Wednesday, August 23, 2006

भारताकडे दहशतवादाविरूध्द लढायचे काय पर्याय आहेत?

आजच वर्तमानपत्रात वाचले की मुंबईत अँटॉप हिल मध्ये एका पाकिस्तानी अतिरेक्याला पोलिसांनी चकमकीत ठार मारले‌. शक्यता आहे की तो अतिरेकी गणेशोत्सवादरम्यान मुंबईत घातपात घडविण्यासाठी आला होता आणि तसे जर का असेल तर तो मेला याचे आपल्या देशातील ढोंगी मानवतावादाची झूल पांघरलेले लोक आणि त्यांचे तथाकथित धर्मनिरपेक्ष साथिदार यांना सोडून इतर कोणालाच दुःख वाटू नये. पाकिस्तानकडून भारताला असलेल्या धोक्याचे कटू सत्य मुंबई रेल्वे बाँबस्फोटापासून अधिक तीव्रतेने अधोरेखित झाले आहे.त्याचाच हा एक भाग आहे.

या पार्श्वभूमीवर भारतापुढील पर्याय काय असे राहून राहून वाटते.

भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी अशी मागणी केली की भारताने पाकिस्तानवर हल्ला करून एकदाचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. इतरही अनेकांचे तेच म्हणणे आहे.पण पाकिस्तानवर हल्ला करून प्रश्न सुटणार आहे का?

पाकिस्तान हा एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे.प्रस्तावित युध्दात पाकिस्तानने जर दिल्ली,मुंबई किंवा इतर कुठेही अणुबाँब टाकला तर आपले लाखो नागरीक मृत्युमुखी पडतील.त्याला प्रत्युत्तर म्हणून आपणही अणुबाँब पाकिस्तानवर टाकू आणि पाकिस्तानमधील कराची,लाहोर सारख्या महत्वाच्या शहरांचे नामोनिशाण मिटवू. पण आपले नुकसान झालेले असेल ते फारच भयानक असेल.अणुयुध्दात कोणीही जिंकणार नाही.आपल्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजतील.कदाचित एका अणुबाँब हल्ल्यामुळे झालेले नुकसान भरून काढायला आपल्याला अनेक दशके लागतील.आणि युध्द सुरू झाले तर पाकिस्तान अणुबाँब हल्ला करणार ही गोष्ट तर निश्चित आहे.तेव्हा ती किंमत चुकवणे योग्य आहे का?कारण कोणत्याही युध्दात शत्रूचे जास्तीतजास्त नुकसान करण्याबरोबरच आपले नुकसान कमितकमी होईल याची काळजी धुरंधर सेनानी घेत असतात.

क्षणभर असे समजून चालू की भारत-पाकिस्तान युध्द हे अणुयुध्द होणार नाही तर ते पारंपारीक शस्त्रांनीच लढले जाईल.२००४ मध्ये अमेरीकेने पाकिस्तानला 'Major non-NATO ally' हा दर्जा दिला आहे.तेव्हा अमेरीका पाकिस्तानला मदत करणार हे उघड आहे.त्याचप्रमाणे चीननेही पाकिस्तानला आजपर्य़ंत भरपूर मदत केली आहे.चीनला महासत्ता बनायचे होते आणि चीनी राज्यकर्त्यांना माहित होते की भारत आपल्याला त्या मार्गात प्रतिस्पर्धी बनायची क्षमता बाळगून असलेला देश आहे.म्हणून चीनने जाणिवपूर्वक पाकिस्तानला बलिष्ठ केले कारण बलिष्ठ पाकिस्तान भारताला कायमच्या कटकटी निर्माण करेल आणि भारताची शक्ती त्याला उत्तर देण्यात खर्ची पडेल, याची चीनला खात्री होती.आणि झालेही तसेच.तेव्हा प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्दात चीन पाकिस्तानला मदत करणार नाही याची खात्री देता येत नाही. त्याचप्रमाणे सौदी अरेबिया सारखे श्रीमंत मुस्लिम देश पाकिस्तानच्या मदतीला धावतील ते वेगळेच.भारताने बांगलादेशाला जगातील जवळपास २/३ पेक्षा जास्त देशांचे वैर पत्करून स्वतंत्र केले.इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यातही महत्वाची भूमिका बजावली. पण आजपर्यंत किती वेळा काश्मिर प्रश्नावर त्या दोन देशांनी भारताचे समर्थन केले? शून्य.आपण त्यांच्यावर कितीही उपकार केले तरी इस्लामच्या नावावर सर्व मुस्लिम देश पाकिस्तानच्या समर्थनासाठी येतील किंवा उघडउघड पाकिस्तानचे समर्थन जरी केले नाही तरी तेलाने समृध्द मुस्लिम देश भारताला तेलपुरवठा बंद करून कोंडित पकडतील याचीच शक्यता जास्त.

आता क्षणभर असे समजुया की प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे पूर्णपणे इतर शक्तींच्या हस्तक्षेपाविना लढले जाईल.डिसेंबर २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यावर एन.डी.टी.व्ही. वर एक चर्चा झाली होती.त्यात दिलेली माहिती खरी असेल तर भारत आणि पाकिस्तान यामधला 'Strategic superiority ratio' सुमारे १.३ ते १.४ आहे. याचा अर्थ भारताची लष्करी ताकद पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपेक्षा १.३ ते १.४ पटीने अधिक आहे.ही ताकद पाकिस्तानविरूध्दचे युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी आहे का?वाटत नाही.ती कमितकमी २.५ ते ३ पटींनी अधिक असती तर कदाचित युध्द निर्णायक पध्दतीने जिंकायला पुरेशी झाली असती.त्यातून भारताचे सैन्य केवळ पाकिस्तान सीमेवर नाही तर चीनबरोबरच्या सीमेवरदेखील आहे.तेव्हा आपल्याला सर्व सैन्यक्षमता पाकिस्तानविरूध्द एकवटता येणार नाही.त्यातून पाकिस्तानच्या सैन्याला युध्दात जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा सारख्या अतिरेकी संघटनांकडून जी मदत होईल ती वेगळीच.त्या मदतीचा अंतर्भाव 'Strategic superiority ratio' मध्ये केला असेल असे वाटत नाही.तेव्हा शक्यता आहे की पाकिस्तानविरूध्दचे युध्द आपल्याला वाटते तितके सोपे जाणार नाही.

आता आपण क्षणभर तिसरी कल्पना करू की आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू!तरीही पुढे काय हा प्रश्न राहतोच.इतिहासाचा धडा आहे की परकिय देशातील (अथवा आपल्याच देशातील एखाद्या भागातील) जनतेला त्यांच्या इच्छेविरूध्द केवळ लष्करी सामर्थ्याच्या जोरावर दावणीला धरता येत नाही.युध्द जिंकल्यावर काही काळ तरी आपल्या सैन्याला पाकिस्तानमध्ये राहावे लागेलच.आणि पाकिस्तानातील लोक ते कदापि मान्य करणार नाहीत हे तर उघडच आहे.

लक्षात घ्या की दुसऱ्या महायुध्दात अजोड धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर रशियन सैन्याने पराभवाच्या खाईतून वर येत जर्मन सैन्यावर विजय मिळवला. रशियन सैन्याचे धैर्य,पराक्रम आणि इच्छाशक्ती याविषयी कोणालाही शंका नाही. तरीही त्याच रशियन सैन्याचे अफगाणिस्तानात काय झाले?कारण अफगाण जनतेला रशियन सैन्याचे त्यांच्या देशातील अस्तित्व मान्य नव्हते.१९९१ मध्ये विघटन झाल्यावरही रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या ५ पट मोठा आहे.तर चेचेन्या हा भारतातील दिल्ली शहराइतका क्षेत्रफळाने आहे.चेचेन्याची लोकसंख्या सुमारे ८ लाख म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यापेक्षा कमी आहे.तरी रशियन सैन्याला एवढया लहानशा प्रदेशातूनही माघार घ्यावीच लागली ना?कारण चेचेन लोकांना रशियाबरोबर राहायचे नव्हते.जगातील सर्वात शक्तीशाली अशा अमेरीकन सैन्याची इराकमध्ये कशी ससेहोलपट होत आहे ते तर अगदी स्पष्ट आहे.कारण इराकी जनतेला अमेरीकन सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य नाही.आपल्या सैन्याचीही तीच गत पाकिस्तानात होणार याविषयी अजिबात शंका नाही कारण पाकिस्तानी जनतेला आपल्या सैन्याची त्यांच्या देशातली उपस्थिती मान्य होणार नाही.

आणि आपले सैन्य माघारी आल्यावर तरी काय?सध्याच्या जागतिक परिस्थितीत प्रस्तावित भारत-पाकिस्तान युध्द हे एक महिन्याहून जास्त काळ चालणे शक्य नाही.पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १५ कोटी आहे. दुसरे महायुध्द ६ वर्षे चालूनही त्यात सुमारे ६ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.तेव्हा एका महिन्याच्या युध्दात आपण पाकिस्तानातील सर्व १५ कोटी लोकांना नक्कीच ठार मारू शकत नाही.अर्थात पाकिस्तानातले सर्व लोक काही दहशतवादी विचारसरणीचे नक्कीच नाहीत. पण युध्द झाले तर पूर्वी शांतताप्रिय असलेल्या पाकिस्तानी लोकांना आपल्या गोटात सामील करणे जिहादी विचारसरणीचे लोकांना अधिक सोपे जाईल. आपले सैन्य माघारी येताच कटकटी मोठया प्रमाणावर वाढतील.एका महिन्याच्या युध्दामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नायनाट होईल असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.आणि त्यातून पाकिस्तान आपला शेजारीच आहे.अमेरीकन सैन्य इराकमधून परत गेल्यावर अमेरीकन लोकांना इराकमधील दहशतवाद्यांचा अंतरामुळे त्रास होणार नाही. आपली परिस्थिती तशी नक्कीच नाही.

आणि या सर्व कल्पनाविलासामागे किती गृहितके आहेत हे लक्षात घ्या.पहिले म्हणजे युध्द अणुयुध्द न होता पारंपारीक युध्द होईल.दुसरे म्हणजे अमेरीका,चीन आणि मुस्लिम देश त्या युध्दात हस्तक्षेप करणार नाहीत आणि तिसरे म्हणजे आपण ते युध्द निर्णायक पध्दतीने जिंकू.या सर्व गोष्टी होऊनही पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बिमोड करणे आपल्याला शक्य होणार नाही हे उघडच आहे.
तेव्हा मला तरी वाटते की पाकिस्तानविरूध्द आपल्याला एकच गोष्ट करता येईल.आणि ती म्हणजे जशास तसे आणि दुसरे म्हणजे भारतात दहशतवाद्यांचे पाठिराखे आहेत त्यांना दयामाया न दाखवता यमसदनी धाडणे.त्यात शस्त्रास्त्रे पोचवणारे, कटाची आखणी आणि अंमलबजावणी करणारे यासारखे प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेले लोक यांचा प्रामुख्याने समावेश होईल.
आपले काय मत आहे?

----विल्यम जेफरसन क्लिंटन

No comments: