Monday, September 3, 2012

माझे पहिले चित्रपट परिक्षण-- खामोश पानी

नमस्कार मंडळी, माझ्यासारख्या अत्यंत रूक्ष आणि अरसिक माणसाचा चित्रपट परिक्षणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.तेव्हा परिक्षण विस्कळीत वाटल्यास ते समजून घ्यावे ही विनंती. त्याचे झाले असे की गेल्याच आठवड्यात एन.डी.टी.व्ही वर २०१२ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्यास नक्की कसे निकाल लागतील याविषयीचा ओपिनिअन पोल दाखवला होता.हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी तो कार्यक्रम अर्थातच चुकविला नाही.त्या कार्यक्रमात निवडणुकविषयक प्रश्नांबरोबरच सर्वेक्षणात विचारलेल्या इतर प्रश्नांनाही लोकांनी नक्की कसे प्रतिसाद दिले हे पण दाखविले होते.त्यातच एक प्रश्न होता-- भारताने पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला प्रयत्न करावा का? त्याला ५७% प्रतिसादकर्त्यांनी "नाही" असे उत्तर दिले. पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला महाराष्ट्रातील ८०% प्रतिसादकर्त्यांनी विरोध दर्शविला. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची मोठी झळ मुंबईला लागली आहे त्यामुळे या प्रश्नाला महाराष्ट्रातून नकारात्मक मत येणे समजण्यासारखे आहे.पण उत्तर भारतातील दिल्लीत ६६%,पंजाबात ७२% तर हरियाणात ८०% प्रतिसादकर्त्यांनी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला पाठिंबा दर्शविला याचे मला आश्चर्य वाटले. १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील पंजाबमधून निर्वासित होऊन आलेले हिंदू उत्तर भारतातील याच राज्यांमध्ये स्थायिक झाले होते.तसेच पाकिस्तानात हिंदूंच्या झालेल्या कत्तलींची सर्वात जास्त प्रतिक्रिया उत्तर भारतात विशेषत: आपल्या पंजाबमध्ये (त्यावेळी हरियाणा आणि दिल्ली पण पंजाबमध्येच होते) उमटली होती.या दु:खद घटनांमुळे आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानातून आलेले निर्वासित जास्त उत्तर भारतात स्थायिक झाले असल्यामुळे पाकिस्तानविरोध उत्तर भारतात असेलच असे मला वाटले होते.या घटना अनुभवलेली पिढी आता म्हातारी झाली आहे. त्यातले अनेक लोक कदाचित हे जग सोडूनही गेले असतील/आहेत.तरीही आपल्या आई-वडिलांना/आजी-आजोबांना पाकिस्तानात मिळालेल्या वागणुकीबद्दल नव्या पिढीच्याही मनात प्रचंड राग असेल अशी माझी कल्पना होती.पण ते तितक्या प्रमाणात सत्य दिसत नाही. या प्रकारावर मी माझ्या फेसबुकवर स्टेटस लिहिले.त्यावर माझा "मग्गू" अडनावाच्या आय.आय.एम मधील मित्राने मला ई-मेल करून काही गोष्टी लिहिल्या."मग्गू" हे "मट्टू" या काश्मीरी अडनावाशी साधर्म्य असलेले अडनाव आणि गोरा रंग यामुळे तो काश्मीरी असावा अशीच माझी बरेच दिवस समजूत होती.पण "मी काश्मीरी नसून पंजाबी आहे" असे त्याने सांगितल्यावर मी त्याला विचारायचे इतर काही प्रश्न विचारणे टाळले होते.पण माझ्या फेसबुक स्टेटसवर पाठविलेल्या ई-मेलमध्ये त्याने लिहिले की त्याचे आजी-आजोबा पश्चिम पंजाबमधील "झांग" मधून दिल्लीला निर्वासित म्हणून आले.तसेच दिल्लीमध्ये आजही पाकिस्तानातील ठिकाणांवरून काही भागांची नावे आहेत.उदाहरणार्थ १९४७ नंतर दिल्लीमध्ये गुजरॉंवाला टाऊन,मियॉंवाली व्हिलेज अशा प्रकारच्या नावांच्या वस्त्या झाल्या.तसेच पश्चिम पंजाबातून १९४७ मध्ये आलेल्या निर्वासितांच्या पुढच्या पिढ्या आजही एकमेकांना त्यांच्या मुळच्या ठिकाणावरून ओळखतात.म्हणजे माझा मित्र मुळचा "झांग" चा म्हणून "झांगी", मुळचे "बन्नू"चे असलेले "बन्नूवाला" म्हणून तर मुळचे लाहोरचे "लाहोरी" म्हणून ओळखले जातात. माझ्या मित्राने एक वाक्य लिहिले: "All of such people who have roots in Pak can't imagine that the people there wud be different." म्हणजेच १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी सिरिल रॅडक्लिफने नकाशावर एक रेषा आखली आणि भारत आणि पाकिस्तान हे वेगळे देश झाले तरी आपल्या पंजाबातील आणि त्यांच्या पंजाबातील लोकांची राहणी, जीवनमान, सवयी इत्यादी सारखेच आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील त्या भागातून पाकिस्तानशी मैत्री करायला जास्त पाठिंबा मिळतो असे म्हणायचा माझ्या मित्राचा उद्देश आहे असे वाटते.तसेच माझ्या मित्राने मला "खामोश पानी" हा पाकिस्तानी चित्रपट बघ असेही सांगितले.हा चित्रपट युट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे मी तो ताबडतोब बघितला.हा चित्रपट पंजाबी-उर्दूमध्ये असला तरी इंग्रजी सबटायटल असल्यामुळे तो समजायला काही प्रश्न आला नाही. गोष्ट आहे १९७९ मधील.स्थळ-- पश्चिम पंजाबमधील चरखी हे लहानसे गाव.या गावात आयेशा नावाची एक पापभीरू स्त्री राहत असते. तिला सगळे गाव आयेशा चाची नावाने ओळखत असते.तिचे सगळे विश्व तिचा मुलगा--सलीमभोवती फिरत असते.आपल्या दिवंगत पतीच्या पेन्शनवर आणि गावातील मुलींसाठी कुराणाचे क्लास घेऊन ती आपली गुजराण करत असते.ती स्त्री गावात सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागत असते.पण या स्त्रीविषयी एक गौडबंगाल असते.ती स्वत: विहिरीवर पाणी भरायला कधीच जात नसे तर गावातील इतरांना पाणी भरून आणायला सांगत असे. एक दिवस गावच्या मुखिया चौधरीच्या घरी लग्न असते.तिथे दोन पाहुणे येतात.त्यांच्या एकंदरीत हावभावावरून, पेहरावावरून आणि दाढीवरून ते मुलतत्ववादी असणार हे लगेच कळते.लवकरच अफगाणिस्तानवर रशिया आक्रमण करणार असून आपल्या भाईबंदांना आपण वाचवायला हवे, जनरल झिया उल हकनी इस्लामी कायदा आणला आहे ही चांगली गोष्ट आहे आणि आपण सगळ्यांनीच मूळच्या इस्लामला अभिप्रेत असलेली जीवनपध्दती अंगिकारायला हवी अशा प्रकारचा प्रचार करायला ते सुरवात करतात.असा प्रचार ऐकून घरी आलेल्या सलीमला त्याच्या आईने-- आयेशाने विचारले--"सब ठिक है?" आणि त्याला सलीमने उत्तर न देता चित्रपटात दाखवलेली शांतता बरेच काही सांगून जाते.पुढे हे दाढीवाले पाहुणे सलीमला रावळपिंडीला "प्रोफेसर साहेबांचे" भाषण ऐकायला घेऊन जातात. "१९४७ मध्ये आपण धर्माच्या नावावर हा देश मिळवला पण ती "पाक" भूमी कुठे आहे?राजकीय नेत्यांनी/टीव्हीने देशाला बिघडवले आहे.आज आपल्या देशात स्त्रिया त्यांचे डोके आणि चेहरा उघडा ठेऊन बाहेर पडूच कशा शकतात?इस्लामचा खरा अर्थ समजून या आणि पुढच्या जगातही काही मिळवायचे असेल तर रशियनांविरूध्द जिहादसाठी पुढे या" अशा स्वरूपाचे विखारी भाषण या प्रोफेसरसाहेबांनी केले.या प्रचाराचा सलीमवर परिणाम होत असलेला दिसतोच.हे भाषण ऐकून भारावलेला सलीम घरी परत येत असतानाच त्याच्या आईने--आयेशाने "केवळ मुस्लिमच जन्नतमध्ये जायला पात्र आहेत असे नाही तर चांगली कृत्ये करणारे सगळेच जन्नतमध्ये जाऊ शकतात" असे क्लासच्या मुलींना सांगणे यातला विरोधाभास दिग्दर्शकाने अगदी प्रभावीपणे दाखविला आहे.तसेच झियांच्या इस्लामी कायदा आणायच्या निर्णयानंतर गावात कसा बदल व्हायला लागला--नमाजाच्या वेळी आपली दुकाने बंद करून मशिदीत नमाजाला जावे असे फर्मावणारे डोके भडकलेले तरूण दिसू लागले आणि यापूर्वी दाढी-मिशा न वाढवणारा सलीमही दाढी ठेऊ लागला यातून सगळ्या वातावरणाचा सलीमवर झालेला परिणाम पण तितक्याच प्रभावीपणे दाखविला आहे.आपला मुलगा धर्मांधांच्या मार्गाला गेलेला बघून आयेशाच्या मनात होत असलेली कालवाकालव बघून खरोखरच वाईट वाटते.तसेच "लव्ह मॅरेज" ही आपली संस्कृती नाही या पाहुण्यांच्या सांगण्यामुळे सलीम झुबेदाला टाळायला लागला आणि ते दु:ख झुबेदाच्या डोळ्यात दिसते आणि नकळत आपल्यालाही वाईट वाटते. यानंतर आयेशाच्या आयुष्यात एक वादळ येते.भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक करार होतो आणि या कराराप्रमाणे काही शीख तीर्थयात्रींना पाकिस्तानातील त्यांच्या देवस्थानांना जायची परवानगी मिळते.१९४७ मध्ये मुसलमानांकडून नासविले जाऊ नये म्हणून अनेक शीख कुटुंबांमध्ये वडिलांनी आपल्या मुलींना, पतींनी आपल्या पत्नींना आणि भावांनी आपल्या बहिणींना ठार मारले होते.तसेच अनेक शीख स्त्रियांनी आपल्या शीलाचे रक्षण करण्यासाठी विहिरींमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती (हे तमसमध्ये पण बघायला मिळाले होते).आयत्या वेळी आत्महत्या करू न शकलेल्या काही शीख स्त्रिया गावात अजूनही राहिल्या आहेत अशी वदंता यात्रेकरूंमध्ये आधीच पसरलेली असते.या यात्रेकरूंमध्ये एक जसवंत सिंह नावाचा यात्रेकरू असतो.तो पत्ता काढत आयेशाच्या घरी पोहोचतो आणि मला माझ्या बहिणीला--विरोला भेटायचे आहे असे म्हणतो.आणि आपली आई मुळातली शीख होती हे सलीमलाही कळते.हळूहळू गावातले सगळे आयेशाला टाळू लागतात.मी मुसलमान आहे हे सर्वांसमक्ष आयेशाने जाहिर करावे अशी धर्मांधांची अपेक्षा असते.एकीकडे जसवंत सिंह तिला त्यांच्या वडिलांना प्राण सोडण्यापूर्वी तिला भेटायचे आहे हे सांगत असतो आणि दुसरीकडे आयेशा मी तुमच्याशिवाय माझे आयुष्य नव्याने सुरू केले हे सांगते. यापुढचा जसवंत सिंहला तिने विचारलेला प्रश्न मात्र अनुत्तरीतच करतो. एक तर आपली मुलगी मुसलमान झालेली बघून वडिल "शीख जन्नत" मध्ये जातील का? आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे "वडिल निदान शीख जन्नतमध्ये तरी जातील.पण माझे काय?मी शीख जन्नतमध्ये जाईन की मुस्लिम जन्नतमध्ये"? चित्रपटात फ्लॅशबॅकमधून कळते की मुसलमानांनी त्यांच्या अंगाला हात लावायच्या आत शीख मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या करावी असा थोडासा दबावच त्यांच्यावर आलेला असतो.आयेशा म्हणजे मुळातली विरो मात्र त्या दबावाला बळी न पडता तिथून पळून जाते.काहीही म्हटले तरी स्वत:चा जीव द्यायला जबरदस्त धाडस लागते आणि ते तिच्यात नसेल तर चित्रपटाचा प्रेक्षक तिला नक्कीच दोष देऊ शकणार नाही.पुढे तिला मुसलमान पळवून नेतात.पण विरोच्या सुदैवाने तिला पळवून नेणारा माणूस चांगला निघतो.तो तिच्याशी लग्न करतो आणि अर्थातच लग्नापूर्वी विरोची आयेशा बनते.तरीही ज्या विहिरीच्या पाण्यात आपला जीव जायची शक्यता होती त्या विहिरीवर पाणी भरायला मात्र ती त्यानंतर कधीच जाऊ शकत नाही. पण आयेशाच्या आयुष्यात आलेल्या या वादळानंतर तिचे सगळे जीवनच बदलून जाते.आणि शेवटी ती त्याच विहिरीत उडी मारून स्वत:ला संपविते. जे १९४७ मध्ये घडायचे टळले होते तेच १९७९ मध्ये घडते. चित्रपटात जनरल झिया उल हक यांनी आणलेल्या इस्लामीकरणामुळे कसे दुष्परिणाम झाले हे दाखवायचा एक चांगला प्रयत्न केला आहे.मानवी स्वभावातले विविध कंगोरेही यातून पुढे येतात. मेहबूब नावाचा तेलमालिश करणारा आणि केस कापायचे काम करणारा म्हणून जातो की "काफिरांनी" आपले नक्की काय वाईट केले होते आणि "The question is whom does General Zia Ul Haq represent?" असे प्रश्न विचारतो. सलीमला धर्मांधतेच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न करणारी त्याची प्रेयसी झुबेदा असे काही घटक पाकिस्तानी समाजात असतील तर ते आशेचे किरण आहेत असे नक्कीच वाटायला लावते. चित्रपटाचे चित्रीकरण पाकिस्तानात केले आहे.फाळणीच्या वेळी सामान्यांना जे काही सोसायला लागले त्याबद्दल कोणाही सहृदय माणसाप्रमाणे मलाही खूप वाईट वाटते.त्यातूनही विरो/आयेशा सारख्या स्त्रियांचे नक्की काय झाले असेल?विरोला चांगला नवरा मिळाला पण सगळ्या स्त्रिया तितक्या सुदैवी असतील का?अशा कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत स्त्रियाच दोन्ही बाजूंच्या शिकार बनतात हे सत्य या निमित्ताने परत अधोरेखित होते. या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय आणि पाकिस्तानी समाजात असलेली काही साम्ये आणि फरकही अगदी ठळकपणे समोर येतात.उदाहरणार्थ लग्नात "तुझी सासू चांगली निघो" अशी शुभेच्छा लग्नमुलीला देणे हा प्रकार आपल्याकडे उघडपणे होत नसला तरी मनातल्या मनात अशा शुभेच्छा नक्कीच दिल्या जात असतील.तर लग्नप्रसंगी "मर्द" आणि "जनाना" पडद्याद्वारे विभक्त करणे हा आपल्याकडे नसलेला प्रकार चित्रपटात बघायला मिळतो.मधूनच एखादी पंजाबी शिवी पण येते.तरीही एक गोष्ट मात्र खटकते आणि ती म्हणजे सलीम आणि झुबेदाचे चुंबनदृश्य. पाकिस्तानी चित्रपटात असे दृश्य बघायला मिळेल अशी अपेक्षा नसल्यामुळे ते धक्कादायक वाटते हे नक्कीच. हे माझे पहिलेच चित्रपट परिक्षण आहे त्यामुळे ते बरेच विस्कळीत आहे याची खात्री आहे.आणि चित्रपट हा माझा आवडीचा विषय नक्कीच नाही.तरीही फाळणीविषयी (किंबहुना त्यावेळी झालेल्या रक्तपाताविषयी आणि सर्वसामान्यांना ते अमुक एका धर्माचे असल्याच्या "गुन्ह्याबद्दल" जे सोसावे लागले त्याविषयी) मला खूपच दु:ख वाटते.आणि त्यामुळेच चित्रपट परीक्षण या ओळखीच्या नसलेल्या प्रदेशात पाऊल टाकले आहे. सध्या मी इमरान खानचे पाकिस्तानवर लिहिलेले पुस्तकही वाचत आहे.वेळ मिळाल्यास त्याचेही परिक्षण जरूर लिहेन.

Monday, December 12, 2011

कॉर्पोरेटमधील उच्चपदस्थ आणि विश्लेषक यामधील संबंध: वल्डकॉमआपण अमुक एक शेअर घ्यावा किंवा विकावा यासंबंधीचे रिसर्च रिपोर्ट पेपरात वाचत असतो आणि हे रिपोर्ट वाचताना ते रिपोर्ट लिहिणारा विश्लेषक पूर्णपणे आलिप्तपणे रिपोर्ट लिहित आहे असे आपण अनेकदा गृहीत धरत असतो. म्हणजेच काय की या रिपोर्टमध्ये एखादा विशिष्ट प्रकारचा सल्ला विश्लेषक स्वत:चा फायदा व्हावा या उद्देशाने नव्हे तर तो शेअर खरोखरच चांगला आहे म्हणून देत आहे असे आपल्याला वाटते. पण दरवेळी वस्तुस्थिती अशी असते का? उदाहरणार्थ एखाद्या विश्लेषकाने एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केलेले आहेत. तेव्हा त्या शेअरची किंमत वाढण्यात त्या विश्लेषकाचा फायदा असतो. एखाद्या नामवंत संस्थेत काम करणाऱ्या (आय.सी.आय.सी.आय डायरेक्ट, शेअरखान) अशा विश्लेषकाने तो शेअर विकत घ्या असा सल्ला दिला तर तो सल्ला गुंतवणुकदार विचारात घेतात. तेव्हा एखाद्या विश्लेषकाने शेअर विकत घ्या असा सल्ला दिला आणि त्या शेअरची मागणी वाढून किंमत वाढली आणि त्यामुळे त्याचा फायदा होणार असेल तर आपले हितसंबंध गुंतले असल्यामुळे असा सल्ला देणारा विश्लेषक पूर्णपणे तटस्थपणे सल्ला देईल याची खात्री नाही.तेव्हा या गोष्टीला पार्श्वभूमी आहे विश्लेषकाचे (आणि तो काम करत असलेल्या संस्थेचे) हितसंबंध यांची.


ही गोष्ट आहे अमेरिकेतील "वल्ड कॉम" या कंपनीची आणि यात मुख्य पात्रे आहेत दोन--कंपनीचा सी.इ.ओ बर्नी एबर्स आणि विश्लेषक जॅक ग्रबमन. विश्लेषक जॅक ग्रबमन काम करत होता "सॉलोमन स्मिथ अ‍ॅन्ड बर्नी" या सिटी ग्रुपमधील इन्व्हेस्टमेन्ट बॅंकमध्ये (ज्याला सध्या सिटी ग्लोबल मार्केट्स म्हटले जाते).


सी.इ.ओ बर्नी एबर्स

जॅक ग्रबमन

अमेरिकेत १९९९ पूर्वी "ग्लास-स्टीगल" कायद्याप्रमाणे एका छत्राखाली अनेक प्रकारच्या वित्तीय संस्था ठेवायला बंदी होती. पण १९९९ मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. त्यानंतरच्या काळात सिटीग्रुप मध्ये सिटी बॅंक बरोबरच ही इन्व्हेस्टमेन्ट बॅंकही आली.

१९९० च्या दशकात वल्डकॉम कंपनीने इतर कंपन्या विकत घ्यायचा धडाका लावला होता.यातील एम.सी.आय ही सूरसंचार कंपनी विकत घ्यायला ब्रिटिश टेलिकॉमने १९ बिलियन डॉलर्सची ऑफर दिली तर त्याला प्रत्युत्तर म्हणून वल्ड कॉमने ३५ बिलियन डॉलर्सची!! अर्थातच एम.सी.आय च्या शेअरधारकांनी आपली कंपनी कोणाला विकली हे वेगळे सांगायला नकोच.अशा प्रकारच्या (दुसरी कंपनी विकत घ्यायच्या) व्यवहारांसाठी (acquisition) कंपन्यांना advise करायला (गलेलठ्ठ फी घेऊनच) इन्वेस्टमेन्ट बॅंका असतात.एम.सी.आय व्यवहारात सॉलोमन स्मिथ बर्नीने ब्रिटिश टेलिकॉमला advise केले होते. तरीही यापुढच्या काळात वल्ड कॉम ज्या कंपन्या विकत घेईल त्यासाठी advisor म्हणून सॉलोमन स्मिथ बर्नीला (अधिक उत्पन्न मिळवायला) contract हवे होते.

आता इथे ग्लास-स्टीगल कायदा रद्द केल्यामुळे हितसंबंध कसे प्रभावीत झाले याची मजा बघा. सिटी बॅंकेने सी.ई.ओ बर्नी एबर्सची मोठी गुंतवणुक असलेल्या एका कंपनीला बऱ्याच सवलतीने कर्ज दिले ते या अपेक्षेने की नंतरच्या काळात कंपन्या विकत घेताना बर्नी एबर्सची कंपनी वल्ड कॉम सॉलोमन स्मिथ बर्नीला (सिटीग्रुपमधील कंपनी) advisor म्हणून नियुक्त करेल! इतकेच काय तर सिटीबॅंकेने कंपनीचे सी.एफ.ओ स्कॉट सुलिव्हान आणि इतर काही उच्चपदस्थांनाही सवलतीच्या दराने वैयक्तिक कर्जे दिली! यात आक्षेपार्ह काही नाही असे वाटूही शकेल पण ही एका प्रकारची लाच नाही का? सिटीबॅंकेचे उत्पन्न योग्य बाजारदराने कर्ज देऊन वाढू शकले असते पण ते सॉलोमन स्मिथ बर्नीला contract मिळावे या अपेक्षेपोटी वाढले नाही. आणि जरी ते contract मिळाले असते तर त्याचा फायदा सिटीबॅंकेला (म्हणजेच सिटीबॅंकेच्या शेअरधारकांना) होणार होता का? छे भलतेच काहीतरी.अशी contract मिळून सॉलोमन स्मिथ बर्नीच्या Investment Bankers ना भरपूर बोनस हवे होते! ही शेअरधारकांची फसवणूक नाही का?

सी.एफ.ओ स्कॉट सुलिव्हान

खरा धक्कादायक प्रकार यापुढे सुरू होतो.बर्नी एबर्सला वल्डकॉम कंपनीने "स्टॉक ऑप्शन्स" दिले होते. स्टॉक ऑप्शनचा अर्थ भविष्यकाळात कंपनीचे शेअर सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किंमतीने खरेदी करायचा पर्याय! म्हणजे समजा आज शेअरची बाजारातील किंमत ४० डॉलर्स आहे तर दोन वर्षांनंतर शेअर (समजा) ३५ डॉलर्सला खरेदी करायचा पर्याय बर्नी एबर्सला दिला गेला.समजा दोन वर्षांनंतर शेअरची किंमत ३५ डॉलर्सपेक्षा कमी असली तर अर्थातच बर्नी एबर्स शेअर्स ३५ डॉलर्समध्ये खरेदी करायचा पर्याय वापरणार नाही. असे ऑप्शन एका शेअरवर नाही तर काही हजार शेअरवर दिले गेले.१९९१ ते १९९९ या काळात वल्डकॉमच्या शेअरची किंमत झपाट्याने वाढली. १९९१ मध्ये एका डॉलरच्या आसपास असलेली किंमत १९९९ पर्यंत ६० डॉलर्सला जाऊन पोहोचली.या काळात शेअरची किंमत चढतीच होती.तेव्हा असे ऑप्शन दिल्यानंतर दोन वर्षांनंतर शेअरचे बाजारभाव अर्थातच जास्त होते.तेव्हा या ऑप्शनमधून बर्नी एबर्सचा मोठा फायदा होऊ शकणार होता. (असे ऑप्शन देणे पूर्णपणे कायदेशीर आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना-- केवळ उच्चपदस्थानांनाच नव्हे-- अधिक चांगले काम करून शेअरची किंमत वाढवून स्वत:चा फायदा करायला मिळावा यासाठी असे ऑप्शन सर्रास दिले जातात). पण एक शेअर ३५ डॉलर्सला असे एक लाख शेअर्स म्हणजे ३५ लाख डॉलर्स बर्नी एबर्सला त्यासाठी भरायला हवेत! इतकी मोठी रक्कम कॅशमध्ये असतेच असे नाही.तेव्हा ही रक्कम बर्नी कशी उभी करणार होता?

त्यावर एक उपाय म्हणजे बर्नीकडे स्वत:कडे आधीपासून असलेले वल्डकॉम कंपनीचे शेअर्स विकणे. पण कंपनीच्या सी.ई.ओ ने स्वत: कंपनीचे शेअर विकणे म्हणजे स्वत: सी.ई.ओ ला कंपनीच्या भविष्यकाळातील उत्पन्नाविषयी शंका आहे आणि भविष्यात शेअरची किंमत कमी होईल असे त्याला वाटते असा चुकीचा संदेश बाजारात जाईल.स्वत: बर्नी एबर्स या गोष्टीला अनुकूल नव्हता. २००१ मध्ये एनरॉन कंपनी कोसळली त्याच्यामागे उच्चपदस्थांनी असे शेअर विकणे हे पण एक कारण होते.पण बर्नी एबर्सने असे शेअर्स क्वचितच विकले. मग इतकी रोख रक्कम आणावी कुठून?

तर त्यासाठी उपाय होता कर्ज काढणे. सिटीबॅंकेसारख्या बॅंकेनेही वर सांगितलेल्या कारणासाठी बर्नीला सवलतीने कर्ज दिले.आणि त्यासाठी बर्नीने तारण म्हणून काय ठेवले? तर त्याच्याकडे पूर्वीपासून असलेले वल्ड कॉंम कंपनीचेच शेअर्स.जोपर्यंत शेअर्सची किंमत वाढत असेल तोपर्यंत काही प्रश्न नाही.पण समजा शेअर्सची किंमत कमी होऊ लागली तर बॅंकेकडे ठेवलेल्या तारणाची किंमत कमी होऊ लागेल. तेव्हा मुळातले शेअर किंमतीत पडणार नाहीत यात सिटीग्रुपचे हितसंबंध गुंतलेले होते. इथे मदतीला धाऊन आला विश्लेषक जॅक ग्रबमन. बर्नी एबर्स १९८० च्या दशकात मिसिसिपी राज्यात "लॉंग डिस्टन्स डिस्काऊंट सर्व्हिस" या कंपनीचा सी.ई.ओ होता. तीच कंपनी पुढे वल्डकॉम म्हणून म्हणून ओळखली जाऊ लागली.त्या वेळेपासून जॅक ग्रबमन हा बर्नी एबर्सचा मित्र होता.या मैत्रीचा फायदा म्हणून कंपनीतील "आतल्या बातम्या" यथास्थित जॅक पर्यंत पोहोचू लागल्या.इतकेच काय तर कंपनीतील उच्चपदस्थांचे "कॉन्फरन्स कॉल" कशाकरता होते आणि त्यात काय चर्चा झाली हे सुध्दा त्याच्यापर्यंत पोहोचू लागले.इतर विश्लेषकांना अर्थातच ही सवलत नव्हती. जॅक ग्रबमनने वल्ड कॉमला "buy rating" दिले. २०००-०१ मध्ये कंपनीच्या कारभाराविषयीच्या तक्रारी SEC (भारतातील सेबीला समकष) ची चौकशी सुरू झाल्यानंतरही जॅकचे "विकत घ्या" हे रेटिंग कायमच राहिले. इतकेच काय तर मार्च २००२ पर्यंत जॅक आपल्या रेटिंगवर कायम राहिला.

जॅकला आतल्या बातम्या बर्नी एबर्सबरोबरच्या मैत्रीतूनच मिळत होत्या. ही फुकटची मदत होती का?तर तसे नक्कीच नाही. "सॉलोमन स्मिथ बर्नी" ज्या कंपन्यांचे आय.पी.ओ बाजारात आणायला मदत करेल त्यातील अधिक चांगल्या कंपन्यांचे शेअर बर्नी एबर्स आणि सी.फ.ओ स्कॉट सुलिव्हानला सॉलोमन स्मिथ बर्नीकडून दिले जाऊ लागले. जेव्हा एखाद्या कंपनीचा आय.पी.ओ बाजारात येतो तेव्हा बहुतांश वेळा पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते. एखाद्या आय.पी.ओ १५X oversubscribe झाला याचा अर्थ जेवढे शेअर विकायला बाजारात आणले होते त्याच्या १५ पट मागणी होती असा होतो. अशा वेळी शेअरसाठी अर्ज केलेल्यांना त्यांच्या category प्रमाणे त्यांच्या मागणीच्या १/१५ भाग शेअर दिले जातात.तरीही यातही चापलुसी करून जास्तीचे शेअर बर्नी आणि सुलीव्हानला दिले गेले.

तेव्हा एकमेकांचे हितसंबंध एकमेकांमध्ये कसे गुंतले होते ते बघितले की थक्क व्हायला होते. आता या सगळ्या भानगडीत नुकसान कोणाचे होत होते? अर्थातच कंपनीच्या शेअरधारकांचे.तेव्हा शेअरधारकांचे पैसे लुबाडून आपल्या खिशात घालायचा हा डाव होता.

वल्डकॉमच्या दिवाळखोरीसाठी खरे कारण (अधिक महत्वाचे) अकाऊंटिंग मध्ये जाणीवपूर्वक केलेले घोटाळे हे होते.यात अकाऊंटिंग करताना कंपनीचे उत्पन्न आहे त्यापेक्षा जास्त फुगवून दाखविणे आणि खर्च कमी दाखविणे हे प्रकार अनेक क्लुप्त्या लढवून केले गेले.अर्थातच यामुळे कंपनीचा नफा होता त्यापेक्षा जास्त दाखविला गेला आणि गुंतवणुकदारांचा कंपनीकडे बघायचा दृष्टीकोनच बदलला. हे सगळे प्रकार सिंथिया कुपर या कंपनीच्या अकाऊंटिंग विभागात कामाला असलेल्या महिलेने नेटाने उघडकीला आणले. स्कॉट सुलिव्हानने तिला "या भानगडींमध्ये नाक खुपसू नकोस" अशी तंबी दिली होती हे वेगळे सांगायलाच नको. सिंथिया कुपरच्या कामगिरीबद्द्ल तिचा टाईम मासिकाने २००२ च्या Person of the year मध्ये समावेश केला.

सिंथिया कुपर

पुढे २००२ मध्ये सगळे प्रकार उघडकीला आल्यावर अमेरिकन संसदेने "Sarbanes Oxley" कायदा पास केला आणि कंपन्यांच्या अकाऊंटिंगविषयीचे नियम अधिक कडक केले.तसेच अशा अकाऊंटिंग मधील गैरप्रकारांसाठी कंपनीच्या संचालक मंडळाला जबाबदार ठरविण्यात येईल असा नियम केला.


जून २००२ मध्ये जॅक ग्रबमनने राजीनामा दिला.डिसेंबर २००२ मध्ये SEC ने त्याच्यावर Unprofessional conduct आणि Conflict of interest च्या गुन्ह्यासाठी १५ मिलियन डॉलरचा दंड ठोठावला आणि कोणत्याही ब्रोकरींग कंपनी किंवा इन्व्हेस्टमेन्ट बॅंकमध्ये त्याला नोकरी करण्यावर आयुष्यभरासाठीची बंदी घातली.२००५ मध्ये बर्नी एबर्सला २५ वर्षांच्या तर स्कॉट सुलिव्हानला ५ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.आजही बर्नी एबर्स तुरूंगातच आहे.


मी रिस्क मॅनेजमेन्टशी संबंधित दोन संस्थांचा सदस्य आहे.या दोन्ही संस्थांचे अशा Conflict of interest च्या बाबतीतले नियम कडक आहेत.विश्लेषकांना कोणत्याही कंपनीवर रिसर्च रिपोर्ट public domain मध्ये आणण्यापूर्वी जर का असे Conflict of interest असतील (त्या कंपनीचे शेअर/बॉंड धारक असणे इत्यादी) तर ते जाहिर करणे बंधनकारक असते.म्हणजे त्याप्रमाणे गुंतवणुकदार त्या रिपोर्टवर किती विश्वास ठेवायचा हे ठरवू शकतील.

Thursday, March 3, 2011

फायनान्सची तोंडओळख (भाग ५): बॅलन्स शीट


फायनान्सची तोंडओळख (भाग ): बॅलन्स शीट


जानेवारी २०११ रोजी राम कुमार आणि त्याचा फायनान्स मॅनेजर सुमंत कुमारची मिटींग झाली. बिझनेस सुरू होताना काय परिस्थिती आहे याचा आढावा या मिटींगमध्ये घेतला गेला.

रामकडे ३०० छड्या तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाचा साठा होता.तो त्याने आपल्या बिझनेसमध्ये वापरायचे ठरविले.इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कीकुमार एन्टरप्रायझेसहा एक ’Sole proprietorship’ बिझनेस आहे.अशा प्रकारच्या बिझनेसचे देणे त्या बिझनेसच्या नफ्यातून फिटले नाही तर रामला स्वत:च्या पैशातून ते भरणे बंधनकारक असते. तरीही बहुतेक ’Sole proprietorship’ चे मालक स्वत:ची आणि बिझनेसची बॅंक खाती स्वतंत्र ठेवतात. तेव्हा रामने ३०० छड्या बनवता येतील इतका कच्चा मालकुमार एन्टरप्रायझेसला दिला याचाच अर्थ या कच्चा मालकुमार एन्टरप्रायझेसने राम कडून विकत घेतला! तेव्हा रामने स्वत:चे लाख ७० हजार इतके (३०० गुणिले ९०० रुपये) भांडवल आपल्या उद्योगातून काढून घेतले.

रामने स्वत:चे १० लाखाचे भांडवल घातले आणि बॅंकेचे १० लाखाचे कर्ज मिळून सुरवातीला रोख २० लाख रूपये बिझनेसकडे होते. त्यापैकी १० लाख रुपये ऑफिसची जागा घेण्यात गेले आणि वर म्हटल्याप्रमाणे रामने त्यातून लाख ७० हजार रूपये काढून घेतले.म्हणजे बिझनेसकडे रोख रक्कम उरली लाख ३० हजार रूपये.

तेव्हा जानेवारी २०११ रोजी कुमार एन्टरप्रायझेसकडे पुढील गोष्टी होत्या--
. ऑफिसची जागा: १० लाख रुपये
. कच्च्या मालाचा साठा:  लाख ७० हजार रूपये
. रोख रक्कम:    लाख ३० हजार रूपये
एकूण: २० लाख रूपये

या तीन गोष्टींना कुमार एन्टरप्रायझेसच्या Assets म्हणतात. याचे कारण या तीन गोष्टींचा वापर बिझनेससाठी होणार आहे.

आता हे Assets आकाशातून पडलेले नाहीत.तर ते उभे करायला कोणीतरी आर्थिक पाठबळ दिले आहे.ते पाठबळ कोणी दिले? तर ते पुढीलप्रमाणे:
. बॅंकेचे कर्ज: १० लाख रूपये
. रामचे भांडवल: १० लाख रुपये
एकूण: २० लाख रूपये

यापैकी बॅंकेच्या कर्जाला बिझनेसची Liabilites म्हणतात तर रामच्या भांडवलाला Equity म्हणतात. याचाच अर्थ Assets उभे करायला Liabilities आणि Equity च्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले जाते.नेहमी Equity ही Liabilities च्या बाजूला दाखवातात.

इथे Assets आणि Liabilities+Equity ची किंमत सारखीच आहे. हा योगायोग आहे का?तर तसे नक्कीच नाही.Assets आणि Liabilities+Equity ची किंमत नेहमी सारखीच असते याचे कारण, पुन्हा एकदा Assets उभे करायला Liabilities आणि Equity च्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले जाते. तेव्हा जेवढ्या Assets तेवढ्याच Liabilities+Equity!

या Assets आणि Liabilities आणि Equity च्या स्टेटमेन्टला Balance Sheet म्हणतात.

यापैकी रामचे भांडवल आणि बॅंकेचे कर्ज या दोन गोष्टींचा दर्जा सारखा नाही. म्हणजे समजा बिझनेसकडील सगळा कच्चा माल काही कारणाने खराब झाला तर बिझनेसचे एकूण नुकसान लाख ७० हजारांचे झाले. सगळा बिझनेसचा डोलारा उभा राहिला तो रामचे भांडवल आणि बॅंकेचे कर्ज या दोन गोष्टींवर. मग झालेले नुकसान या दोन पैकी कोणी सोसावे? याचे उत्तर आहे की, अपेक्षेप्रमाणे बॅंक हे नुकसान अजिबात सोसायला तयार होणार नाही आणि कायद्याच्या दृष्टीने बॅंकेने नुकसान सोसायचे पण नसते.म्हणजे झालेले नुकसान रामच्या भांडवलातून वाळते होणार. म्हणजेच या प्रसंगानंतर बिझनेसच्या Assets पुढीलप्रमाणे:

. ऑफिसची जागा: १० लाख रुपये
. रोख:  लाख ३० हजार रूपये
एकूण: १७ लाख ३० हजार रूपये

तर Liabilities आणि Equity पुढीलप्रमाणे
. बॅंकेचे कर्ज: १० लाख रूपये
. रामचे भांडवल: लाख ३० हजार रुपये
एकूण: १७ लाख ३० हजार रूपये

याचाच अर्थ रामने आपला बिझनेस बंद करायचा निर्णय घेतला तर त्याला ऑफिसची जागा विकून १० लाख रूपये मिळतील (ideally) आणि रोख लाख ३० हजार रूपये असे १७ लाख ३० हजार रूपये मिळतील. त्यातून १० लाखाचे कर्ज परत फेडून उरलेले पैसे राम घेऊ शकेल. उलट बिझनेसच्या नावाने घेतलेल्या लॉटरीच्या तिकीटाला लाखांचे बक्षिस लागले तर रामचे भांडवल लाखांने वाढेल आणि कर्जाची रक्कम स्थिर राहिल. तुम्हाला लॉटरी लागली म्हणून आजपासून कर्ज १० लाखांऐवजी १२ लाख असे बॅंक म्हणू शकत नाही.

(प्रत्यक्षात अकाऊंटिंग करताना रामचे भांडवल कमी-जास्त करून दाखवत नाहीत. समजा बिझनेसला फायदा झाला तर तो फायदा बॅलन्स शीटमध्ये Retained earning म्हणून Liabilities च्या बाजूला दाखवतात.तरीही इथे विनाकारण क्लिष्टता टाळण्यासाठी फायदा/तोटा रामच्या भांडवलात जास्त/कमी करून दाखवला आहे.)

तेव्हा बॅंकेचे कर्ज ही Liability स्थिर आहे.तिची किंमत कमी-जास्त होत नाही तर रामचे भांडवल या Liability ची किंमत कमीजास्त होते. अशा किंमत कमीजास्त होणाऱ्या Liability ला Equity म्हणतात. तसेच बॅंकेने कुमार एन्टरप्रायझेसला कर्ज दिले असले तरी तो बिझनेस बॅंकेचा नाही तर रामचा आहे. Equity अशी मालकी दर्शविते तर बॅंकेचे कर्ज मालकी दर्शवत नाही.

कर्ज देणाऱ्यांचा बिझनेसमधून येणाऱ्या पैशांवर पहिला हक्क असतो तर कर्ज देणाऱ्यांचे पैसे चुकते केल्यानंतर उरलेल्या रक्कमेवर  Equity धारकांचा हक्क असतो. यालाच Residual claim of equity holders म्हणतात. समजा बॅंकेने पहिली पाच वर्ष केवळ व्याज द्यायला सांगितले आणि मुद्दल तसेच ठेवले. म्हणजे बॅंकेला दरवर्षी लाख रूपये व्याज देणे भाग आले. जर बिझनेसला लाखांचा फायदा झाला तर पहिल्यांदा बॅंकेचे देणे ( लाख) चुकते करणे भाग आहे.उरलेल्या लाखांपैकी पाहिजे तितकी रक्कम राम स्वत:च्या वापरासाठी काढून घेऊ शकेल आणि उरलेली रक्कम स्वत:च्या भांडवलात add करेल. बिझनेसला लाखांचा फायदा झाला म्हणून रामने लाख ५० हजार आधी काढले आणि उरलेले ५० हजारच रूपये व्याज म्हणून दिले तर पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे तो कुमार एन्टरप्रायझेसचा default ठरेल आणि व्याज वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाई करायचा अधिकार बॅंकेचा असेल.

कोणत्याही बिझनेसची फायनान्शियल स्टेटमेन्ट ही अत्यंत महत्वाची असतात.आणि ती तयार करायच्या पेशाला “अकाऊंटिंग” म्हणतात.अकाऊंटिंग हे भौतिकशास्त्र किंवा गणितासारखे शास्त्र नाही तर ते म्हणजे अनेक वर्षांमध्ये विकसित झालेले norms आहेत.त्यामुळे अकाऊंटिंगचे नियम वेगवेगळ्या देशात थोडेफार बदलू शकतात.एखाद्या देशात (भारत, अमेरिका वगैरे) सर्वमान्य असलेल्या अकाऊंटिंगच्या नियमांना Generally Accepted Accounting Principles (GAAP) म्हणजेच सर्वसामान्यपणे ग्राह्य धरली जाणारी अकाऊंटिंगची तत्वे असे म्हणतात.

तेव्हा या भागात बघितलेल्या संकल्पना--
१.      Assets,Liabilities आणि Equity म्हणजे काय
२.      Balance sheet
३.      Equity ची किंमत कमीजास्त होते तर Debt (कर्ज) या Liability ची किंमत स्थिर असते.
४.      Assets=Liabilities+Owner's equity
५.      Equity धारकांचा बिझनेसच्या नफ्यावर ’Residual claim' असतो.
६.      Generally Accepted Accounting Principles म्हणजे काय