Monday, April 9, 2007

काही विनोदी अनुभव

मनाची उदासी घालवणारे काही विनोदी अनुभव-.

प्रत्येक माणूस कधीनाकधी विनोदी अनुभवांना सामोरा जातो.कधी तो स्वत: हजरजबाबीपणे विनोद करतो तर कधी इतरांनी केलेल्या विनोदाला खळखळून हसतो आणि दाद देतो. मी क्वचितप्रसंगी हजरजबाबीपणे असे काही विनोद केले आहेत पण अनेक वेळा मी अशा विनोदी प्रसंगांना सामोरा गेलेलो आहे. ते काही प्रसंग खालीलप्रमाणे--

१) गोष्ट आहे मी १२वीत असतानाची म्हणजे १९९६ सालची.माझ्या ताईचे लग्न ठरले होते आणि ती लग्नानंतर परदेशी जाणार हे नक्की झाले.आणि अर्थातच त्यासाठी तिला पारपत्राची (पासपोर्ट) गरज होती. पारपत्रासाठी त्याकाळी अनेक विविध कागदपत्रे मागत असत.त्यात 'शाळा सोडायचा दाखला' सुद्धा गरजेचा असे.माझ्या ताईचा असा दावा होता ती की खूपच व्यवस्थित आहे आणि तिला हव्या त्या गोष्टी वेळच्यावेळी मिळत असत.ते बहुतांशी खरेही होते.पण मी तिची त्यावरून टर उडवायची संधी शोधत होतो.
११वीत प्रवेश घेताना शाळा सोडायचा दाखला कॉलेजात द्यावा लागतो.आणि तो दाखला १२वी झाल्यावर कॉलेज ठेऊन घेते आणि १२वी च्या निकालाबरोबर कॉलेज सोडायचा दाखला मिळतो पण शाळा सोडायचा दाखला कॉलेज देत नाही. अर्थात मी तेव्हा १२वीत असल्यामुळे मला ही गोष्ट माहित असायचा प्रश्नच नव्हता.

झालं. पारपत्रासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली.आणि नेमकं घोडं अडलं शाळा सोडायच्या दाखल्यावरून.बाकी सर्व कागदपत्रं मिळाली पण शाळा सोडायचा दाखला कॉलेजने परत न दिल्यामुळे मिळणे अर्थातच शक्य नव्हते. माझ्या 'व्यवस्थित' ताईची तारांबळ उडाली. आणि मला पाहिजे असलेली तिची टर उडवायची संधी मिळाली.

शाळा सोडायचा दाखला मिळत नाही हे दिसताच माझी उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती: 'व्यवस्थितपणाची लक्तरं गावच्या वेशीवर टांगली गेली आहेत'!

२) दुसरा किस्सा माझ्या भाच्याने म्हणजे स्वप्नीलने केला.स्वप्नीलचा एक आवडता मिकी माऊस होता.तो मिकी माऊस कायम त्याच्याबरोबर असे.झोपताना शेजारी मिकी माऊस, सकाळी उठल्यावर पहिला मिकी माऊस हातात घेणार, जेवताना शेजारी मिकी माऊस! बाहेरून घरी परत आल्यावर पहिल्यांदा धाव मिकी माऊसकडे! माझ्या आईने स्वप्नीलला बऱ्याचदा सांगितले, 'स्वप्नील तुझं ते सोंग बाजूला ठेव'. आणि आपल्या अत्यंत आवडत्या मिकी माऊसला सोंग म्हटलेले त्याला अजिबात आवडत नसे.तो 'सोंग' हा शब्द परत करायची वाटच बघत होता. आणि त्याला तो शब्द परत करायची संधी मिळाली!
झालं असं की मी पहिल्या वेळी भारतात गेलो असताना ताई आणि स्वप्नील पण भारतात होते.एकदा आई, ताई आणि स्वप्नील भाजी आणायला गेले होते.भाजीची पिशवी जड झाली आणि आईने ती पिशवी पकडायला ताईकडे दिली. त्यावर स्वप्नीलची पहिली प्रतिक्रिया: ' मम्मा, आपल्याला आजीचे सोंग नको. तिला परत देऊन टाक'. त्याच्यावर आईने त्याला विचारले,'का रे माझ्या पिशवीला सोंग का म्हणालास?' त्यावर स्वप्नील म्हणाला,'मग तू माझ्या मिकी माऊसला का सोंग म्हणतेस?'

३) आमची अभियांत्रिकीची परीक्षा संपल्यानंतर आम्ही सर्व एका मित्राकडे गेलो होतो.सगळे मिळून ७-८ जण असतील.त्यात एक अत्यंत हजरजबाबी मित्र होता.आम्ही गेलो होतो तिथे एक ५-६ वर्षाचा मुलगा होता.तो बहुदा त्या मित्राचा पुतण्या होता.त्या मुलाने आमच्यातल्या एका मित्राला विचारले,' दादा, तुझा जन्म कुठे झाला रे'? त्यावर तो हजरजबाबी मित्र मजेने म्हणाला ,'अरे त्याला तुझा जन्म कुठे काय का झाला ते विचार. कारण गेले चार वर्षे आम्हाला बोर करतोय तो'!
आणखी किस्से परत कधीतरी.

---विल्यम जेफरसन क्लिंटन