Saturday, August 12, 2006

हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्याविषयी

मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांशी हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्याविषयी बोललो आहे त्यापैकी बरेचसे लोक त्या हल्ल्याचा विरोध करतात.मात्र मी अमेरिकेच्या या हल्ल्याचे समर्थन करतो.मी त्यामागची कारणे या लेखात विषद करत आहे आणि आपणास विनंती आहे की आपणही याविषयीची मते मांडावी.

दुसर्‍या महायुध्दात जपानने ७ डिसेंबर १९४१ रोजी पर्ल हार्बर या अमेरिकेचा नाविकतळावर हल्ला करून उडी घेतली‍. जपानच्या या निर्णयास केवळ युद्धखोरपणा हे एकच कारण देता येऊ शकते.१९४१ आधी जपान आणि अमेरिका यादरम्यान कोणतेही वैर नव्हते. पहिल्या महायुद्धात तर अमेरिका आणि इंग्लंडबरोबर जपाननेही त्यांच्याबाजूने जर्मनीविरुद्ध भाग घेतला होता.

अमेरिका आणि जपानदरम्यानचे युद्ध डिसेंबर १९४१ ते ऑगस्ट १९४५ असे ४४ महिने चालले. अमेरिकेचे एकूण ४०७,३०० सैनिक या युद्धात मारले गेले. १९४५ च्या सुरवातीपासून अमेरिका दर आठवड्याला ३००० सैनिक गमावू लागली होती. अमेरिकन नागरिकांचे रक्षण करायची जबाबदारी अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रुमन यांची होती. तसेच जपान आणि अमेरिका यांच्यात युद्ध चालू असताना जपानी नागरिकांच्या जीविताचे रक्षण करायला किंबहुना त्याबद्दल विचार करायलाही ते बांधिल नव्हते. त्यांच्यासाठी अमेरिकांना नागरिकांचे जीव हे जपानी नागरिकांच्या जीवांपेक्षा नक्कीच जास्त महत्वाचे होते.
ऑगस्ट १९४५ च्या सुरवातीस अमेरिकन वर्तमानपत्र आणि तज्ज्ञ यांची जपान एका महिन्यात शरणागती पत्करेल अशी अपेक्षा होती. वर उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकेचे दर आठवड्याला ३००० याप्रमाणे सैनिक मारले जात होते.म्हणजे जपानविरूध्द युद्ध अजून एक महिना चालू राहिले असते तर सुमारे १२००० अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असता.अमेरिकनांचे प्राण वाचविण्याच्या दृष्टीने युद्ध लवकरात लवकर संपवणे ट्रुमन यांच्यासाठी अगत्याचे होते.

अमेरिकेने पहिली अणुचाचणी १६ जुलै १९४५ रोजी केली.जुलै अखेरपर्यंत रशिया आणि जपान यांच्यात युद्ध चालू झाले नव्हते. तेव्हा २८ जुलै रोजी मॉस्कोतील जपानी वकिलातीमार्फ़त अमेरिकेने जपानला इशारा दिला की ताबडतोब शरणागती पत्करा अन्यथा सर्वनाशाला सामोरे जायची तयारी ठेवा. तरीही जपानच्या राजाने किंवा सरकारने त्यादृष्टीने कोणतीही पावले उचलली नाहीत. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान अमेरिकन विमानांमधून इंग्रजी आणि जपानी भाषांमधील जपान सरकारला शरणागतीचे आव्हान करणारी हजारो पत्रके जपानच्या प्रमुख शहरांत टाकण्यात आली.तरीही जपान सरकारने शरणागती पत्करली नाही. याचा अर्थ अणुबॉम्ब टाकायचे पाऊल उचलण्याआधी अमेरिकेने जपानला भरपूर इशारे दिले होते.त्याला जर जपान सरकारने जुमानले नाही तर तो दोष जपान सरकारचा आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांना माहीत होते की अणुबॉम्बचा हल्ला जपानचे कंबरडे मोडेल आणि जपानला शरणागती पत्करणे भाग पडेल. १२००० अमेरिकनांचे प्राण वाचवण्यासाठी जपानने लवकरात लवकर शरणागती पत्करणे गरजेचे होते आणि त्यासाठी जपान सरकारने अमेरिकेपुढे दुसरा मार्ग शिल्लक ठेवला नव्हता.

मी अमेरिकेत गेली ४ वर्षे राहत आहे. आणि मी स्वतः सरकार आणि प्रसारमाध्यमे माणसाच्या जीवाचे किती मोल करतात हे जवळून बघितले आहे.मागे मिसिसिपी राज्यात १२ वर्षांची एक मुलगी संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली तेव्हा सी.एन.एन. वर राज्याच्या गव्हर्नरला उपग्रहाद्वारे स्टुडियोत बोलावून तपास कसा चालला आहे याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.तेव्हा ४ लाख अमेरीकन्स आधीच मृत्युमुखी पडले असल्याने युद्ध लवकरात लवकर थांबविण्यासाठी जनमताचा दबाव सरकारवर आला असेल याची कल्पना करता येते. भारतात जशी भारतीय नागरिकांच्या आयुष्याला अजिबात किंमत नाही तशी परिस्थिती अमेरिकेत नाही.

याकारणांमुळे मी हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ल्याचे समर्थन करतो. मागे मी हेच मत आंतरजालावरील दुसर्‍या एका चर्चा व्यासपीठात मांडले तर अनेकांची अशी धारणा झाली की मी असे म्हणत आहे की भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकावा. मी इथे स्पष्ट करू इच्छितो की मला इथे केवळ अमेरिका-जपान युद्धाविषयी मतप्रदर्शन करायचे आहे. तेव्हा मला भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकावा असे म्हणायचे नाही याची नोंद घ्यावी.


----विल्यम जेफरसन क्लिंटन

4 comments:

Saurabh said...

तुमचे म्हणणे बरोबर आहे पण ते अर्धसत्य आहे. मानवी जीवाची इतकिच किंमत असती तर व्हिएतनाम वर लाखो टन बॉंम्ब पडलेच नसते ना? आणि व्हिएतनाम युध्द थांबले कधी जेव्हा २४ वर्षे व्हिएतकॉंगींशी लढुन खंडोगणीक गोळ्या बॉंम्ब चा्लवुन देखिल व्हिएतकॉंगी शरण न येता अस्सा काहि तिखटप्रतिकार केला कि अमेरीकनांचे डोळे पांढरे झाले. आमची मुले हकनाक मारली जात आहेत हे अमेरीकन जनतेला समजायला २४ वर्षे जावी लागली? आणि "अमेरीकन्स" मरतात म्हणून हे अंगावर निष्कारण ओढावुन घेतलेले व्हिएतनामचे बाळंतपण झटकले. व्हिएतनामी मेले, स्त्रीयांची अब्रु याच अमेरीकनांनी वेशीवर टांगली, लाखो मुले अशी होती कि ज्यांचा बाप "कोणी एक" अमेरीकन सैनिक होता "कोण?" - ते माहित नाहि, कारण एकाच वेळी चार चार सैनिकांनी त्या मुलाच्या आईवर बलात्कार केला होता. १४-१५ वर्षांच्या मुलांना व्हिएतकॉंगींचे हस्तक म्हणून पॉईंट झीरो वरुन गोळ्या घातल्या - समोर छातीवर एक छोटासा बुलेटमार्क आणि पाठीमागे छातीला भगदाड अशी हजारो कोवळ्या मुलांची प्रेते नव्हतीका दिसत त्या मानवी जिवनाचे मुल्य माहित असलेल्या अमेरीकन्स ना?

आम्हि बोंबलतोय दहशतवाद - दहशतवाद पण अमेरीकनांना तो ९/११ पूर्वी माहितच नव्हता. कारण ९/११ पूर्वी WTC मध्ये दोनवेळा झालेले बॉंम्ब स्फोट सोडता मोठा दहशतवादि हल्ला त्यांवर झाला नव्हता. मग उठले तीरमीरीत, वड्याचं तेल वांग्यावर काडःअत सद्दामला फासावर चढवला. इराकि सैनिकांच्या हालाचे वर्णने वाचा. मान खाली जावी असे शारीरीक-मानसिक-लैंगिक अत्याचार अमेरीकन महिला सैनिक अधिकार्‍यांनी केले आहेत. कुठे जातात अश्यावेळी यांची मानवी मुल्ये?

जपानवरचा हल्ला हा फक्त अमेरीकन्स मरतील म्हणून केलेला होता. स्वत:च्या स्वार्थासाठी. अर्थात युध्द म्हंटल्यावर स्वत:चा नागडा स्वार्थ हाच एक अजेंडा असतो आणि त्यात चुकहि नाहिये. पण म्हणून अमेरीकन लोकांची बाकिची पापे पुसली जात नाहित.

Girish said...

मी अमेरिकेच्या व्हिएटनामविषयक धोरणांचे समर्थन करत नाही.आणि व्हिएटनाम हा या लेखाचा विषयही नाही. त्यामुळे आपल्या या विषयावरील प्रतिक्रिया अप्रस्तुत आहेत. त्यामुळे त्यावर काहीही भाष्य करत नाही.

>>जपानवरचा हल्ला हा फक्त अमेरीकन्स मरतील म्हणून केलेला होता.

मग त्यात चूक काय?जपानच्या युध्दखोरीमुळे अमेरिकन माणसे मारली जात होती आणि स्वत:च्या आडमुठेपणामुळे जपानने दुसरा मार्ग अमेरिकेपुढे शिल्लक ठेवला नव्हता.चार लाख अमेरिकन लोक जपानच्या युध्दखोरीमुळे आधीच मारले गेले होते आणि तरीही अमेरिकेच्या सरकारने आपल्या नागरीकांचा विचार न करता शत्रूच्या नागरीकांचा विचार करावा ही अपेक्षा का?मोठा अजब मनसुबा झाला.

काही लोक म्हणतात की अणुबाँम्ब हल्ला करून अमेरिकेच्या सरकारने जपानच्या सरकारच्या कुकर्मांची शिक्षा जपानच्या जनतेला दिली.पण जपानच्या नागरीकांना त्रास नको म्हणून युद्ध चालूच ठेवायचे, त्यात १२ हजार अमेरिकनांचा बळी द्यायचा आणि जपान सरकारच्या कुकर्मांची शिक्षा अमेरिकेच्या नागरीकांना द्यायची! असला दांभिक मानवतावाद अमेरिकेच्या सरकारला मान्य नसेल तर त्यात चूक काय? अमेरिकेच्या सरकारने आपल्या नागरीकांची सोडून आपल्या शत्रूच्या नागरीकांची काळजी करावी ही अपेक्षा का?

Saurabh said...

"मी अमेरिकेत गेली ४ वर्षे राहत आहे. आणि मी स्वतः सरकार आणि प्रसारमाध्यमे माणसाच्या जीवाचे किती मोल करतात हे जवळून बघितले आहे."
या वाक्यावर व्हिएतनामचे किर्तन केले. त्यात विषयाला धरुन नसले तरी अमेरीकनांची अत्यंत हिन मनोवृत्ती सांगितली. आपल्यावर शेकलं ना कि यांना जाग येते. तोवर बाकिचे बिनडोक असतात किंवा मुद्दम दुर्लक्षित करावे असे असतात. हेच लादेन जन्माला घालुन मग त्याच्या मागे धावतात. "रास्कल" हा एकच समानार्थी शब्द अमेरीकन मनोवृत्तीसाठी मला दिसतोय.

Girish said...

>>"मी अमेरिकेत गेली ४ वर्षे राहत आहे. आणि मी स्वतः सरकार आणि प्रसारमाध्यमे माणसाच्या जीवाचे किती मोल करतात हे जवळून बघितले आहे."

याचा अर्थ सरकार आणि प्रसारमाध्यमे अमेरिकन नागरिकांच्या जीवाचे किती मोल करतात असा आहे.भारतात १२० कोटी लोक आहेत म्हणून की काय पण प्रत्येक दहशतवादी हल्ल्यात काहीशे लोक मृत्यूमुखी पडले तरी काही फरक भारत सरकारला पडत नाही.तशी परिस्थिती अमेरिकेत नाही. मी अमेरिकेच्या व्हिएटनाम विषयक धोरणांचे समर्थन करत नाही हे पुन्हा एकदा सांगतो.वरील वाक्याचा अर्थ इतकाच की जपानच्या युद्धखोरीमुळे ४ लाख अमेरिकन नागरीक मृत्यूमुखी पडले होते आणि सरकार, प्रसारमाध्यमे आणि जनता आपल्या नागरीकांच्या जिवीताचे मोल करत असल्यामुळे जपानी नागरीकांच्या जीवापेक्षा अमेरिकन नागरीकांचे जीव अध्यक्ष ट्रुमन यांच्यासाठी अधिक महत्वाचे होते.आणि म्हणून मला हिरोशिमा अणुबाँब हल्ल्यात काहीही चूक वाटत नाही.