ लेखातच मी म्हटले आहे की प्राचीन काळी भारताने वैज्ञानिक विश्वात मोठी झेप घेतली होती.तेव्हा आपले प्राचीन काळाविषयीचे सर्व मुद्दे मान्य. परकिय आक्रमणे आणि धर्माचे अवास्तव पसरलेले स्तोम यामुळे भारतात वैज्ञानिक प्रगतीकडे दुर्लक्ष झाले.आपण म्हणता त्या सगळ्या घडामोडी हजारो वर्षांपूर्वीच्या आहेत.पण नंतरच्या काळात कोणत्याही कारणाने का होईना ती परंपरा विसरली गेली होती आणि रुढीपरंपरांचे साम्राज्य पसरले होते. इंग्रज यायच्या पूर्वीच्या काळात भारतीय समाज अनेकविध रूढी-परंपरांनी ग्रासलेला होता. हूणांच्या आक्रमणात तक्षशीला विद्यापीठाचा विध्वंस झाला.त्यानंतर १२९७ आणि १३०३ मध्ये नालंदा आणि विक्रमशीला विद्यापीठांचा विध्वंस बख्तियार खिलजीने केला.त्यानंतर १८६१ मध्ये मुंबई,कलकत्ता आणि मद्रास विद्यापीठांची स्थापना होईपर्यंत भारतात एकही नवे विद्यापीठ स्थापन झाले नाही.पाठशाळांमध्ये पारंपारिक शिक्षण दिले जात होतेच पण एकही नवीन महत्वाचा शोध यादरम्यान लागला नाही.परकिय आक्रमण हे कारण होतेच पण त्याचा परिणाम आपल्यापुढे आहे.

अशा पार्श्वभूमीवर इंग्रज आले आणि नवे विचार त्यांनी या देशाला दिले त्याचा फायदा नक्कीच झाला हा माझा मुद्दा आहे.याच ब्लॉगवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मी इथे लिहिले आहे. त्यात या मुद्द्याशी संबंधित गोष्टींवर लिहिले आहे.त्यावरही मला आपली मते ऐकून घ्यायला आवडेल.

>>जगातील पहिली शस्त्रक्रिया सुश्रुतने केली. -चरक-पातंजली हे तर प्रतिधन्वंतरीच. आयुर्वेद आज परत जगभर झपाट्याने पसरतय. आज ह्या टोणग्यांना जे समजतय ते आपल्या ऋषींनी आयुर्वेदात कधीच लिहुन ठेवलय. तिहि बाजु भक्कम.

सकस चर्चेसाठी ’टोणगा’ सारखे शब्द योग्य नाहीत असे मला वाटते. आयुर्वेद जगात पसरतो आहे आणि त्याचे फायदे सर्वांना माहित आहेत.ते चांगलेच आहे. पण एम.आर.आय सारख्या नव्या उपकरणांमुळे आधुनिक वैद्यकशास्त्र जास्त प्रगत झाले आहे यात शंका नाही.

>>इंग्रजांच्या राज्यामुले भारतीय आज इतके प्रगत आहेत असे म्हणाल तर जपान तर किती मागासला हवा होता ना?
जपानमध्येही अनेक शतके Feudal राज्यपध्दती होती.पण १८५० च्या सुमारास जपानचा पाश्चिमात्य देशांशी संपर्क आला आणि त्यामुळे देश बदलून गेला. याविषयीची माहिती इथे वाचता येईल.त्यानंतर अवघ्या ५० वर्षात जपानने गरूडझेप घेतली आणि १९०४ मध्ये रशियाचाही युध्दात पराभव केला.मला वाटते की याचे कारण जपानी समाजात रूढीपरंपरांचे आणि जातीभेदांचे प्रस्थ नव्हते त्यामुळे त्यांच्या पायात साखळ्या नव्हत्या.याविषयी जास्त अभ्यास व्हायला हवा.

अर्थात पाश्चिमात्य लोक म्हणजे लोखंडाचे सोन्यात रूपांतर करणारे परिस वगैरे अजिबात नव्हते.पण आधुनिक विचार आणि शास्त्र त्यांच्याकडे होते यात शंका नाही.ज्या लोकांनी आपल्या प्रतिभेबरोबरच नव्या विचारांचे स्वागत केले ते पुढे गेले. आफ्रिकेत या दोन्ही गोष्टी जमून आल्या नाहीत म्हणून तिथे प्रगती होऊ शकली नाही.